मुंबई: ( Minister Amit Shah visit Maharashtra ) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवार, दि. ११ एप्रिल आणि शनिवार, दि. १२ एप्रिल असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते रायगड किल्ल्यावर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे आशीर्वाद घेणार आहेत.
शुक्रवारी रात्री ८ वाजता त्यांचे पुणे विमानतळावर आगमन होईल. पुण्यात त्यांचा मुक्काम असणार आहे. शनिवारी सकाळी १०.३० वाजता ते पाचाड (जि. रायगड) येथील राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेतील. ११ वाजता रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतील. रायगडावरील राजसदरेवर आयोजित विविध कार्यक्रमांत ते सहभागी होतील. दुपारी १२.३० वाजता होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते माल्यार्पण करणार आहेत.
शनिवारी दुपारी ३.३० वाजता त्यांचे मुंबईत आगमन होईल. सायंकाळी ५.३० वाजता विलेपार्ले येथे चित्रलेखा या गुजराती साप्ताहिकेच्या ७५ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात सहभागी होतील. सायंकाळी ६.२० नंतर सह्याद्री अतिथिगृहावर ते विविध नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.