जे प्रभू श्रीरामांनाही चुकले नाही, ते मनुष्याला कसे चुकेल?

    13-Apr-2025
Total Views | 9
prabhu sriram vanvas


राणी असून सीतामातेला अग्निपरीक्षा द्यावी लागली, हे आपण लहानपणापासून ऐकले, वाचले. तसेच, रामायणात ‘उत्तर कांड’ होते की नव्हते, यावरील वादविवाद आपण नेहमीच ऐकत असतो. पण, त्रेतायुगात जन्मलेल्या प्रभू श्रीरामांना आपल्या अस्तित्वाची परीक्षा कलियुगात द्यावी लागेल, हे कदाचित साक्षात प्रभूंनाही वाटले नसावे.

दुर्दैवाने आजही असे अनेक हिंदू आपल्यासोबत आहेत, जे प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वाबद्दल गुप्तपणे साशंक आहेत. आजही या शंकासुरांना ‘रामसेतू’ रामकालीन वाटत नाही. त्यांच्या मनात आजही कुठेतरी ती शंका आहे, याचे श्रेय आपल्या लहानपणीच्या संस्कारांना द्यावे की, आपल्या कच्च्या इतिहासाला हे मला आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहे. गुरू-शिष्य परंपरेमध्ये, पुस्तकांना फारसे महत्त्व नव्हते. कारण, एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे मुखोद्गत पाठ, सदैव परावर्तित व्हायचे. पण, जेव्हा आपली विद्यापीठे परकीय आक्रमकांकडून आगीच्या भक्ष्यस्थानी गेली, तेव्हा हीच शिक्षणपद्धती आणि याच शिक्षण पद्धतीमुळे जपलेला इतिहास आपल्या कामी आला. माझा आजचा विषय ‘प्रभू श्रीराम होते की नाही?’ हा नाहीच. कारण, तो वादाचा विषय आहे असे मला कदापि वाटत नाही. आज मी लिहिते आहे, ते नुकत्याच संपन्न झालेल्या रामनवमीच्या निमित्ताने...

आपल्या समाजामध्ये एक समज खूप खोलवर रुजला आहे की, सनातन आणि हिंदुत्व म्हणजे रूढीपरंपरांनी बरबटलेली विचारधारा. पण, हिंदू धर्माची व्यापकता समजायला, दोन उदाहरणे मला पुरेशी वाटतात. पहिल्या उदाहरणासाठी, मला रामायणातली एक कथा इथे मुद्दाम उद्धृत करावीशी वाटते. प्रभू श्रीरामांनी वनवासात जायचे ठरवले. वनवास 12 वर्षांचा की 14 वर्षांचा, असे काहीच कैकयीमातेने म्हटले नव्हते किंवा मागितलेही नव्हते. फक्त भरताला राज्य करता यावे, ही तिची अट होती. तरीही प्रभू श्रीरामांनी वनवासात जायचे ठरवले. वनवास कदाचित एक वर्षाचा किंवा काही महिन्यांचाही असू शकत होता. पण, ते प्रभू श्रीराम होते. त्यांनी वनवास 14 वर्षांचा स्वीकारला. बरं, वनवासाला जाताना जेव्हा सर्व प्रजा त्यांच्या पाठीशी उभी होती, तेव्हा प्रभू श्रीरामांना त्यांना आज्ञा करावी लागली की, “तुम्ही परत जा. माझ्यासोबत वनवासाला फक्त मी, सीता आणि लक्ष्मणच जाऊ.” अयोध्येच्या दारात उभी असलेली ही सर्व जनता, आपल्या परमप्रिय राजाचा आदेश ऐकून परतली. परत सांगते, प्रभू श्रीरामांनी आज्ञा केली होती स्त्री, पुरुष, लहान मुलं अशा सगळ्यांनीच मागे फिरावे.

14 वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येत परतले तेव्हा त्यांनी बघितले की, किन्नर समाजाचे लोक त्यांची प्रतीक्षा करत त्या प्रवेशद्वारावरच उभे होते. प्रभू श्रीरामांनी जेव्हा एका किन्नराला विचारले की, “तुम्ही इथेच का उभे आहात?” तेव्हा त्या किन्नराने सांगितले की, “14 वर्षांपूर्वी तुम्ही सर्व जनतेला स्त्री-पुरुष, लहान मुलं अशा सगळ्यांना आपल्या घरी परत जावे, असा आदेश केला होता. पण, आम्ही ना पुरुष, ना स्त्री. मग आम्ही काय करावे? या उत्तराच्या प्रतीक्षेत 14 वर्षे आपली वाट पाहत, आम्ही या द्वारावरच थांबलो होतो.” आपल्या राजाप्रतिची किन्नरांची ही भक्ती आणि समर्पण ऐकून, प्रभू श्रीरामांनी त्यांना आशीर्वचन दिले होते की, “कलियुगात जनता तुमचा समाज म्हणून स्वीकार करेल.” असे म्हणून, अयोध्येत किन्नरांचे स्वागत केले. प्रभू श्रीरामांचे हे आशीर्वचन कलियुगामध्ये सत्य झाले, जेव्हा 2012 साली ‘नालसा’ (राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण)मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये, किन्नरांसाठी (ट्रान्सजेंडर), त्यांच्या अधिकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. पुढे 2020 साली केंद्र सरकारने, ‘ट्रान्सजेंडर अ‍ॅक्ट’ अस्तित्वात आणला आणि स्त्री-पुरुष नंतर आज आपण प्रत्येक फॉर्ममध्ये ‘ट्रान्सजेंडर’ हा तिसरा पर्याय बघतो आहोत. एवढेच नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेले अधिकार हे समाजामध्ये त्यांना स्वीकृती मिळावी, त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले जावे, यादृष्टीने केलेले प्रयत्नच आहेत.

मला आठवत नाही की, कधी कुठल्या अन्य धर्मांतील देवाला अशा अस्तित्वाच्या परीक्षेला सामोरे जावे लागले असेल. सांगायचे तात्पर्य एवढेच की ज्यांना असे वाटते की, सनातन धर्म हा फार रूढी-परंपरांनी बरबटलेला आहे, त्यांनी यावरून हे लक्षात घेतले पाहिजे की, सनातन धर्म हा किती महान होता आणि आहे. तसेच, सनातन धर्म मोठ्या व्यापक विचारसरणीचा होता, हे रामायणातल्या या उदाहरणावरून आपल्याला समजते. मानवी हक्कांची असो किंवा आधुनिकतेशी संबंधित असो, असा कुठलाही अधिकार, कुठलीही भावना ही हिंदू धर्माशी संलग्न असूच शकत नाही, ही समाजातील रूढ भावनाच मला या सत्यघटनेतून उखडून फेकायची आहे. प्रभू श्रीराम हे केवळ आमचे दैवत नाही, तर ही आमची ओळख आहे; हे ज्या दिवशी समाज समजेल, त्या दिवशी कदाचित अस्तित्वाचा विषय किंवा प्रश्नच उद्भवणार नाही.

दुसरे उदाहरण म्हणजे, माझा अवघा नऊवर्षीय मुलगा जेव्हा मला विचारतो की, “आई, मला गौतम बुद्धांची विचारसरणी खूप आवडते. मग मला धर्मपरिवर्तन करावे लागेल काय?” पण, बुद्ध हे तर कृष्णाचा अवतारच ना? तेव्हा हिंदू धर्माची व्यापकता, मोठेपणाचे आकलन हे पुढच्या पिढीला देताना, आपणच कुठे तरी कमी तर पडत नाही ना? या आत्मचिंतनाची आज नितांत गरज आहे. जेव्हा आपल्या इतिहासाचा अभ्यास कमी पडतो, आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आस्था जेव्हा डगमगते, आपले बालपणीचे संस्कार कुठेतरी कमी पडतात, तेव्हाच अशा अस्तित्वाच्या शंका-कुशंका मोठ्या होत जातात. मग हीच साशंक पिढी, पुढे जाऊन ‘समाज’ बनते आणि मग कलियुगातही श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात आणि नावे ठेवली जातात.

समाज सोडा, आपल्या पुढच्या पिढीला तरी आपल्या पौराणिक इतिहासाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल आदर असावा, इतपत तरी स्वतःची इच्छाशक्ती जागृत होऊ द्या, हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना.

अ‍ॅड. क्षितिजा वडतकर-वानखेडे
(लेखिका मुंबई उच्च न्यायालयात विधिज्ञ आहेत.)

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121