उन्हाळ्यात बालनाट्य शिबिरांचा गारवा

    13-Apr-2025
Total Views | 23
Childrens drama


परीक्षांचा हंगाम संपला की, विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांचे शोधकार्य सुरू होते. त्यात अनेक कलांची शिबिरे याच काळात भरतात. यात नाट्यकलेकडे सर्वांचाच कल काहीसा जास्त. या शिबिरांचे महत्त्व, शिबिरांमध्ये मुलांना पाठवताना पालकांची मनस्थिती या सर्वांचा घेतलेला आढावा...

उन जरा जास्त आहे, असे मला दरवर्षी वाटते. उन्हाळ्याच्या तडाख्याने पाटी फुटते, शाळेला सुट्टी लागते. भर उन्हात पाऊस घेऊन, बालनाट्याचे स्वप्न मनात घर करून बसते. आठवून बघा तुमचे बालपण, बालपणी उन्हाळ्याची सुट्टी लागणे म्हणजे ‘अच्छे दिन आ गए’ असेच वाटायचे की नाही? म्हणजे आता अभ्यासाला सुट्टी, कूलरच्या थंड प्रदेशात स्वप्नरंजन करायचे, हापूस आंबे खायचे, मामाच्या गावाला जायचे. हे तर करायचेच; पण आणखीन काहीतरी नवीन करून पाहायचे. एखादा वैकल्पिक उपक्रमाचा क्लास लावायचा. मग त्यामध्ये ट्रेकिंग, स्विमिंग, नृत्यकला, चित्रकला आणि नाट्यकलेचा क्लास लावायचा. तुमच्यापैकी कोणी कोणी हे असे केले आहे? माझी आई म्हणायची, सगळे करून पाहायचे आणि त्याची पाहणी करायची वेळ म्हणजेच उन्हाळ्याची सुट्टी. आपल्याला काय आवडतेे, जमते हे बघून झाले की, मग त्याचा क्लास शाळा सुरू झाल्यानंतरही लावायचा. पण, त्याहीपेक्षा इतर शाळेतल्या, लहान मोठ्यांशी मैत्री करणे आणि त्यांच्याबरोबर आयुष्य जगणे, हेच खरे कारण होते. आईवडील मात्र विचारायचे, “मज्जा आली चांगली गोष्ट आहे पण, शिकलास काय?” खरेतर शिकणे महत्त्वाचे असतेच, त्यावर वर्षभर भर दिलाच जातो. मग निदान मुलांना मुलांसारखे राहून खेळीमेळीच्या वातावरणात जेवेढे शिकता येईल, तेवढे शिकू देण्यातच शहाणपणा आहे.

मला नेहमीच स्वच्छंदपणे जगता आले ते नाट्यशिबिरांमध्ये. माझी मी मला सापडणे, नवीन काहीतरी करून पाहणे, व्यक्त होणे, इतर मुलांना व्यक्त होताना पाहणे, अनुभवांचे गाठोडे मोठे करणे, हे सारे मी नाट्यशिबिरांमधून केले आहे. आजही अनेक किस्से मला आठवतात. हसणे, रडणे, फुगून बसणे, रागावून हसणे आणि खदाखदा, लोटपोट होऊन जमिनीवर लोळणे. जोरदार भांडणे झालेलीही, मी पाहिली आहेत आणि हे सगळे जे आम्हाला शिकवायचे त्या ताईदादांसमोर. नाटक शिकवणार्‍या प्रशिक्षकाची कधी भीती वाटली नाही, फक्त धाक वाटला.

उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे होतात. पण, नाट्यशिबिरे वेगळी का, त्याचे वैशिष्ट्य काय, हे आपण जाणून घेऊ. नाट्यकला जीवन जगण्याची कला शिकवते. पण, खरेच ते शिकवते का? की आपण आपोआप शिकतो? जसे आपण जीवन जगतो, तसेच नाटक जगलो तर आपोआप शिकतो. म्हणजे, त्यातून मिळालेल्या अनुभवातूनच नकळत शिकतो. चालायचे कसे, बोलायचे कसे, वागायचे कसे हे सारे शिकतो.

अर्थातच नाट्यशिबीर आयोजकाने शिबिरार्थींना एकाच शिबिरात वेगवेगळे अनुभव मिळावे आणि सादरीकरणाच्या दृष्टीने रंजक व्हावे म्हणून एक अभ्यासक्रम ठरवलेला असतो. आपले आयुष्यसुद्धा असेच असते नाही का? जीवन जगताना ते प्रेक्षणीय आहे का? माझ्या बरोबरचे सवंगडी आनंदी आहेत का? ते प्रेरणादायी ठरते आहे का? सकारात्मक ऊर्जा कायम राहते आहे ना? असे विचार मनात येतच असतील. अशा भावनांमध्ये शिबिरार्थी गुंतलेले असतात. ‘शिवताला’ नाटकाचा प्रयोग अर्थातच छोटेखानी होतो. त्यातून स्वतःला आनंद तर मिळतोच पण, तोच आनंद इतरांनाही देता येतो.

पण, मग नाट्यशिबीर हे वर्षभराच्या क्लासपेक्षा वेगळे कसे? तर त्याची वेळमर्यादा कमी असते. त्यात त्यांना प्रस्तुतीकरण तर करायचे असतेच पण, नाट्यकलेचा मोठ्या अभ्यासक्रमाला, लहान करून तो शिबिरार्थींना शिकवायचा असतो. म्हणजे थोडक्यात दुधाचे कलाकंद करून शिकवायचे असते. ते करत असताना, फार कठीण पद्धतीने शिकवायचे नसते. शिवाय, आलेल्या प्रत्येकाला नाटकाची निदान गोडी लागावी, हे उद्दिष्टही असते.

जसे जीवन जगायचे म्हणून जगत नाही, तर ते आवडावेही लागते; तसेच नाटक करायचे म्हणून केले जात नाही, ते आवडावेसुद्धा लागते. गेली अनेक दशके मी बालनाट्य शिबीर घेते. सुरुवातीला माझ्या वडिलांना नाट्यशिबीर घेण्यासाठी, साहाय्यक म्हणून काम केले. त्या अगोदर लहानपणी वेगवेगळ्या ठिकाणी शिबिराला गेले आहे. यानिमित्ताने अनेक पालकांना भेटले. त्यामुळे शिकवण्याचा आणि विद्यार्थी असण्याचा मला अनुभव आहे. आजही ते फारसे बदलेले नाही. आजही बालनाट्य शिबीर होतात आणि तितक्याच उत्साहात ती घेतलीही जातात. त्या शिबिरांमध्ये मुलांची संख्याही वाढते आहे. मग यातलीच काही मुले वर्षभरासाठी येतात, तर काही तर सातत्याने तीन-चार वर्षे येतात.

काही पालक आणि माझ्यातला मजेशीर संवाद मी इथे लिहून सांगते आहे.
काय काय शिकवता तुम्ही नाट्य शिबिरात?
अभिनयाचे प्रासंगिक सहा पाठ. अभिनयाचे प्रकार आणि मग सादरीकरण.
मुलाला वही, पुस्तक घेऊन पाठवायचे का?
नाही. कारण भर हा प्रात्यक्षिकावर आहे.
मुलाबरोबर आम्ही पण थांबलो तर चालेल ना? आम्हांलापण बघता येईल.
नाही चालणार. कारण, तुम्ही सतत त्याच्याकडे बघता आहात या दबावाखाली, तो काही करू शकणार नाही आणि मग एकाची आई आली, माझी का नाही येऊ शकत? असे म्हणत सगळीच मुले मागे लागतील.
पण, मग आम्हांला कसे कळेल तो काय शिकतो आहे ते?
त्याला तुम्ही विचारा, त्याला सारखे सारखे नाटकाच्या शिबिरात जावे वाटते का? तो किती आनंदात आहे ते बघा, म्हणजे तुम्हांला कळेल की, तो नक्कीच काहीतरी शिकतो आहे.
त्याला कोणती भूमिका देणार? माझ्या मुलाला चार वाक्य दिली आहेत. एवढी कमी का?
हा सामूहिक गाण्याचा किंवा नृत्याचा क्लास किंवा शिबीर नाही. त्याला त्याच्या वाटणीची वाक्ये आली आहेत. त्याची उंची, त्याचे वय आणि अभिनयाची समज लक्षात घेता, त्याला भूमिका देण्यात आली आहे. तो खूश असेल, तर तुम्हांला दुःखी होण्याचे कारण नाही.
 
याच्याकडून काही पाठांतर करून घ्यायचे आहे का? हा काहीच सांगत नाही घरी. त्याला काही येते तरी का? नाटक नेमके काय आहे, आम्हांला काही सांगत नाही. त्याच्याकडून काही पाठांतर करून घ्यायचे नाही. कारण, पाठांतर ते शिबिरातच करतात. तुम्हांला ते नाटक कोणते करणार आहोत आणि ते कोणते काम करणार आहे, हे सांगणार नाहीत, याची दोन कारणे आहेत. एक तर आमचे गुपित, नाटकाचा विषय आणि त्याचा शेवट तुम्हांला समजला, तर मग तुम्हांलाच मजा येणार नाही. शिवाय कोणती भूमिका करतो आहेस हे तुम्हाला सांगितले, तर तुम्ही त्याला उलट प्रश्न विचारू शकता, जसे की तुला हीच भूमिका का मिळाली, ते का नाही मिळाले? मी सांगतो, तुला काय करायला पाहिजे. मग तुम्ही त्याला काहीतरी सांगाल, मग त्याचे दोन शिक्षक होतील. त्याला कळणार नाही कोणाचे ऐकायचे ते. माझी मुलगी खूप आनंदात दिसते आहे. सतत नाटकाचा विचार करते. हे साधे नाही ना? नेमके तुम्ही करता काय?

ती आनंदात आहे, म्हटल्यावर चांगली गोष्ट आहे. चांगल्या गोष्टींवरच शंका घेण्याची सवय असते. ती सवय आपण आधी मोडूया. ध्यास लागल्याशिवाय, यश मिळत नाही. सतत विचार करते, हे तर चांगले लक्षण आहे.
मुले खूप खूश आहेत. आम्हाला पण तुमच्या शिबिरात मदतनीस म्हणून घ्या.
तुम्ही येऊ शकता. पण, अट एकच तुमचा मुलगा किंवा मुलगी यांच्याकडे लक्ष न देता, सेवाभावी पडेल ते काम करायची तयारी हवी. पूर्ण दिवस तसेच वेळेवर येणे अनिवार्य राहील. एवढ्या अटी ठेवूनसुद्धा मला नेहमीच पालक वर्ग साहाय्यक म्हणून मिळाले आहेत.
शिबीर संपले आता पुढे काय? तुम्ही टीव्ही मालिका, सिनेमांमध्ये संधी देणार का?
हे कास्टिंगचे शिबीर नाही, नाट्यशिबीर आहे. त्यामुळे इथून पुढे त्यांना, नाटकात अजून चांगले काम करता येईल. काम मिळणे हे बर्‍याचदा नशिबाचा भाग असतो. त्यातूनही मला विचारणा आली की, मी मुलांची नावे सुचवतेच.
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी शांतपणे आणि प्रेमाने, हळूहळू मुद्देसूद बांधणी करत, त्यांची मन जपत सांगते. लिहिताना मात्र मी थोडक्यात उत्तर मांडले. मी जाणते माझ्याकडे येणारे पालक, हे भिन्न भिन्न क्षेत्रातील, राहणीमानाचे, विचारधारांचे असतात. त्यांच्या अपेक्षा खूप असतात आणि त्यांना नाट्यशिबीर म्हणजे नेमके काय, हेच माहीत नसते. मला वाटते नाटक हे बालपणीच प्रत्येकांनी शिकायला हवे. पण, शाळेत न शिकता ते जाणकार शिक्षकाकडून शिकायला हवे. सर्वांत महत्त्वाचे, शिक्षकाचे मुलांवर प्रचंड प्रेम हवे.

सध्या माझे प्रचंड व्यस्त वेळापत्रक आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत भरपूर शिबिरे आहेत. या वेळेला तर मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर येथे तिथल्या मुलांना नाटकाची गोडी लावण्यासाठी मी जाते आहे. ज्यांना गोडी लागलेली आहे, त्यांना नाट्यकलेत परिपक्व करण्यासाठी सातत्य हवेच. कारण काही असो, नाट्यकलेकडे व्यापक दृष्टिकोनाने पाहायला हवे आणि मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने नाटक शिकवायला हवे. ते कसे, याबद्दल कधीतरी नंतर सांगेन. तूर्तास बालनाट्य शिबिराला जाण्याची वेळ झाली आहे. माझी मुले पोहोचण्याअगोदर, मला पोहोचायला हवे. ऊन जरा जास्त आहेच. पण, दरवर्षी नाटकाला बहर येण्याची वेळ हीच, ती चुकवून चालणार नाही. यंदा हापूस आंब्याचा गोडवा काही औरच आहे नाही!
 
रानी-राधिका देशपांडे
raneeonstage@gmail.com
अग्रलेख
जरुर वाचा
दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला; वक्फ बोर्डावरून महत्त्वपूर्ण चर्चा; काय घडलं?

दाऊदी बोहरा समुदायाचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला; वक्फ बोर्डावरून महत्त्वपूर्ण चर्चा; काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी गुरुवारी दाऊदी बोहरा समुदायाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. त्यात व्यापारी नेते, व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षक आणि दाऊदी बोहरा समाजातील अनेक प्रमुख प्रतिनिधींचा समावेश होता. उपस्थितांनी वक्फ बोर्डासोबत असलेल्या आपल्या संघर्षाबद्दल सांगितले. शिष्टमंडळाने त्यांच्या समाजातील सदस्यांच्या मालमत्तेवर वक्फने चुकीचा दावा कसा केला हे देखील स्पष्ट केले. वक्फ दुरुस्ती कायदा आणल्याबद्दल शिष्टमंडळाने पंतप्रधानांचे आभार मानल्याचे दिसून आले. PM talk ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121