माणूस आयुष्य जगतो, मात्र ते कशासाठी जगलो हे त्याला व्यक्त करता येत नाही. त्याच्या आयुष्यातील अनेक अनुभव तो जगतो आणि काळाच्या गतीमध्ये हरवतोही. मात्र, मानवी जीवन आणि त्यातील अनुभव यांचे शब्दचित्र असणार्या ‘स्मृतितरंग’ या पुस्तकाचे परीक्षण...
जीवनातील उत्तरायणाचे पर्व सुरू होते आणि मन वेगाने, गतकाळाच्या स्मृतींमध्ये हरवून जाते. आपल्या जीवनाचे संचित नेमके काय? हा विचार सुरू होतो. या विचाराला जेव्हा शब्दांची जोड मिळते, तेव्हा कागदावर उमटतात ते स्मृतितरंग. या पुस्तकाच्या लेखिका वनिता सदानंद करंदीकर आज हयात नाहीत. परंतु, त्यांच्या जीवनातील अनुभूतीचा एक समृद्ध वस्तुपाठ, आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला मिळतो. आयुष्यात आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, आपल्याला अनेक निरनिराळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. परंतु, या अनुभवाकडे बघण्याची, ते समजून घेण्याची दृष्टी बर्याचदा आपल्याकडे नसते. वनिता करंदीकर यांच्या लिखाणाचे वेगळेपण म्हणजे, त्यांनी त्यांच्या भोवतालाकडे निरखून पाहिले. मनामध्ये हा भोवताल टिपला. आपल्यापैकी अनेक जण, रोज रेल्वेचा प्रवास करतात. रेल्वेमधील गर्दी, गोंगाट, धडपड हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच. वनिता यांनी मात्र याच प्रवासातील स्थित्यंतरे, रेल्वे प्रवास करणार्या महिलांचे भावविश्व अत्यंत खुबीने रेखाटले आहे. हे भावविश्व उलगडताना कुठेही वयस्करपणाची छाप त्यावर आढळत नाही.
वनिता यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, मातृहृदयाचा एक भावस्पर्शी आढावासुद्धा घेतला आहे. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला जसे आयुष्य नावाचे कोडे नव्याने उलगडत जाते ना, अगदी तोच प्रकार आहे माणसांच्या बाबतीतही. आपल्याला जन्म देणारी आई नेमकी कशी आहे, याचा एक भावविभोर शोध आईवरील लेखांमध्ये घेण्यात आला आहे. चराचरांत चैतन्य निर्माण करणार्या वसंत ऋतुचा, लेखिकेने घेतलेला आढावा सुखद आहे. वसंत ऋतुमुळे आपल्या भोवताली होणारे परिवर्तन, अत्यंत नेमक्या शब्दात लेखिकेने टिपले आहे.
‘स्मृतितरंग’ या पुस्तकातील लेखांचे वेगळेपण यात आहे की या लेखांचे विषय केवळ व्यक्तिकेंद्रित न राहता, या लेखांच्या माध्यमातून त्यांनी समाजमनाविषयी व्यापक चिंतन मांडले आहे. ललित लेखन करताना, लेखिका समाजमनाच्या अंतरंगात डोकवायला विसरलेल्या नाहीत. माणसाला समाजापासून वेगळे करता येत नाही. माणूस आणि समाज हे दोन्ही घटक एकमेकांना परस्परपूरकच आहेत, याची प्रचिती आल्यावरच लेखिकेने आपले चिंतन मांडले आहे. लेखक आणि समाजातील नात्याचे हे एक वेगळे रूप, आपल्याला या माध्यमातून बघायला मिळते. समाजाला एकत्र आणण्यासाठी ज्या उत्सवांचा जन्म झाला, आज त्याच उत्सवांचे बाजारीकरण झाले आहे. या उत्सवांचे स्वरूप बदलता येईल का? असा प्रांजळ प्रश्नसुद्धा लेखिका करतात. भारतीय राजकारणात महिलांची टक्केवारी, यावर बर्याचदा चिंता व्यक्त केली जाते. परंतु, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते थेट राष्ट्रपतिपदाची धुरा सांभाळणार्या महिलांचे उदाहरण देत, लेखिका उमेद जागृत ठेवतात. ‘राष्ट्र सेविका समिती’चे कार्य, समर्थ रामदासांना अभिप्रेत असलेला राष्ट्रधर्म, यांविषयीचे एक व्यापक चिंतन या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते. वृद्धाश्रम या गोष्टीबद्दल प्रतिकूल विचार करणारे अनेक लोक आपल्याला भेटतील परंतु, वृद्धाश्रमाच्या नाण्याची दुसरी बाजू लेखिकेने अत्यंत योग्य शब्दात मांडली आहे.
‘अथा तो गान जिज्ञासा’ म्हणत, संगीताचे सूर आपल्याला शब्दांच्या माध्यमातून नव्याने उलगडत जातात. ‘हिंदू संस्कृतीमध्ये गुरूशिष्य परंपरेला विशेष महत्त्व’ याविषयावर लेखिकेने केलेले भाष्य, वाचण्याजोगे आणि मूळातून समजून घेतले पाहिजे. एकीकडे सण-समारंभातून मुशाफिरी करताना, संस्कृतीची विविध पाने लेखिका उलगडत जातात आणि अचानक मग, मधेच इच्छामरणासारखा एक गंभीर विषय काळजाला चटका लावून जातो. आपल्या वाटेला येणारे कडू गोड अनुभव आपल्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, ज्यांना स्वीकारून पुढे जात राहिला हवे असा विचार यामधून लेखिका मांडतात.
या पुस्तकाचे वेगळेपण हेच की, शब्दसंख्या आणि रचनेच्या मानाने यातील लेख छोटे आहेत. हीच गोष्ट या पुस्तकाची खासियत आहे. मोजक्याच शब्दांमध्ये लेखिकेने योग्य तो संवाद साधला आहे. बर्याचदा शब्दबंबाळ लेखनामध्ये, लिखाणाचे सार हरवण्याची शक्यता जास्त आहे. परंतु, लेखन आणि संपादन करताना, या दोन्ही गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे. वनिता करंदीकर यांच्या मृत्यूपश्चात, त्यांचे हे पुस्तक प्रकाशित झाले. आज त्या आपल्यात नसल्या, तरी त्यांची शब्दसंपदा येणार्या काळात सर्व वाचकांना मार्गदर्शन करत राहील यामध्ये शंका नाही.