एसटीचे उत्पन्न वाढवण्याबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?
11-Apr-2025
Total Views | 11
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पूर्ण पगार मिळाला नसल्याने एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान, याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचे उत्पन्न वाढवण्याबाबत प्लॅन सांगितला. शुक्रवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "कोरोनाकाळातही एसटी महामंडळाला आम्ही बजेटमधून २५० ते ३०० कोटी रुपये देत होतो. आता महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत दिली आहे. अन्य घटकांनादेखील आपण सवलती देतो. सवलतींच्या रकमेची बजेटमध्ये तरतूद करत असतो. प्रताप सरनाईक आमचे सहकारी आहेत. त्यांनी कॅबिनेट आणि अर्थसंकल्पाच्यावेळी सांगितले. आम्ही काही ई व्हेईकल बसेस आणि काही सीएनजी बसेस घेण्याचे ठरवले आहे. देशात किंवा जगात सार्वजनिक वाहतूक सेवा कुठेही फायद्यात नसते अशी माझी माहिती आहे. शेवटी सर्वसामान्य माणसांना सार्वजनिक वाहतूक सेवेत किफायतशीर तिकीटाचे दर असले पाहिजे. त्यासाठी सगळेच सरकार प्रयत्न करत असून आमचाही तोच प्रयत्न आहे."
"अनेक बसस्थानकांच्या जागा मोक्याच्या आहेत. बीओटी तत्वावर त्या जागा देऊन त्यातून काही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्याकरिता ६० वर्षांसाठी करार करून त्यानंतर तो पुन्हा ३० वर्षांनी वाढवण्याची तरतूद करायची, असा प्रस्ताव ठेवणार आहोत," असेही त्यांनी सांगितले.