काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका, ही याच प्रवृत्तीचे उदाहरण. वडेट्टीवार म्हणाले की, “गाण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान काय?” आपल्या देशात जेव्हा एखाद्या कुटुंबाने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेच्या सुरांमध्ये गुंफले, तेव्हा त्यांच्या नावावर आज प्रश्न उपस्थित करणारी वृत्ती ही उलट्या काळजाचे प्रतीकच मानावी.
राजकारणातील काहींना होणारे विस्मरण इतके सोयीचे असते की, त्यांच्या विधानांकडे पाहताना इतिहासालाही आश्चर्याचा धक्का बसावा. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका, ही याच प्रवृत्तीचे उदाहरण. वडेट्टीवार म्हणाले की, “गाण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान काय?” आपल्या देशात जेव्हा एखाद्या कुटुंबाने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेच्या सुरांमध्ये गुंफले, तेव्हा त्यांच्या नावावर आज प्रश्न उपस्थित करणारी वृत्ती ही उलट्या काळजाचे प्रतीकच मानावी. मंगेशकर कुटुंब हे केवळ सुरांचे नव्हे, तर राष्ट्रीय भावना जागवणार्या स्वरांचे प्रतिनिधी आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी ‘परवशता पाश दैवे’ हे नाट्यगीत इंग्रज अधिकार्यांसमोर सादर करण्याचा पराक्रम केला, ही त्यांची राष्ट्रभक्तीच होती. ‘पुण्यप्रभाव’ नाटकाच्या माध्यमातून दीनानाथांनी जेव्हा टिळकांच्या होमरूल चळवळीसाठी निधी उभारला, तेव्हा ते राष्ट्रसेवेचे सक्रिय उदाहरणच होते.
आपल्यातील बलस्थानांचा वापर देश आणि समाजहितासाठी करणे हे आदर्श वर्तन मानले जाते. मास्टर दीनानाथांची नाट्यगायकी आणि त्यांच्या नाटकातील स्त्री भूमिका, त्या काळातील समाजरचनेत विचारांची नवी दिशा देणार्या ठरल्या. ही परंपरा पुढे लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ यांनी अधिक व्यापक केली, ती केवळ सांगीतिक क्षेत्रापुरती नव्हे, तर राष्ट्रभक्तीच्या व्यापक व्याख्येपर्यंत. ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान’कडून पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या कुटुंबासाठी दिले गेलेले 1 कोटी, 5000 रुपयांचे साहाय्य हे त्याच परंपरेचे प्रमाण. आज या कुटुंबावर प्रश्न उभे करणारेच विसरतात की, लता मंगेशकर यांना ‘पद्मभूषण’ आणि अन्य राज्यस्तरीय पुरस्कार देणार्या शासनयंत्रणेत सर्वाधिक काळ सत्ता काँग्रेसकडेच होती. तेव्हा काँग्रेसला मंगेशकरांचे कार्य योग्य वाटले होते की, तेव्हाही फक्त लोकभावना सांभाळण्याचे सोयीचे राजकारण होते? दीनानाथ रुग्णालयाचा प्रश्न गंभीर आहेच, यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, त्याआडून आलेले वडेट्टीवारांचे विधान म्हणजे इतिहासाचे गाल पुसत, त्याच इतिहासाला पाठीमागून चापट मारण्यासारखे आहे. वास्तव हे की, मंगेशकर कुटुंबीयांनी देशासाठी काय केले, याची लांबलचक यादीच उपलब्ध आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबीयांबाबत बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखेच!
उत्तररंग
मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दुःखद घडामोडींवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर केलेली आगपाखड निष्कारणच नव्हे, तर द्वेषपूर्णही वाटते. भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या मंगेशकर घराण्याच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करणार्यांनी, आधी आपल्या पक्षाचा इतिहासाचा तपासणे आवश्यक. स्वा. सावरकर यांचे देशभक्तीपर गाणे गायले म्हणून ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीवरून निष्कासित करणारे सरकार काँग्रेसचेच होते. ही केवळ एक घटना नव्हे, राष्ट्रभक्त कलाकारांचा अपमान करणार्या काँग्रेसी वृत्तीचेच द्योतक म्हणावे लागेल. देशाच्या राजकारणात दीर्घकाळ ‘गरिबी हटाओ’च्या घोषणा देणार्या काँग्रेसने, प्रत्यक्षात गरिबांना जीवन जगणेदेखील मुश्कील केले होते, हे जनता विसरलेली नाही. भ्रष्टाचाराची परिसीमा गाठणार्या या पक्षाने शस्त्रांपासून ते शवपेट्यांपर्यंत सर्व व्यवहारात दलाली करण्याची परंपराही अभिमानाने जोपासली. जेव्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर देश सैन्याच्या शौर्याचे गुणगान गात होता, तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनीच ’पुरावे कुठे आहेत?’ असा प्रश्न विचारून देशवासीयांच्या जखमांवर मीठ चोळले.
या पक्षाने देशात आणीबाणी लादून लोकशाहीची गळचेपी केली. शहाजोग सत्ता टिकवण्यासाठी जनतेच्या अधिकारांची पायमल्ली करणारा हा पक्ष आज न्याय, नैतिकता शिकवत आहे, ही राजकारणातील विडंबनाची पराकाष्ठाच म्हणावी लागेल.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात जी वांशिक, धार्मिक आणि प्रादेशिक तेढ काँग्रेसने आपल्या सत्तेसाठी निर्माण केली, त्याचे दुष्परिणाम आजही देश भोगत आहे. पंतप्रधान, राष्ट्रपतींचा अपमान करणार्या राजमातेला जाब विचारण्याची हिंमत न बाळगणारे आणि वाचाळवीर राजपुत्राच्या बेताल कृत्यांवर वक्तव्यांवर मौन बाळगणारे राजकीय गुलाम आज मंगेशकर कुटुंबीयांकडे त्यांच्या कार्याचा हिशोब मागतात? ही नैतिक अधोगती नाही तर काय? मंगेशकर घराणे हे केवळ गायनपरंपरेचे नव्हे, तर राष्ट्रभक्तीचेही प्रतीक. त्यांचे कार्य वादात ओढण्याऐवजी, काँग्रेसने त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचीच गरज आहे. काँग्रेसने आपल्या पापांचा हिशोब आधी द्यावा, इतिहासात केलेल्या चुका कबूल कराव्यात, मग इतरांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करावे. कारण, राष्ट्रकार्य आणि राष्ट्रभक्तीबाबतीत काँग्रेस जनतेला फसवू शकणार नाही. कारण, पब्लिक सब जानती हैं!
कौस्तुभ वीरकर