ठाणे: ( TJSB BANK ) टीजेएसबी सहकारी बॅंकेची नवसंकल्पनेतुन वृद्धींगतेची वाटचाल सुरूच असुन यंदा बँकेने २५२ कोटी ढोबळ तर १८५.३८ कोटी निव्वळ नफा कमावला आहे. दरवर्षीप्रमाणे लेखापरिक्षित आर्थिक निकाल १० एप्रिल रोजी घोषित करण्याची परंपरा राखत टीजेएसबी बँकेने यावर्षी देखील आर्थिक वर्ष २४-२५ चा लेखापरिक्षित आर्थिक लेखाजोखा टीपटॉप प्लाझा, ठाणे येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहिर केला.
यावेळी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, उपाध्यक्ष वैभव सिंगवी, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर तसेच, सर्व संचालक, व्यवस्थापकीय सदस्य व बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी, अनेक बाबींचा ठळकपणे उल्लेख केला. गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण रु. १४,५८८ कोटी ठेवी होत्या. त्या आता रु. १४,८४८.६४ कोटी झाल्या आहेत. कर्ज वितरण रु. ७,८७५ कोटी वरून रु. ८,२५६.१८ कोटी वर स्थिरावले. पुंजी पर्याप्तता ही १७.५७% राहिली. बँकेचा एकूण व्यवसाय २२ हजार ४६३ कोटीवरून २३ हजार १०४. ८२ कोटींवर पोहोचला आहे. ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण घसरून ३. ५९ टक्के राहिले तर, निव्वळ अनुत्पादित कर्ज मागील वर्षीप्रमाणे शुन्य टक्के आहे.
शरद गांगल पुढे म्हणाले, देशातील बहुराज्जीय सहकारी बँकापैकी एक असलेल्या टीजेएसबी बँकेने गेल्या आर्थिक वर्षात महत्वाचे टप्पे पार केले असुन बँकेच्या एकुण शाखांची संख्या पाच राज्यात १४९ वर पोहचली आहे. यावर्षी टीजेएसबी बँकेमध्ये सिटिझन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गोवा यांचे यशस्वी विलीनीकरण झाले असून, बँकेच्या नेटवर्कमध्ये सहा नवीन शाखांची भर पडली आहे. बँकेने नवीन कोर बँकिंग प्रणाली (CBS) अंमलात आणून ग्राहक अनुभव व कार्यक्षमतेत मोठी सुधारणा केली आहे.
या प्रणालीमुळे व्यवहारांची गती, सुरक्षितता आणि उपलब्धता वाढली आहे. ग्राहक प्रथम हेच बँकेचे धोरण असून, भविष्यातील नवकल्पनांचा पाया मजबूत करण्या बरोबरच सहकारी बँकिंग क्षेत्रात आघाडीवर राहणे हे बँकेचे ध्येय आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि वैयक्तिक सेवा यांचे समन्वयाला आमचे प्राधान्य आहे. डिजिटल नवकल्पना, ग्राहक-केंद्रित उपाययोजना आणि धोरणात्मक वाढ यावर आम्ही सतत भर देत असल्याचे गांगल म्हणाले. दरम्यान, पुढील वाटचालीत, बँक शाखा विस्तार, डिजिटल सेवा व वित्तीय समावेशनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे निखिल आरेकर यांनी स्पष्ट केले.
शासन निर्णयामुळे बॅकेचे नेटवर्क वाढण्याची संधी
“शासन निर्णय आणि यशस्वी विलीनीकरण हे बँकेच्या गुणवत्तापूर्ण सेवा व नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाचे फलित आहे. या टप्प्यामुळे टीजेएसबीला शासकीय विभागांची, कर्मचाऱ्यांची सेवा करण्याची आणि बँकेचे नेटवर्क वाढवण्याची संधी महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयामुळे मिळाली. आता बँकेला शासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठीचे खाते आणि निवृत्ती वेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता; तसेच सार्वजनिक उपक्रम व महामंडळे यांचेकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीकरिता प्राधिकृत मान्यता मिळाली आहे.