आहे चोरी तरीही...

    13-Apr-2025   
Total Views | 14

 Lama
‘चॅट जीपीटी’, ‘जेमिनी’ यांच्याप्रमाणेच ‘लामा’ या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मॉडेलचीही इंटरनेटवर चलती आहे. ‘लामा’ हे मॉडेल यशस्वीरित्या कार्यरत होण्यासाठी, या मॉडेलला मोठ्या प्रमाणात डेटा दिला जातो. याच डेटाच्या माध्यमातून ‘लामा’ नवनिमिर्तीचा आविष्कार घडवतो. परंतु, या आविष्कारामुळे लेखकांवर संक्रांत आली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे विस्तारणारे परीघ आता भल्याभल्यांसाठी चिंतेचा विषय ठरू लागले आहेत. एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बदलांना आत्मसात करत असताना लोकांची दमछाक होत आहे, तर दुसर्‍या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी ‘डेटा’चे लागणारे खाद्य पुरवताना, चक्क कायद्याची पायमल्ली केली जात आहे. ‘चॅट जीपीटी’, ‘जेमिनी’ यांच्याप्रमाणेच ‘लामा’ या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मॉडेलचीही इंटरनेटवर चलती आहे. ‘लामा’ हे मॉडेल यशस्वीरित्या कार्यरत होण्यासाठी, या मॉडेलला मोठ्या प्रमाणात डेटा दिला जातो. याच डेटाच्या माध्यमातून ‘लामा’ नवनिमिर्तीचा आविष्कार घडवतो. परंतु, या आविष्कारामुळे लेखकांवर संक्रांत आली आहे.
 
इंग्लंडमध्ये राहणार्‍या जॅक स्ट्रेंज या तरुण लेखकाला एक दिवस लक्ष्यात आले की, त्याच्या परवानगी शिवाय त्याच्या लिखणाचा ऑनलाईन वापर केला जातो आहे. ‘लिब-जेन’ नामक एक ऑनलाईन वेबसाईटवर लाखो पुस्तके आणि शोधनिबंध उपलब्ध आहेत, त्यांचा वापर ‘मेटा’ने ‘लामा’च्या विकासासाठी केला. यातील सगळ्यात मोठी अडचण हीच आहे की, अशा रितीने पुस्तकांचा, माहितीचा वापर करताना कुठल्याही प्रकारे लेखकांची परवानगी घेतलेली नाही. यामुळे बौद्धिक संपदा अधिकारांचेदेखील उल्लंघन झाले. जॅक स्ट्रेंज यांच्यासह इंग्लंडमधील अनेक लेखकांनी, या सगळ्या प्रकाराचा निषेध नोंदवला. आयर्लंडमधील सिन फेन या राजकीय पक्षाचे ज्येष्ठ लेखक गेरी अ‍ॅडम्स यांच्यादेखील अनेक पुस्तकांचा असाच बेकायदेशीर वापर झाला. या प्रकरणाच्या विरोधात त्यांनी, न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. अमेरिकेतील एक नामांकित वृत्तपत्राने हा सगळा प्रकार उघडकीस आणला आणि पुरावा म्हणून, जवळपास लाखभर पुस्तकांची यादीच प्रकाशित केली. सदर यादीमध्ये ‘बुकर’ पारितोषिकाने ज्या लेखकांचा सन्मान करण्यात आला, अशा लेखकांचासुद्धा समावेश आहे.
 
उत्तर आयर्लंडचा इतिहास आपल्या लेखणीतून मांडणार्‍या मोनिका मॅकविलियम्स म्हणतात की, “संशोधनातील जगताचा पहिला नियम हाच आहे की, वाचकांना माहितीच्या मूळ स्रोताची जाणीव करून देणे आणि नेमकी हीच गोष्ट इथे घडत नाही. अशा पद्धतीने परवानगीशिवाय जर लिखाणाचा वापर केला जात असेल, तर ‘कॉपीराईट’ या शब्दाला काय अर्थ उरतो?” मोनिका मॅकविलियम्स यांचे अनेक शोधनिबंध ‘लिब-जेन’वर उपलब्ध आहेत. त्यांच्या लिखणातून त्यांना जे मानधन मिळते, त्याचा उपयोग धर्मादाय संस्थांच्या विकासासाठी केला जातो. उद्या जर या लिखणातून पैसेच उभे राहिले नाहीत, तर काय? अशी चिंता त्यांना आता भासू लागली आहे.
 
“जे लिखाण करण्यासाठी दोन दशकांचा कालावधी लागला, त्या साहित्याचा वापर ‘एआय’च्या विकासासाठी केला जात असल्याचे पाहून मन विषण्ण होते,” असे मत प्रख्यात लेखिका क्लेअर अ‍ॅलेन यांनी व्यक्त केले. लेखकांच्या हक्कांसाठी कार्यरत असणार्‍या अनेक संघटनांनी, या सर्व प्रकाराच्या विरोधात आवाज उठवला आहे. ‘रायटर्स गिल्ड’ या संघटनेच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, “लेखनचौर्याचा हा मुद्दा गंभीर असून, या विषयी लोकप्रतिनीधींशी संपर्क साधला गेला पाहिजे.”
 
पायरेटेड पुस्तके, इंटरनेटवर सहजगत्या उपलब्ध होणारी पुस्तके हा मुद्दा काही नवीन नाही. ‘प्रोजेक्ट गुटेनबर्ग’सारखी ई-लायब्ररी, आजमितीला हजारो पुस्तके वाचकांसाठी मोफत उपलब्ध करून देते. परंतु, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून एक नवीन समस्या इकडे जन्माला आली. लेखकांच्या आणि प्रकाशकांच्या परवानगीशिवाय, इंटरनेटवर ही पुस्तके मोफत उपलब्ध असतात. यातल्या डेटाचा वापर करून ‘लामा’सारखे एखादे तंत्र विकसित केले जाईल. यानंतर ‘लामा’च्या माध्यमातून, हव्या त्या लेखकाचे, हव्या त्या शैलीतील लेखन लिहून घेतले जाऊ शकते. या सगळ्या विषयावर भाष्य करताना ‘मेटा’ने कुठल्याही प्रकारे ‘कॉपीराईट’ कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, एवढाच जवाब नोंदवला आहे. परंतु, हा विषय इतका सोपा नसून, प्रचंड गुंतागुंतीचा आहे. एका बाजूला लेखकांच्या मते, त्यांच्या लिखाणाची चोरी होत असते. दुसर्‍या बाजूला इंटरनेटच्या मुक्त दालनातून ‘एआय’ या साहित्याचा वापर करत असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर कॉपीराईट कायदे, प्रकाशन संस्थांचे हक्क, या सर्व विषयांवर व्यापक भूमिकेतून विचार व्हायला हवा आणि या चर्चेत लेखकांसहित सर्व भागीदारांचा समावेश असावा. तरच या समस्येवर योग्य ते उत्तर सापडू शकेल.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121