मुंबई: ( One card for local, metro, mono and bus Devendra Fadanvis ) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “येत्या महिनाभरात ‘मुंबई वन’ या सिंगल स्मार्टकार्डची अंमलबजावणी सुरू होईल,” अशी घोषणा केली आहे. “या एका कार्डच्या आधारे मुंबईमध्ये कोणत्याही वाहतुकीच्या पर्यायाने लोकांना प्रवास करता येणार आहे. लंडनच्या ‘ऑयस्टर’ कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुकर आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बसप्रवासासाठी वापरता येणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेला ऑनबोर्डिंग करण्याचे आदेश दिले होते. त्याचा शुक्रवारी आढावा घेण्यात आला. याचे संपूर्ण स्थापत्य येत्या एक महिन्यात आम्ही पूर्ण करून घेऊ. हे पूर्ण होताच आम्ही ‘मुंबई वन’ हे कार्ड लॉन्च करू.
एका कार्डवर म्हणजेच एका तिकिटावर मुंबईची लोकल ट्रेन, मेट्रो, मोनो आणि बेस्ट बससेवेचा लाभ घेता येणार आहे. याचसोबत या कार्डवर मुंबई महानगर प्रदेशातील परिवहन व्यवस्थेलाही लागू होईल. यात सर्वात मोठी भूमिका ही रेल्वेची होती. रेल्वेने आपल्याला सर्व मान्यता दिलेल्या आहेत,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास सांगणारी खास सहल
“दि. १६ जुलै रोजी ‘भारत गौरव’ ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि भव्य वारसा तसेच महाराष्ट्रातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थळांचे दर्शन घडवण्यासाठी दहा दिवसांची खास सहल पॅकेज तयार केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘गौरवशाली मराठा टूर’ म्हणून ओळखल्या जाणार्या भारतीय रेल्वेच्या या अविश्वसनीय उपक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनापासून आभार मानतो.
हा दौरा दिल्लीहून सुरू होईल आणि पुणे, रायगड, शिर्डी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिष्ठित वारसा, सांस्कृतिक आणि तीर्थस्थळांना भेट देईल. हा उपक्रम केवळ एक प्रवास नाही, हा शौर्य, महाराष्ट्रातील संस्कृती, मराठा साम्राज्याचा कालातीत वारसा आणि प्राचीन वारसा तीर्थस्थळांवर आशीर्वाद घेणे आहे,” अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानताना व्यक्त केली.