डॉ. आंबेडकर यांचे कार्य व्यापक असेच आहे. विविध क्षेत्रातील धोरणनिर्मितीमध्ये त्यांचे स्वातंत्र्यपूर्व योगदान अतुलनीय असेच. देशाच्या समोर आलेल्या कोणत्याही समस्येकडे, समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना शोधण्याच्या वृत्ती त्यांच्या ठायी होती. देशासमोरील आव्हानांवर त्यांनी सांगितलेल्या उपायांचा त्यांच्या जयंतीनिमित्ताने घेतलेला मागोवा...
एकात्मता म्हणजे एक+आत्म+ता. आत्म म्हणजे आपण (स्व). एकात्मता म्हणजे आपली ओळख, आपला स्व एकच असण्याची स्थिती. भारतीय एकात्मता म्हणजे, केवळ भारतीय एवढीच आपली ओळख असणे. याच्याहून लहान गटाची ओळख आपल्याला महत्त्वाची वाटणे, म्हणजेच एकात्मतेला धोका. डॉ. आंबेडकर एकात्मता याचा अर्थ ‘सांस्कृतिक एकात्मता’ असा घेत असत. “वांशिक एकात्मता कुठल्याच देशात नाही. पण, सांस्कृतिक एकात्मता भारतात सर्वात जास्त आहे,” असे ते म्हणत. (It is the unity of culture that is the basis of homogeneity. Taking this for granted, I venture to say that there is no country that can rival the Indian Peninsula with respect to the unity of its culture.)
डॉ. आंबेडकरांना एकात्मतेच्या विरुद्ध जाणारे चार मुख्य धोके दिसत होते : जात, फेडरल राज्यव्यवस्था, भाषा व त्यावर आधारित प्रांत व्यवस्था आणि पाकिस्तान व द्विराष्ट्रवाद या प्रत्येक विषयावर डॉ. आंबेडकरांनी, विस्तृत भाष्य केले आहे. त्यात हा प्रत्येक प्रश्न निकालात कसा काढायचा, या विषयावर एक किंवा अधिक स्वतंत्र पुस्तके लिहिली आहेत. त्यातील पहिला ‘जात’ हा विषय सोडला, तर उर्वरित विषयांवर त्यांनी व्यक्त केलेल्या मतांना फार प्रसिद्धी दिली जात नाही. कारण, ही मते तथाकथित पुरोगामी विचारवंतांच्या पूर्ण विरुद्ध आहेत. या सर्व विषयांचा क्रमाक्रमाने विचार करू.
जात : या विषयावर बाबासाहेबांनी विपुल लेखन केले आहे. तरी त्यात सगळ्यात महत्त्वाची तीन पुस्तके म्हणजे 'Castes in india : Their Mechanism, Genesis and Development', 'Who were shudras' Am{U 'Annihilation of castes' या पुस्तकांचा एकत्र अभ्यास केला तर असे दिसते की, “भारतीय-हिंदू समाज हा एक एकजिनसी समाज होता. त्यात जर अनेक वंश आले असतील, तर ते एकत्र मिसळले गेले होते आणि त्यांची संस्कृती एकरूप झाली होती” असे बाबासाहेबांचे मत होते. अशा एकजिनसी एकात्म समाजाचे कृत्रिमरित्या तुकडे करून (Artificial chopping off), निरनिराळ्या जाती तयार झाल्या. त्या जातींना वांशिक आधार नाही, असे ते म्हणत. तथाकथित उच्च जाती ही बाहेरून आलेले आर्य व तथाकथित खालच्या जाती ही एतद्देशीय मूलनिवासी दस्यू हा सिद्धांतसुद्धा, ते केराच्या टोपलीत टाकतात. ‘आर्यवंश आक्रमण सिद्धांत’ पूर्ण चुकीचा आहे, हे त्यांनी निःसंदिग्धपणे मांडले आहे.
त्यामुळे अर्थातच जातिभेद या दोषावर उपाय केवळ भेद, उच्चनीचता नष्ट करणे एवढाच नसून, मुळात जातिव्यवस्था आणि चातुर्वर्ण्य हेच पूर्ण नष्ट करणे (Annihilation of caste) हा आहे, असे त्यांचे प्रतिपादन आहे. थोडक्यात जात नको, म्हणजे भेदसुद्धा नको. जातरहित एकात्म समाज असावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी वाटेल त्या टोकाला जायची त्यांची तयारी होती. त्यांनी स्वतःला ‘प्रोटेस्टंट हिंदू’ म्हणवून घ्यायचा प्रयत्न केला. पौरोहित्यासाठी ‘सिव्हिल सर्विस’सारखी सरकारी परीक्षा घ्यावी व ती सर्व जातींना खुली असावी, अशीही त्यांची सूचना होती. जातिभेद असेपर्यंत कोणालाही हिंदू धर्मात घेणे अशक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. सवर्ण हिंदूंनी वनवासी बांधवांना सुशिक्षित न केल्यास ते मिशनर्यांच्या हातात जातील व हिंदूंच्या शत्रूची ताकद वाढेल, अशी भविष्यवाणी त्यांनी करून ठेवली होती (आज मणिपूरकडे बघा.) सनातनी हिंदूंनी त्यांच्या सूचना न मानल्यास, राष्ट्रीय हिताला धक्का न लावता धर्मांतरसुद्धा करायची त्यांची तयारी होती.
म्हणजेच जात ही संस्थाच नष्ट झाली की, त्यापासून एकात्मतेला असलेला धोकासुद्धा नष्ट होईल असा त्यांचा सरळसोट हिशोब होता. जात नाही ती जात, हा सिद्धांत नाकारायचा त्यांनी प्रयत्न केला.
फेडरल राज्यव्यवस्था : डॉ. आंबेडकरांना फेडरल व्यवस्थेचा तिटकारा होता. यामुळे भारताची केंद्रीय सत्ता व एकात्म ओळख दुबळी होईल, अशी त्यांना काळजी होती. इंग्रजांच्या काळात केंद्रीय स्वायत्तता न देता, प्रांतिक स्वायत्तता द्यायला इंग्रज तयार होते. तात्पुरती तडजोड म्हणून, बाबासाहेब फेडरल व्यवस्था स्वीकारायलाही तयार होते. पण, “I confess I have a partiality for a unitary form of Govrrnment. I think India needs it (मला एकात्मिक राज्यपद्धती जास्त आवडते. मला वाटते भारताला त्याची आवश्यकता आहे),” असे त्यांनी 'federation vs freedom' या भाषणात म्हटले आहे. त्यांनी 'states and minorities' (राज्ये आणि अल्पसंख्यांक) नावाचा एक लेख, मार्च 1947 मध्ये लिहिला. त्यात त्यांच्या मनातल्या राज्यघटनेचा आराखडा दिला आहे. (हा आराखडा आपल्या अधिकृत राज्यघटनेपेक्षा बराच वेगळा आहे.) पण, त्या आराखड्यातसुद्धा ‘फेडरल’ हा शब्द त्यांनी येऊ दिलेला नाही. दि. 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालेल्या राज्यघटनेतसुद्धा ‘युनियन’ असा शब्द आहे. शक्तिमान केंद्रीय सत्ता आणि प्रांतांना कमी अधिकार,असे बाबासाहेबांच्या मनातल्या राज्यघटनेचे स्वरूप आहे.
आज तथाकथित घटनाप्रेमी लोक बाबासाहेबांचे नाव घेत फेडरल व्यवस्थेचा पुरस्कार करतात, त्यातला विरोधाभास टोचत राहतो.
भाषावार प्रांतरचना : जर प्रांतरचना भाषेच्या आधारावर केली, तर प्रत्येक प्रांत हे एक छोटसे राष्ट्र होईल. भाषिक अस्मिता निर्माण होतील. प्रांत केंद्र सरकारचे ऐकणार नाहीत. जर प्रांतिक भाषा या प्रांतांच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा झाल्या, तर केंद्र व प्रांत यांमधला संवाद कठीण व अशक्य होऊन बसेल. सर्वोच्च न्यायालयात प्रत्येक प्रांतिक भाषेत काम करावे लागेल. अशा प्रकारचे मुद्दे डॉ. आंबेडकरांनी मांडले आहेत.
त्यावर उपाय सांगताना ते म्हणतात की, भाषावार प्रांतरचना तर टाळता येण्यासारखी नाही. पण, त्यातून जर एकात्मतेला निर्माण होणारा धोका टाळायचा असेल, तर कुठल्याही भाषिक प्रांतात अधिकृत कामकाज, केंद्र सरकारच्या अधिकृत भाषेतूनच (हिंदीमधून) झाले पाहिजे.
पाकिस्तान आणि द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत : डॉ. आंबेडकरांनी जातिभेद हा कृत्रिम व अनैसर्गिक ठरवून, मुळापासून उखडून टाकायचा सल्ला दिला होता. फेडरल पद्धती ही माणसांनी लिहिलेल्या घटनेवर अवलंबून असल्याने, त्यांनी फेडरेशनच्या ऐवजी ‘युनियन पद्धती’ वापरायचा सल्ला दिला. जेव्हा घटनेच्या रचनेत त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले, तेव्हा त्यांनी घटना फेडरल न करता युनियन केली. भाषाभेद पूर्णपणे नाकारणे तर अशक्य होते. पण, राज्यव्यवहाराची भाषा केंद्रीय भाषाच असावी असा नियम सुचवून, त्यातील प्रांतिक अस्मिता किंवा उपराष्ट्रवादाचा धोका कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
पण, पाकिस्तान व द्विराष्ट्रवाद यावर कुठलाही उपाय त्यांना शक्य दिसला नाही. जेव्हा मूळ ओळखच भारतीय नसेल किंवा उघड भारतविरोधी असेल, तेव्हा अशी दोन राष्ट्रे एका देशात कोंबण्यापेक्षा, सरळ एक घाव दोन तुकडे करणे त्यांना श्रेयस्कर वाटले. त्यासाठीच त्यांनी पाकिस्तान किंवा भारताची फाळणी नावाचे एक पुस्तक लिहिले. त्यात पाकिस्तान निर्माण होणेच योग्य ठरेल, असे मत मांडले आहे.
त्यामध्ये ज्यांना पाकिस्तान हवा आहे त्यांना भारतात ठेवायचा प्रयत्न केला, तरी त्यांच्या निष्ठेबद्दल साशंकता असल्याने कसा धोका होऊ शकतो. मुख्यतः आपल्या सशस्त्र सेनेमध्ये पाकिस्तान समर्थक लोक असल्यास, भारताच्या सुरक्षिततेवर कसा मूलभूत वाईट परिणाम होऊ शकतो, इत्यादी मुद्दे त्यांनी प्रभावीपणे मांडले आहेत. याच पुस्तकात त्यांनी, लोकसंख्येच्या आदलाबदलीची कल्पनाही मांडली आहे. फाळणीनंतर लिहिलेल्या एका लेखात, पाकिस्तान वेगळा झाल्यावर भारत जास्त एकात्म व सामर्थ्यशाली झाला आहे असेही ते म्हणतात. थोडक्यात जे स्वतःला भारतीय म्हणवून घ्यायला तयार नाहीत, त्यांना भारतात ठेवल्याने एकात्मता वाढत नाही असे त्यांचे मत होते.
अशा प्रकारे एकात्मतेला आव्हान देणार्या चार मुद्द्यांना बाबासाहेबांनी वेगवेगळी उत्तरे सुचवली होती.
जात : जातिव्यवस्था नष्ट करा (annihilation),
फेडरल पद्धत : अंगीकारू नका,
भाषावार प्रांत : जरी तयार केले, तरी तेथील भाषिक अस्मिता धोकादायक होऊ देऊ नका,
पाकिस्तानी द्विराष्ट्रवाद : पाकिस्तान समर्थकांना वेगळा देश देऊन टाका आणि उर्वरित एकात्म भारतात आपण सुखाने राहू.
भारतीय एकात्मतेला आव्हान देणार्या या समस्यांवर विचार करणे, यातूनच बाबासाहेबांची दूरदृष्टी दिसून येते.
डॉ. प्रमोद मनोहर
(लेखक प्रिव्हेन्टिव्ह कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतात. त्यांच्याकडे ‘प्रज्ञा प्रवाह कोकण प्रांता’ची विमर्श आयाम प्रमुख अशी जबाबदारी आहे.)