मुंबईच्या कुर्ला पश्चिम परिसरातील श्रीकृष्ण चौकात वसलेले श्रीखंडोबा हनुमान मंदिर हे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा मिलाप असलेले एक जागृत स्थळ. चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षी या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरी होणारी सासनकाठी यात्रा आणि अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर भाविकांच्या हृदयाशी नाळ जुळणारा एक जिवंत अनुभव असतो. ग्रामीण महाराष्ट्रातील सासनकाठी परंपरेचा शहरी भागातील हा एक अद्वितीय ठेवा पाहणार्यांच्या मनाला भारावून टाकतो. आज हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने येथील यात्रा-परंपरेचा मागोवा घेणारा हा लेख...
हिंदू नववर्षाच्या प्रारंभी चैत्र महिन्यात भारतात विविध ठिकाणी यात्रा-जत्रा रंगतात. अशा या पवित्र चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर, मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील श्रीकृष्ण चौकातील श्रीखंडोबा हनुमान मंदिरात गेल्या 41 वर्षांपासून अखंडपणे पार पडणारी सासनकाठी यात्रा हीसुद्धा अशीच एक आगळीवेगळी परंपरा. मुंबईसारख्या आधुनिक आणि धावपळीच्या शहरात पारंपरिक ग्रामीण श्रद्धा आणि धार्मिक परंपरा जपली जाते, ही बाब विशेष महत्त्वाची. पण, ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून, एक सामाजिक जागृती घडवणारा संस्कृतीसोहळाही ठरतो.
सासनकाठी म्हणजे एक मानाचे, उंच, झेंड्यासारखे धर्मनिशाण. याची उंची 40 ते 50 फूट असून त्याला जरीपटका गुंडाळला जातो. काठीच्या टोकावर मोरपिसांचा मोर्चेले लावला जातो आणि त्यावर ’फरारा’ म्हणून ओळखला जाणारा पिवळ्या रंगाचा झेंडा फडकावला जातो. विशेष म्हणजे, या काठीवर श्रीखंडेरायाच्या टाकस्वरूप मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या मूर्तीला आधार देण्यासाठी काठीला समांतर लाकडी फळा लावली जाते, जिला ’घोडा’ किंवा ’ठवक’ असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील अनेक भागांप्रमाणे, जेजुरीसारख्या स्थळीही सासनकाठी उभी करण्याची परंपरा आहे. या ग्रामीण श्रद्धेचे शहरी रूप म्हणजे कुर्ल्याची ही यात्रा!
या यात्रेचा आरंभ 1980-84 दरम्यान कुर्ला परिसरात सुरू झाला. त्या काळात धार्मिक आणि सामाजिक तणाव वाढलेला होता. अतिक्रमणामुळे जागेचा गैरवापरही होऊ लागला होता. अशावेळी संत रोहिदास समाजातील काही नागरिकांनी पुढाकार घेत, त्या जागेचा उपयोग समाजोपयोगी कार्यासाठी करण्याचे ठरवले. त्या जागेची साफसफाई करून, लहान मुलांसाठी धर्मशिक्षण आणि बलशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू करण्यात आली. या शाखेमध्ये सहभागी होणार्या मुलांना भक्ती आणि शक्ती यांचे प्रतीक समजून संकटमोचन हनुमानाची मूर्ती बसवण्यात आली आणि ’श्री संकटमोचन हनुमान मंदिर’ या नावाने मंदिराची स्थापना झाली. पुढे चैत्र पौर्णिमेला अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीखंडोबा महाराजांची मूर्ती स्थापित करून सासनकाठी यात्रेची सुरुवात करण्यात आली.
या यात्रेत सहभागी होणारे हजारो भाविक पारंपरिक वेशात ढोल-ताशांच्या गजरात, जयघोष करत, नृत्य करत सासनकाठीचे पूजन करतात. स्वतःला श्रीखंडेरायाचे हिंमत बहाद्दर मानून ते उत्साहाने सहभागी होतात. या यात्रेच्या निमित्ताने आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताह राबवला जातो. यामध्ये भजन, कीर्तन, पारायण, बलोपासना, हनुमान जयंती उत्सव, सत्संग, शौर्य प्रशिक्षणवर्ग, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, महाप्रसाद, अन्नदान, वाचनालय अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो. यामध्ये वैद्यकीय तपासणी शिबिरे, वृद्धांसाठी आरोग्यसेवा, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मार्गदर्शन शिबिरेही आयोजित केली जातात.
अखंड हरिनाम सप्ताहात संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशाच्या इतर भागांतून नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार आणि भजन मंडळे सहभागी होतात. ते आपल्या प्रभावी शैलीतून हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती याविषयी जागरूकता निर्माण करतात. रात्री जागरण गोंधळाद्वारे देवी-देवतांच्या पौराणिक कथा सादर केल्या जातात, ज्यामुळे लोककला आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडतो. या यात्रेदरम्यान नवविवाहित जोडप्यांना होम-हवनात सहभागी करून घेण्यात येते आणि शुभाशीर्वाद दिला जातो. यातून घरगुती परंपरांची उजळणी होत असून कुटुंबांना एकत्र आणण्याची संधी मिळते.
मंदिराचे स्थान अगदी सोयीस्कर असून कुर्ला पश्चिम येथील श्रीकृष्ण चौकात हे मंदिर वसलेले आहे. एलबीएस मार्गाच्या जवळ असल्याने प्रवासासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. कुर्ला रेल्वे स्थानक येथून रिक्षा किंवा पायी सहज पोहोचता येते. परिसर शांत, भक्तिभावाने भारलेला असून, यात्रेच्या दिवसात तो पूर्णपणे भक्तिरसात न्हालेला असतो. मंदिर परिसरात भाविकांसाठी भोजन, निवासाची प्राथमिक व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि प्रसादवाटप इत्यादी गोष्टी नियोजनबद्धरित्या पार पाडल्या जातात. त्यामुळे एकदा का एखाद्याने या यात्रेचा अनुभव घेतला की, दरवर्षी या यात्रेला यावे असे नक्कीच वाटते.
नवतंत्रज्ञानाचा वापर करत आयोजक मंडळाने डिजिटल पद्धतीने निमंत्रणपत्रिका पाठवणे, सोशल मीडियावर पोस्ट, व्हिडिओज, लाईव्ह स्ट्रिमिंग यांसारख्या माध्यमातून दूरदूरच्या लोकांपर्यंत या यात्रेची माहिती पोहोचवली आहे. याद्वारे लोकांना समाज माध्यमांतून सहभागी होण्यासाठी आवाहन केले जाते. मंडळाचे अधिकृत युट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, यात्रेतील मुख्य कार्यक्रमांच्या व्हिडिओ क्लिप्स तिथे अपलोड केल्या जातात. या सर्व गोष्टींमुळे अनेक कारणास्तव विस्थापित झालेल्या भक्तांनाही जे या यात्रेत पिढ्यान्पिढ्या सहभागी झाले आहेत, अशांना ही यात्रा अनुभवण्याची संधी मिळते.
‘श्रीकृष्ण क्रीडा मंडळ’ आणि ‘श्रीखंडोबा हनुमान मंदिर समिती’ यांच्या सहकार्याने कुर्ला परिसराने या यात्रेच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक आणि तांत्रिक उन्नतीचा सुंदर संगम घडवला आहे.
ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याची श्रद्धा, निष्ठा आणि सेवा हेच या यात्रेच्या यशाचे मूळ कारण ठरत आहे. त्यामुळेच ही यात्रा केवळ एक परंपरा न राहता, एक आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि आधुनिकतेने सजलेला सामाजिक सोहळा ठरतो. देव, देश आणि धर्म यांचे नाते अधिक दृढ करणारे हे वार्षिक सोहळ्याचे स्वरूप भविष्यातही तितक्याच भक्तिभावाने जोपासले जाईल, अशी श्रद्धा आयोजक आणि भाविक बाळगतात.
सागर देवरे