2024 मध्ये एकट्या दक्षिण आशियातून दुबईने 3.14 दशलक्ष पर्यटकांना आकर्षित केले, जे शहराला भेट देणार्या एकूण 18.72 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान असून, मागील वर्षीच्या तुलनेत नऊ टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे, दुबईला भेट देणारे सर्वाधिक पर्यटक हे भारतीयच.
दुबईचे राजे शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हे दि. 7 ते 9 एप्रिलदरम्यान भारत दौर्यावर होते. त्याचदरम्यान दुबईच्या पर्यटनासंबंधी एक आकडेवारीही समोर आली. 2024 मध्ये एकट्या दक्षिण आशियातून दुबईने 3.14 दशलक्ष पर्यटकांना आकर्षित केले, जे शहराला भेट देणार्या एकूण 18.72 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान असून, मागील वर्षीच्या तुलनेत नऊ टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे, दुबईला भेट देणारे सर्वाधिक पर्यटक हे भारतीयच.
1985 मध्ये ‘एमिरेट्स एअरलाईन्स’ने दुबई आणि भारतादरम्यान विमानसेवा सुरू केली. तेव्हापासून आजतागायत नऊ कोटींहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. हा महत्त्वाचा प्रवासी टप्पा गाठला, तेव्हा शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हे भारताच्या दौर्यावर होते. या भेटीदरम्यान ‘दुबई नागरी विमान वाहतूक प्राधिकरणा’चे अध्यक्ष, दुबई विमानतळांचे अध्यक्ष आणि ‘एमिरेट्स एअरलाईन (ईके) ग्रुप’चे अध्यक्ष आणि सीईओ अशा अनेक प्रमुख पदांवर काम करणारे शेख अहमद बिन सईद अल मकतूम हे शेख हमदान यांच्यासोबत अधिकृत भारत भेटीदरम्यान त्यांच्यासोबत होते. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एअरलाईन्सच्या भारतासोबतच्या कायमस्वरूपी संबंधांवरही प्रकाश टाकला. दुबई आणि भारतादरम्यान प्रवासाची मागणी वाढतच आहे. दुबई मीडिया ऑफिसच्या वृत्तानुसार, सहा प्रमुख विमान कंपन्या आता दुबईला 23 प्रमुख भारतीय ठिकाणांशी जोडणारी 538 आठवड्याची उड्डाणे चालवतात. हे आकडे दुबई आणि भारत यांच्यातील विमान वाहतूक भागीदारी जगातील सर्वांत व्यस्त आणि महत्त्वाच्या हवाई कॉरिडॉरपैकी एक कशी बनली आहे, याचेच द्योतक म्हणावे लागेल.
दुबई शहराबाहेर अल मकतूम विमानतळाचा मोठा विस्तार होत आहे. शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी ट्विट केले की, दुबईच्या नवीन विमानतळाभोवती संपूर्ण शहर उभे राहिल्याने दहा लाख लोकांसाठी रोजगार आणि घरे उपलब्ध होतील. ते लॉजिस्टिक्स आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांचे आदरातिथ्य करेल.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्वांत मोठे डेस्टिनेशन मार्केट म्हणून भारताने आपले स्थान कायम ठेवले आहे. 2024 मध्ये ‘डीएक्सबी’मधून प्रवास करणार्या एकूण 92.3 दशलक्ष प्रवाशांपैकी 1.2 कोटी प्रवाशांनी दुबई आणि भारतादरम्यान प्रवास केला. शिवाय, हे या राष्ट्रांमधील हवाई प्रवासाची सातत्यपूर्ण लोकप्रियता दर्शवते, जे त्यांच्या मजबूत आर्थिक, सांस्कृतिक आणि पर्यटन संबंधांमुळे प्रेरित आहे. या दोन्ही देशांमध्ये पर्यटनवाढीला चालना मिळत असतानाच, ‘दुबई मीडिया ऑफिस’नुसार, दुबईने 2024 मध्ये दक्षिण आशियातून विक्रमी 3.14 दशलक्ष पर्यटकांचे स्वागत केले. या आगमनांपैकी सर्वांत मोठा हिस्सा हा भारताचा होता. ‘इमिरेट्स’च्या (EK) माहितीनुसार दुबईसाठी भारतातील अहमदाबाद, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली हैदराबाद कोची, कोलकाता, मुंबई आणि तिरुवनंतपुरम या नऊ शहरांतून सर्वाधिक प्रवासी वाहतूक होते.
एका मुलाखतीदरम्यान भारतातून दुबईत येणार्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी दुबई कशी योजना आखत आहे, याबद्दल विचारले असता ‘दुबई डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमी अॅण्ड टुरिझम’मधील ‘प्रॉक्सिमिटी मार्केट्स’चे संचालक बदर अली हबीब म्हणाले की, दुबईच्या पर्यटनाला आकार देण्यात शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्या अल फहिदी जिल्ह्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.
संस्कृती ही दुबईच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग. दुबईच्या विमान वाहतूक नेटवर्कच्या सततच्या विस्तारामुळे युएई आणि भारतामधील व्यापार, पर्यटन आणि व्यावसायिक संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. यामुळे लाखो प्रवाशांसाठी प्रवासाचे पर्याय सुधारतील, ज्यामुळे दुबईचा जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून दर्जा आणखी मजबूत होईल. तसेच आगामी काळात मुंबई आणि दुबई ही शहरे समुद्राखालून हायस्पीड रेल्वेने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पदेखील नियोजित आहे. तसे झाल्यास मुंबई ते दुबई दरम्यानचे अंतर हे अवघ्या दोन तासांवर येईल. यामुळे केवळ दोन्ही देशांमधील पर्यटनच नव्हे, तर व्यापार, प्रवासी वाहतूक क्षेत्रातही क्रांती घडून येईल. यावरुन भारताचे महत्त्व आणि जागतिक स्थान अधोरेखित व्हावे.