खेळण्या-बागडण्याच्या वयात सुरू केलेल्या व्यवसायात अत्युच्च स्थान गाठत, इतरांचेही आयुष्य प्रकाशाने उजळून टाकणार्या नाशिकच्या राजेंद्र नेमिचंद पहाडे यांच्याविषयी...
स्वातंञ्यपूर्व काळापासून नाशिक शहरात वृत्तपत्र व्यवसाय सुरू असून, तो वाढवण्यात वृत्तपत्रविक्रेत्यांचाही खारीचा वाटा राहिला आहे. म्हणूनच वृत्तपत्रविक्रेत्यांना आपले हक्क मिळावे, यासाठी अनेक वर्षांपासून राजेंद्र नेमिचंद पहाडे लढा देत आहेत. राजेंद्र पहाडे यांचा जन्म दि. 11 नोव्हेंबर 1962 रोजी नाशिकमध्ये झाला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, सातवीला असल्यापासूनच त्यांनी वृत्तपत्रविक्रीला सुरुवात केली. वृत्तपत्रविक्रेत्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी, ‘नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघा’ची स्थापना करण्याचे ठरविले. त्यासाठी वंदनराव पोतनीस, प्रल्हाद सावजी, बाळासाहेब सिन्नरकर, तिलोकचंद गंगवाल, रमेश सूर्यवंशी, सुरेश विभांडीक, बाळ दलाल यांची मदत घेत, विक्रेता संघाची स्थापना केली. वृत्तपत्रविक्रेता संघाच्या माध्यमातूनच पहाडे यांनी, वेळोवेळी वृत्तपत्रविक्रेत्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला.
1982 ते 83 सालच्या सुमारास, शहरात वृत्तपत्रविक्रेत्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जात नसतं. त्यातच मुंबईवरून येणारी वृत्तपत्रेही खूप उशिराने यायची. त्यामुळे विक्रेत्यांनाही आर्थिक नुकसान सोसावे लागायचे. यावर मार्ग काढण्यासाठी राजेंद्र पहाडे यांनी, सहकार्यांसोबत बेमुदत संपाचा इशारा दिला. विविध समस्यांबाबत बैठका घेऊन, वृत्तपत्रविक्रेत्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले.
वृत्तपत्रविक्रेत्यांना त्यांच्या घामाचे योग्य दाम मिळावे, कमिशन वाढवून मिळावे, यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. या लढ्यापुढे वृत्तपत्रांचे मालक नरमले आणि कमिशन वाढवून देण्याचे मान्य केले. कोणतीही साधने हाती नसतानाच्या काळात वृत्तपत्रविक्रेत्यांना सोबत घेत, विक्रेत्यांच्या न्याय-हक्कांसाठी त्यांनी मोठे काम केले. वृत्तपत्रविक्रेत्यांचा आवाज झालेले पहाडे, 1982 ते 1993 असे 11 वर्षे सलग विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. यासोबतच ‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता फेडरेशन’चे 1990 ते 1994 या काळात, नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जेथे गरज लागेल तेथे राजेंद्र पहाडे नावाप्रमाणेच पहाडासारखे उभे राहिले.
याची प्रचिती त्यांच्यासोबत काम केलेल्या प्रत्येकाला आली आहे. ‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटने’ने देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस अर्थात दि. 15 ऑक्टोबर हा दिवस, ‘वृत्तपत्रविक्रेता दिवस’ म्हणून 2018 पासून साजरा करण्यास सुरुवात केली. आता हा ‘वृत्तपत्रविक्रेता दिवस’ देशभर साजरा केला जातो. इतर कंपन्यांच्या कामगारांना ज्या सोयीसुविधा व सवलती मिळतात, त्या वृत्तपत्रविक्रेत्यांना वंचित व उपेक्षित न ठेवता सरकारने द्याव्यात, अशी मागणी पहाडे यांनी नेहमी शासनदरबारी लावून धरली. वृत्तपत्र क्षेत्रासाठी आपल्या आयुष्याची 35 वर्षे देणार्या राजेंद्र पहाडे यांच्या कार्याची जाण ठेवत, एका मोठ्या कार्यक्रमात त्यांना सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्काराबद्दल राजेंद्र पहाडे सांगतात की, “वृत्तपत्रे वितरणाची वेळ पहाटे 3 ते 4 वाजेपासून सुरू होते. त्यामुळे निश्चितच पत्नीची साथ हवी असते. माझी पत्नी ज्योती हिची मोलाची साथ मिळाल्यामुळेच, मी वृत्तपत्रविक्रीचे हे शिवधनुष्य पेलू शकलो. वेळप्रसंगी माझ्या खांद्याला खांदा लावून, तिने वृत्तपत्रवितरणास मदत केली.
त्यामुळे माझ्या कार्यात कधीच खंड पडला नाही.” वृत्तपत्रवितरणाच्या कामामुळे शासकीय कार्यालये आणि पोलीस प्रशासनासोबत जवळचा संबंध आल्याने, विविध शासकीय कामे आणि योजना माहीत होण्यास मदत झाली. त्यातून सर्वसामान्यांची विविध कामे पहाडे यांनी मार्गी लावली. आता वाढत्या वयाचा आदेश मानत पहाडे यांनी वृत्तपत्रवितरणाच्या कामातून निवृत्ती घेण्याचे ठरवले असले, तरी आपले सामाजिक काम मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे. वयाच्या 20व्या वर्षापासून सामाजिक कार्याला सुरुवात करणार्या राजेंद्र पहाडे यांनी, श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ म्हसरूळ जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुख, श्री लच्छीराम पब्लिक स्कूल कार्यकारी संचालक, श्री भारतवषीर्र्य दिगम्बर जैन तीर्थ संरक्षिणी महासभा, उत्तर महाराष्ट्र विभाग जनरल सेक्रेटरी, मुनीश्री तरुणसागरजी चातुर्मास समिती नाशिक जनसंपर्क, प्रसिद्धी व विशिष्ट अतिथी प्रमुख, सकल जैन समाज संचलित श्री जैन सेवा संघ नाशिक जनरल सेक्रेटरी, सकल जैन समाज संचलित श्री जैन सेवा संघ नाशिकचे अध्यक्ष अशा विविध पदांवर पहाडे यांनी, आपल्या कामाचा ठसा उमटवला.
आपले जुने दिवस आठवताना राजेंद्र पहाडे म्हणतात की, “1978 सालापासून या व्यवसायात आहे. जुन्या तांबट लेनमध्ये स्टॉल लावून ओरडून वृत्तपत्रे विकावी लागायची. त्यात शाळेच्या पहिल्या तासाला जाता यावे म्हणून, वर्गमित्र सुभाष जैन, कैलास राऊत पेपरवाटपासाठी मदत करायचे. सध्या दुसरा व्यवसाय करत असलो, तरी वृत्तपत्रविक्रीचा व्यवसाय अजून सोडलेला नाही. या व्यवसायावरच मला माझे शिक्षण पूर्ण करता आले. त्यामुळेच वृत्तपत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत असताना, विक्रेत्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.” सतत दुसर्याचा विचार करणार्या या अजातशत्रूला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा...
विराम गांगुर्डे