मुंबईच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ येथे दि. 3 ते 24 एप्रिल दरम्यान आयोजित फ्रेंच चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन सध्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी संकल्पना मांडली आहे ती संशोधक रुक्मिणी डहाणूकर यांनी. त्यांच्या या अनोख्या प्रदर्शनाचा आढावा घेणारा लेख.
पैशाचे कथन हे जगातले सर्वांत यशस्वी कथन आहे. पैशाचे स्वतःचे असे काही मूल्य नाही. देशविदेशांतील बँका, सरकारे, अर्थमंत्री हे त्या पैशाचे कथानक लोकांपर्यंत पोहोचवणारी माध्यमे आहेत, ज्यामुळे पैशाला ‘अर्थ’ येतो.” आपल्या लेखणीतून मानव्य इतिहासाचा नव्याने धांडोळा घेणार्या युवल नोआह हरारीचे हे शब्द. पैसा हा आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग. पैशावर जग चालते, यापेक्षा पैशावर जग धावते, असे म्हणणेच जास्त संयुक्तिक. भारतामध्ये डिजिटल युगाची नांदी झाली आणि आपल्या पैशाच्या व्यवहारामध्येसुद्धा बदल झाला. सुट्ट्या पैशांच्या भानगडीमध्ये होणारे वाद निकाली निघाले, कारण आता ‘युपीआय’चा जमाना आला.
जगभरात डिजिटल पेमेंट, डिजिटल करन्सीची चलती जरी असली, तरीसुद्धा चलनी नोटांचे महत्त्व कमी झालेले नाही. चलनातील नोटा, नाणी म्हणजे राष्ट्राच्या अर्थकारणातील अविभाज्य घटक. वापरातील नोटा आणि नाणी आपल्या दैनंदिन जीवनात इतक्या सवयीची होतात की, त्यांच्याकडे निरखून बघण्याची आपली दृष्टीच नाहीशी होते. मिळालेली नोट खरी आहे की बनावट, एवढाच विचार आपण करतो. पण, या नोटांना पारखण्याची खरी नजर कमावली आहे रुक्मिणी डहाणूकर यांनी.
रुक्मिणी डहाणूकर संशोधक आहेत. त्यांच्या संशोधनाचा विषय आहे बँकांच्या नोटांवरील कलारचना आणि प्रतीकात्मकता. मागच्या 20 वर्षांमध्ये वेगवेगळ्या चर्चासत्रांच्या आणि परिषदांच्या माध्यमातून त्यांनी हा गमतीदार विषय लोकांना उलगडून सांगितला आहे. मुंबईतील ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ येथे ‘बियॉण्ड फेस व्हेल्यू’ या त्यांच्या फ्रेंच चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन साकारले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून चलनात नसलेल्या दुर्मीळ फ्रेंच नोटा आणि नाणी आपल्याला बघायला मिळतात.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे, रुक्मिणी डहाणूकर यांनी आपल्या फ्रेंच चलनी नोटांच्या संकलनाच्या माध्यमातून इतिहासाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला आहे. औद्योगिकीकरणामुळे आधुनिक युगाची पहाट झाली. यामुळे लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. सोने-चांदीच्या नाण्यांमधून होणार्या व्यवहाराचे रुपांतर नोटांमध्ये झाले. बँकिंग क्षेत्र उदयाला आले आणि सामान्यांच्या व्यवहारालासुद्धा शिस्त लागली. या नोटांच्या निर्मितीमागची कल्पना आणि कल्पकता या दोन्हीचा वेध रुक्मिणी डहाणूकर यांनी आपल्या संकलनामध्ये घेतला आहे. तंत्रज्ञानाचा महापूर ज्या काळात आला नव्हता, त्या काळात या नोटांची निर्मिती अत्यंत कलात्मकतेने केली जायची. एक एक नोट अत्यंत बारकाईने तयार केली जायची.
असे म्हणतात की, चित्रांच्या माध्यमातून इतिहास जिवंत होतो. या गोष्टीची प्रचिती आपल्याला या नोटा बघताना येते. फ्रान्स या देशाचा आणि फ्रान्सच्या राष्ट्रवादाचा पाया फ्रेंच राज्यक्रांतीने घडवला. फ्रेंच राज्यक्रांतीने जगभरातील अनेक देशांना वसाहतवाद्यांशी लढण्याचे बळही दिले. फ्रान्समधील ‘मारियान’ हे तिथल्या राष्ट्रमातेचे प्रतीक आहे. अनेक चलनी नोटा व नाण्यांच्या माध्यमातून ही स्मृती जतन करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. हातात तलवार घेऊन देशासाठी लढण्याची प्रेरणा देणारी ही राष्ट्रमाता दुसर्या बाजूला शेतामध्ये पेरणी करतानासुद्धा आपल्याला दिसून येते. या माध्यमातून कष्टकरी जनतेचे प्रतिनिधित्वसुद्धा ती करते.
फ्रान्सच्या नेतृत्वाने या नोटांच्या निर्मितीमध्ये आपल्या देशातील शास्त्रज्ञ, डॉक्टर, यांचा यथोचित सन्मान केला. लुई पाश्चर ज्यांनी लावलेल्या लशीच्या शोधामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल घडले, त्यांच्या स्मृती चिरकाल टिकून राहावी, यासाठी त्यांनादेखील नोटांवर आदराचे स्थान देण्यात आले. राष्ट्राच्या उभारणीमध्ये ज्यांनी ज्यांनी भरीव योगदान दिले आहे, अशा सार्या दिग्गजांच्या स्मृती वेगळ्या पद्धतीने जतन करण्यात आल्या आहेत.
फ्रेंच राज्यक्रांतीमुळे जगभरात लोकशाहीची मूल्ये रुजली, असा काहींचा समज असला, तरीसुद्धा फ्रान्स हादेखील एक वसाहतवादी देश होता, हे इतिहासाच्या पानांवरून पुसले जाणार नाही. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात व्यापारासाठी फ्रेंचांनी आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली. उत्तर युरोप, अमेरिका, आफ्रिका, आशिया खंड अशा निरनिराळ्या ठिकाणी फ्रेंचांनी आपल्या राज्याचा विस्तार केला. हा वसाहतवादाचा प्रवाससुद्धा फ्रेंच नोटांच्या माध्यमातून उलगडत जातो. आग्नेय आशियातील काही राष्ट्रांमध्ये ‘बँक ऑफ इंडोचायना’चे चलन म्हणून एक फ्रेंच नोट वापरात होती, ज्यावर बोधिसत्व अवलोकितेश्वराचे चित्र रेखाटण्यात आले आहे. फ्रेंचांच्या विशाल साम्राज्याचे प्रतीक म्हणून या नोटांचा वापर केला जात असे. या माध्यमातून एकप्रकारे पूर्व आणि पाश्चिमात्य राष्ट्रांचा सांस्कृतिक संगम घडत असे.

भारतामध्ये एकेकाळी पुदुच्चेरीवर फ्रेंचांचे राज्य होते. जोसेफ मार्क्विस डुप्लेक्स हा एकेकाळी याच छोटेखानी फ्रेंच भारताचा शासक होता. त्याकाळी ‘बँक ऑफ इंडोचायना’चे चलन म्हणून 50 फ्रांक्सची नोट तामिळ भाषेत छापण्यात आली होती. पाच हजार फ्रांक्सच्या एका नोटेवर तर मारियान वेगवेगळ्या वंशातील सामान्य लोकांसोबत असल्याचे चित्र तयार करण्यात आले आहे. या चित्राला पार्श्वभूमी आहे, ती दुसर्या महायुद्धाची. सहयोगातून वाटचाल हा संदेश त्याकाळी रुजवण्याचा प्रयत्न केला गेला.
फ्रेंच नोटांचे हे संकलन बघताना यातील कालातीत संदर्भ अभ्यासकांच्या लगेच लक्षात येतो. या संकलनाच्या माध्यमातून इतिहासाचा आणि कलेचा एक अनोखा संगम आपल्याला बघायला मिळतो. या संकलनाचे आणि प्रदर्शनाचे वेगळेपण हे संशोधकाच्या नजरेत आहे. रुक्मिणी डहाणूकर यांच्यासाठी पैसा म्हणजे केवळ ’चशवर्ळीा ेष शुलहरपसश’ नसून ’चशवर्ळीा ेष र्उेााीपळलरींळेप’ आहे. पैशांच्या माध्यमातून संवाद साधला जातो. हा संवाद शब्दांनीच साधला जातो, असे नसून कधीकधी चित्रांच्या माध्यमातून अत्यंत ताकदीने आणि सफाईदारपणे लोकांच्या मनावर काही गोष्टी ठसवल्या जातात. हे बघण्यासाठी जी कलात्मक दृष्टी लागते, ती दृष्टी आणि विचार रुक्मिणी डहाणूकर यांनी अगदी काटेकोरपणे अवगत केला आहे. त्यांनी साकारलेले हे जगातले एकमेव प्रदर्शन आहे, ज्यामध्ये वापरात नसलेल्या चलनी नोटांमागची कलात्मक मांडणी करण्यात आली आहे.
फ्रान्ससह अनेक युरोपीय देशांमध्ये आता युरोची चलती आहे. फ्रान्सच्या चलनी नोटा वापरातून बाद झाल्या. परंतु, या नोटा म्हणजे एक मोलाचा दस्तऐवज आहे. वापरातल्या प्रत्येक नोटेमागे एक इतिहास दडला आहे. हा इतिहास प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी रुक्मिणी डहाणूकर यांच्यासारख्या संशोधकाची कलात्मक दृष्टी हवी आणि ती जपण्यासाठी समाजभान हवे, हेही तितकेच खरे!
(सदर लेखामधील फोटो हे रुक्मिणी डहाणूकर यांच्या वैयक्तिक संग्रहातून प्राप्त केलेले आहेत.)