'तो' दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय :पंतप्रधान नरेंद्र मोदी
13-Apr-2025
Total Views | 21
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १३ एप्रिल रोजी सकाळी आपल्या एक्स मिडीया हँडल वरुन समस्त भारतीयांना बैसाखीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. उत्तर भारतामध्ये बैसाखीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावेळी १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला हत्याकांडाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की "हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे."
जालियनवाला बाग येथे नेमके काय घडले होते ?
इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतात, मोठ्या प्रमाणात भारतीयांचे शोषण केले जात असे. १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे हजारो लोक बैसाखीचा पवित्र सण साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे सत्यपाल व सैफुदीन किचलू यांच्या अटकेच्या विरोधात काही लोकं निदर्शनं करत होती. अशातच जनरल डायर आणि पोलिसांनी जलियनवाला बाग येथे प्रवेश करत बाहेर जाण्याचे सगळे रस्ते बंद केले. यानंतर जनरल डायर आणि पोलिसांनी बेछूट गोळीबार करत हजारो लोकांचे प्राण घेतले. यामध्ये निष्पाप लहान मुलं तसेच बायकांचा सुद्धा समावेश होता.
पंतप्रधान काय म्हणाले ?
जालियानवाला बाग येथे घडलेल्या हत्याकांडाविषयी भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की हा भारताच्या इतिहासातील काळा अध्याय होता. जालियनवाला बाग येथील लोकांच्या बलिदानामुळे भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. येणाऱ्या पिढ्या त्यांचे बलिदान कदापि विसरणार नाही.