भाजपचा शेकापला ‘जोरका धक्का’

- रायगडमध्ये शेकापचे पाटील कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर

    14-Apr-2025
Total Views | 16
 
 BJP to Shekap
 
पेण: ( BJP to Shekap ) शेतकरी कामगार पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळणारे पाटील कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांचे बंधू व माजी आ. सुभाष पाटील हेही पक्ष सोडणार आहेत. बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी ते आस्वाद पाटील, चित्रा पाटील, सवाई पाटील यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अस्तित्वासाठी झगडणार्‍या शेतकरी कामगार पक्षाच्या अडचणीत वाढ होणार आहे.
 
विधानसभा निवडणुकीत अलिबागच्या उमेदवारीवरून पाटील कुटुंबात वादाची ठिणगी पडली. माजी आ. सुभाष पाटील आणि जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण, दोघांनाही डावलून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. त्याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाला. पक्षांतर्गत नाराजी चित्रलेखा पाटील यांना महागात पडली आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी दुसर्‍यांदा विजयी झाले.
 
त्यामुळे पक्षाची वाताहत सुरू झाली. पक्षात सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. हा गटही दोघांबरोबर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे.
 
“देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करीत आहे. त्यामुळे सत्तेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असे पाटील म्हणाले. काही पदाधिकारी त्यांच्या समवेत भाजपमध्ये दि. 16 एप्रिल रोजी प्रवेश करणार आहेत.
 
पक्षात तुमचा योग्य सन्मान राखला जाईल : रविंद्र चव्हाण
 
भाजपचे प्रदेशचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण नुकतेच अलिबागला आले होते. त्यांनी सुभाष पाटील यांची भेट घेतली आणि आस्वाद पाटील यांच्यासमवेत भाजपमध्ये येण्याची विनंती केली होती. पक्षात तुमचा योग्य सन्मान राखला जाईल, अशी हमी दिली. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.
 
निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही
 
शेकाप नेतृत्वाकडून काम करणार्‍या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नसल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
 
- सुभाष पाटील, माजी आमदार 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121