एक तरफ बंदूके दनदन, एक तरफ थी टोलियाँ...

Total Views | 21


Jallianwala Bagh 
 
 
अमृतसरच्या जलियाँवाला बागेमध्ये जमलेल्या नि:शस्त्र जमावावर इंग्रज अधिकारी जनरल डायर आणि डेप्युटी कमिशनर आयर्व्हिंग यांनी 50 बंदूकधारी सैनिकांसह बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले, जखमी झाले. या निर्घृण हत्याकांडानंतर आधीच इंग्रजांविरोधात धगधगणारा असंतोष उफाळून आला. ही घटना घडली दि. 13 एप्रिल 1919 रोजी. उद्या या घटनेला 106 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने...
 
दि. 13 एप्रिल 1919. दुपारी एक विमान अमृतसर शहरावरून चक्कर मारून गेले. पंजाबच्या बैसाखी सणाचा तो दिवस होता. खुद्द शहरातले आणि आजूबाजूच्या परिसरातले हजारो स्त्री-पुरुष अमृतसरच्या प्रख्यात सुवर्णमंदिरात येत-जात होते. तिथून जवळच असलेल्या जलियाँवाला बाग (‘जालियानवाला बाग’ हा चुकीचा, भ्रष्ट इंग्रजी उच्चार) या मैदानाकडे सरकत होते. संध्याकाळी 4.30 वाजता तिथे एक सभा होणार होती.
 
अमृतसरचा मिलिटरी कमांडंट कर्नल (तात्पुरता ब्रिगेडियर जनरल) रेजिनाल्ड डायर हे वृत्त ऐकून खवळला. त्याने सकाळीच शहरात संचारबंदी जारी केली होती. बैसाखी सणाला अमृतसरला घोड्यांचा आणि गुरांचा मोठा बाजार भरायचा. दुपारी 2 वाजता डायरच्या सैनिकांनी तो बाजार बंद करायला लावला. साहजिकच तिथले रिकामे लोकही जलियाँवाला बागेकडे वळले. गुप्तचरांकडून डायरकडे सूचना येऊ लागल्या की, हजारों हिंदू, मुसलमान आणि शीख लोक जलियाँवाला बागेत गोळा झालेत. वातावरण तप्त आहे. जमलेल्या लोकांची गर्दी नेमकी कितीशी आहे, याचा अंदाज घेण्यासाठी डायरने चक्क विमान पाठवले.
 
ठरल्याप्रमाणे 4.30 वाजता सभा सुरू झाली. संतापलेला डायर 90 सैनिकांनिशी तिथे येऊन पोहोचला. 50 सैनिकांकडे ‘.303 ली-एनफिल्ड’ रायफल्स होत्या. (नंतर या बंदुकीला ‘थ्री-नॉट-थ्री’ म्हणू लागले.) शिवाय त्याच्याबरोबर दोन चिलखती गाड्या होत्या नि प्रत्येकीत एकेक मशीनगन होती. जलियाँवाला बाग ही जागा सर्व बाजूंनी तीन ते चार मजली इमारतींनी वेढलेली आणि मध्ये सुमारे सहा-साडेसहा एकर मोकळे मैदान अशा स्वरुपाची होती. त्या मैदानात एक विहीरही होती. सुवर्णमंदिरापासून अगदी जवळच ही बाग आहे. डायरच्या ताफ्यातल्या चिलखती गाड्यांना जलियाँवाला बागेकडे जाणार्‍या अरुंद गल्लीतून आत शिरता येईना. म्हणून त्यांना तिथेच थांबवून नाकाबंदी करण्यात आली. डेप्युटी कमिशनर आयर्व्हिंग 50 बंदूकधारी सैनिकांसह बागेत शिरले. समोर किमान दहा हजार निःशस्त्र लोक शांतपणे भाषण ऐकत होते. पोलीस किंवा सैनिक यांनी जमावाला कसे हाताळावे, याचे काही संकेत आहेत. प्रथम तोंडी सूचना द्यायच्या असतात. त्या न पाळल्या गेल्यास लाठीमार आणि त्याचाही उपयोग न झाल्यास गोळीबार असे टप्पे असतात. गोळ्याही जमावाच्या खालच्या बाजूला झाडायच्या असतात. म्हणजे जमाव जखमी व्हावा, त्याला जरब बसावी, पण शक्यतो माणसे मरू नयेत.
 
डायरने यातले काहीही न करता सरळ हुकूम दिला, ’फायर!’ युद्धात, युद्धासाठी वापरल्या जाणार्‍या बंदुका दणादण वाजू लागल्या. समोरच्या किमान दहा हजार लोकांच्या हातात मात्र कोणतेही शस्त्र नव्हते. अखंड दहा मिनिटे अविरत गोळीबार सुरु होता. काडतुसे संपली, तेव्हाच गोळीबार बंद झाला.
 
असा हा प्रचंड पराक्रम गाजवून डायर आणि आयर्व्हिंग आपल्या शिबंदीसह निघून गेले. नशीब एवढेच की, मशीनगन्स अरुंद रस्त्यामुळे आत नेता आल्या नाहीत, अन्यथा त्याने मुडद्यांच्या राशीच रचल्या असत्या. स्वतःला सुधारलेले, प्रागतिक, आधुनिक वगैरे म्हणवून घेणार्‍या या इंग्रजांची मनोवृत्ती मध्ययुगीनच होती. प्रतिपक्षाला नामोहरम करायचेय ना, मग बेछूट कत्तल करा. त्याशिवाय त्यांना कळायची नाही आपली ताकद! मध्ययुगात याच मनोवृतीतून चंगेजखान तैमूरलंग, नादिरशहा यांसारख्या कत्तलबाजांनी शत्रूच्या मुंडक्यांचे मनोरे रचले नि रक्तामांसाचा चिखल केला. जलियाँवाला बाग हत्याकांड प्रत्यक्ष घडवणारा रेजिनाल्ड डायर आणि त्याला अशी काहीतरी जबरदस्त कारवाई करण्याची प्रेरणा देणारा पंजाब प्रांताचा गव्हर्नर सर मायकेल ओडवायर या दोघांची मनोवृत्ती तशीच होती.
 
अमृतसरच्या या भयंकर हत्याकांडाच्या बातम्या भारतभर पोहोचल्या दुःख-संतापाचा एकच कहर उसळला. अमृतसरचा सिटी सिव्हिल सर्जन, जो स्वतःच एक इंग्रज होता, तो मृतांचा आकडा एक हजार सांगत असताना, सरकार मात्र अधिकृतपणे 300 लोक मृत असे म्हणत होते. स्वामी श्रद्धानंदांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात 1 हजार, 500 मृत असे म्हटले होते. वृत्तपत्रांमधून आणि सभांमधून ओडवायर, डायर आणि एकंदरीतच इंग्रज सरकारविरुद्ध प्रचंड गदारोळ झाला. ब्रिटिश संसदेत या विषयावर जोरदार चर्चा झाली. खुद्द युद्धमंत्री विन्स्टन चर्चिल याने भारत सरकारच्या या कृत्याची ’सैतानी कृत्य’ या शब्दांत संभावना केली. परिणामी, डायरला सैन्यातून बरखास्त करण्यात आले आणि ओडवायरलाही ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिस’मधून काढून मायदेशी बोलावण्यात आले. मात्र, याखेरीज आणखी कसलीही कारवाई त्या दोघांवरही करण्यात आली नाही. साहजिकच सत्तेचा माज चढलेले ते दोघेहीजण ’आम्ही जे काही केले, ते ब्रिटिश साम्राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्यच होते,’ असेच म्हणत राहिले. त्यातही मायकेल ओडवायर हा जास्तच उर्मट आणि माजोरडा होता. दि. 13 एप्रिलच्या घटनेने देशभर प्रचंड अस्वस्थता होती. दोनच दिवसांनी म्हणजे दि. 15 एप्रिल 1919 रोजी पंजाब प्रांतातच गुजरानवाला या शहरात दंगा सुरू झाला. ओडवायरने सरळ ‘रॉयल एअरफोर्स’ला पाचारण केले आणि सांगितले, ’विमानातून मशीनगन्स चालवा. तेवढ्याने भागले नाही, तर दंगेखोरांवर बॉम्ब टाका.’ वायुदलाने हुकमाची अंमलबजावणी केली. 12 जण ठार झाले नि 27 जखमी झाले. हेदेखील सरकारी आकडे आहेत.
परंतु, रेजिनाल्ड डायर आणि मायकेल ओडवायर यांचा हा मुजोरपणा आणि संताप मुळात एका भयातून निर्माण झाला होता. ते भय म्हणजे, भारतात इंग्रजी राजवटीविरुद्ध 1857 सालप्रमाणेच काहीतरी जबरदस्त क्रांती होणार आहे, अशी चाहूल त्यांना लागली होती.
 
1857ची क्रांती दडपून टाकल्यावर इंग्रजांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’चे बाहुले बाजूला करून रीतसरपणे भारताचा राज्यकारभार ब्रिटिश पार्लमेंटच्या हाती घेतला. एक अनंत बलवान आणि सूक्ष्म असे राज्ययंत्र स्थापित करून यांनी पुढची 40-45 वर्षे भारताची मनसोक्त लूट केली. पण, हे सदा-सर्वकाळ जमेल याची त्यांना शाश्वती वाटेना. 1905 साली व्हॉईसरॉय कर्झनने बंगालची फाळणी याचसाठी तर केली. पण, तो उद्योग चांगलाच अंगाशी आला. आतापर्यंत असंघटित असलेला भारत उलट वेगाने संघटित होऊ लागला. इंग्रजांच्या दृष्टीने डोकेदुखी असणारे महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब हे प्रांत तर भलतेच सक्रिय झाले. अखेर 1911 मध्ये इंग्रजांना झक् मारत बंगालची फाळणी रद्द करावी लागली. यामुळे उत्साहित झालेल्या क्रांतिकारकांनी 1912 साली व्हॉईसरॉय लॉर्ड हार्डिंजवर बॉम्ब फेकला. पंजाबचे लाला हरदयाळ आणि बंगालचे रासबिहारी बसू हे युरोप-अमेरिकेतून काहीतरी जबरदस्त क्रांतियुद्ध पेटवण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या इंग्रजांना यांच्या गुप्तहेरांकडून मिळत होत्या.
 
तेवढ्यात म्हणजे 1914 साली युरोपात महायुद्ध पेटले. या युद्धात भारतीय क्रांतिकारक जर्मनी-तुर्कस्तान यांना मदतीला घेऊन अफगाणिस्तानमार्गे भारतावर लष्करी हल्ला करण्याचीही शक्यता इंग्रजांना वाटत होती. याचा बंदोबस्त करण्यासाठी 1915 साली इंग्रजांनी ’डिफेन्स ऑफ इंडिया अ‍ॅक्ट-1915 नावाचा एक कायदा पारित करून घेतला. कुणाही व्यक्तीला बिना वॉरंट अटक करण्याचा आणि बिना चौकशी कितीही काळ तुरुंगात डांबून ठेवण्याचा अधिकार या कायद्याने सरकारला मिळाला.
 
1918 साली महायुद्ध संपले, जर्मनी-तुर्कस्तान परभूत झाले. पण, भारतीय क्रांतिकारकांची गुप्त ’गदर पार्टी’ म्हणजे क्रांतिपक्ष याच्या कारवाया थांबेनात. ‘गदर’वाले भारतीय सैन्यात उठाव घडवून आणणार, अशा खबरा इंग्रजांना मिळू लागल्या. याचा बंदोबस्त करण्यासाठी न्यायाधीश सर सिडने रौलेट याच्या कमिशनने ’डिफेन्स ऑफ इंडिया अ‍ॅक्ट, 1915’ मध्ये आणखी काही कडक नियम लावले. 1919च्या मार्चमध्ये हा नवा ‘रौलेट अ‍ॅक्ट’ लागू झाला. त्याच्या विरोधात देशभर कडक हरताळ आणि निदर्शने झाली. पंजाब प्रातात ‘रौलेट अ‍ॅक्ट’विरोधी निदर्शन करणारे काँग्रेसचे दोन मान्यवर नेते सत्यपाल आणि डॉ. किचलू यांना सरकारने पकडले आणि अज्ञातस्थळी अटकेत ठेवले. वातावरण त्यामुळे अधिकच तापले. येत्या बैसाखी सणाला प्रांतभर काहीतरी जबरदस्त घडणार; 1857 सारखी क्रांतीदेखील होऊ शकते, अशा खबरा गुप्तचरांकडून मिळत गेल्यामुळे बहुधा ओडवायर आणि डायर आणखी आणखी पिसाटत गेले. इंग्रजी साम्राज्याविरुद्ध बंड करण्याची हिंमत करतात हे भारतीय? दाखवूयाच यांना इंग्रजी साम्राज्याची ताकद! म्हणजे बंड होण्याचे भय, स्वतःच्या शक्तीचा माज आणि जन्मजात तुच्छता आणि गुलाम भारतीयांबद्दलची जन्मजात तुच्छता यांतून ही कृती घडली.
 
कवी प्रदीप यांच्या शब्दांत आपण या हुतात्म्यांचे पुण्यस्मरण करूया,
 
जलियाँवाला बाग ये देखो,
यहीं चली थी गोलियाँ।
एक तरफ बंदूके दनदन,
एक तरफ थी टोलियाँ।
मरनेवाले बोल रहे थे, इन्कलाब की बोलियाँ।
यहाँ लगा दी बहनों ने भी बाजी
अपने जान की।
इस मिट्टी से तिलक करो,
ये धरती है बलिदान की।
वन्दे मातरम्।


मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.   

अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121