‘वक्फ सुधारणा विधेयक’ अल्पसंख्याकांच्या कल्याणाचा मार्ग : आबीद अली यासीन चौधरी
11-Apr-2025
Total Views | 17
1
मुंबई: ( Abid Ali Yasin Chaudhary interview ) ‘वक्फ सुधारणा विधेयका’वरून सध्या राजकीय घमासान सुरू आहे. काही ठिकाणी अल्पसंख्याकांचा याला पूर्णतः पाठिंबा आहे, तर काही इस्लामिक कट्टरपंथी याच्या विरोधात आहेत. विरोधी पक्षानेही विरोधाचाच सूर लावला आहे. पण हे विधेयक अल्पसंख्याकांच्या कल्याणाचा मार्ग कसा आहे, याबाबत ‘भाजप अल्पसंख्याक मोर्चा सुफी संवाद महाअभियान’चे राष्ट्रीय सहप्रभारी आबीद अली यासीन चौधरी यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विशेष प्रतिनिधी ओंकार मुळ्ये यांनी साधलेला संवाद.
‘वक्फ बोर्डा’त दाऊदी बोहरा समाजाच्या प्रतिनिधित्वावरही चर्चा झाली होती. मात्र, दाऊदी बोहरा समाजाच्या लोकांना ‘वक्फ बोर्डा’त प्रतिनिधित्व नको आहे, असे का?
बोहरा समाजात त्यांचे प्रतिनिधित्व करणारी एक व्यक्ती असते, त्यांना ते ‘इमाम’ म्हणतात. ते जे सांगतील, त्यावर हे ठाम असतात. त्यामुळे त्यांच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतला असेल, त्याचेच हे पालन करत असतील. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही मताशी आम्ही सहमतच आहोत. शेवटी तेदेखील मुसलमान असून समाजाचा एक घटक आहेत.
विधेयक येण्यापूर्वी ‘वक्फ बोर्डा’कडून ‘कलम 40’चा गैरवापर करत जो मनमानी कारभार सुरू होता, त्याकडे तुम्ही कसे पाहता?
‘वक्फ बोर्डा’कडून मनमानी कारभार सुरू होता, म्हणून आज ही वेळ आली आहे आणि ‘वक्फ सुधारणा विधेयक’ समोर आले आहे. जर त्यांचा व्यवहार चोख असता, मालमत्तांचा हिशोब नीट ठेवला असता, तर आज चित्र वेगळे असते. एखादे लग्न किंवा कुठले कार्यक्रम असतील, तर इदगाहची जमीन, मशिदीची जमीन किंवा दर्गाहची जमीन सर्रास विकली जायची किंवा भाडेतत्त्वावर दिली जायची. तेव्हा हे विरोधक कुठे होते. विधेयक आल्यास आपली व्होटबँक संपणार, याची भीती विरोधकांना आहे. त्या भीतीपोटीच वादविवाद सुरू झाले आहेत. विधेयकामुळे मुस्लीम समाजासमोरही एक पारदर्शकता तयार होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या समजातील मुलांचा शिक्षणाचा खर्च ‘वक्फ बोर्डा’ने उचलला आहे, असे कुठेच सापडणार नाही किंवा कोणा गरजू मंडळींचा रुग्नालयामधील खर्च ‘वक्फ’ने केला आहे,” असेही दिसणार नाही. सत्य दाबून ठेवण्यासाठी भांडणारे लोक कधीच समाजाचे कल्याण करणार नाहीत.
अशा लोकांना सुतासारखे सरळ करण्याचे काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारने केले आहे. ‘एक हात में कुरआन एक हात में कम्प्युटर’ देणारे पहिलेच पंतप्रधान या देशाला लाभले आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांनी विरोध करण्यापेक्षा समर्थन करणे अपेक्षित आहे. कारण हा त्यांच्या कल्याणाचा मार्ग आहे.
‘वक्फ मालमत्तां’चे ‘जिओ मॅपिंग’ का गरजेचे आहे?
‘वक्फ बोर्डा’ने दावा केलेली जमीन नेमकी कुठे आहे, याबाबत लोकांमध्ये पारदर्शकता येणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण काही लोक असे असतात, जे बोट दाखवून सांगतात, ही एवढी ‘वक्फ’ची जागा आहे. आता जर त्यावर आधीच मंदिर तयार असेल, तर मंदिर तयार होताना कुठे होता? आताच कसे काय उगवले? जागा विकली तेव्हा हे झोपलेले का? ‘वन्स ए वक्फ, ऑलवेज ए वक्फ’ असे म्हणता, तर ती जमीन विकलीच कशी गेली. यावरून हेच स्पष्ट होते की, सामान्य अल्पसंख्याक बांधवांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ‘वक्फ मालमत्तां’चे ‘जिओ मॅपिंग’ होणे महत्त्वाचे आहे.
‘वक्फ बोर्ड’ असेल तर सनातन बोर्डही असावा अशीसुद्धा मागणी होतेय, याबाबतीत काय म्हणाल?
भारत हा असा देश आहे, जिथे विविध धर्माचे आणि भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. जर अल्पसंख्याकांसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, तर सनातन बोर्डाची मागणी होत असल्यास तीदेखील रास्तच आहे. हिंदू बांधव याच देशाचे नागरिक आहेत, त्यांनासुद्धा सनातन बोर्डाची मागणी करण्याचा अधिकार आहे. मला तर वाटते, सरकारने सनातन बोर्ड स्थापन करावा आणि यातूनच सनातन धर्माचा विचार, प्रसार आणि प्रचार व्हावा.
बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरीचा मुद्दाही तितकाच गंभीर आहे, याकडे तुम्ही कसे पाहता?
देशात अल्पसंख्याक फक्त मुसलमान नाही, तर ख्रिश्चन, पारसी, शीख असे सर्वच आहेत. अशात बांगलादेशी आणि रोहिंग्ये त्यांचे देश जिथे ते बहुसंख्याक आहेत, ते सोडून भारतात येणार आणि इथल्या अल्पसंख्याकांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या सुखसुविधांचा लाभ घेणार, यात भारतीय मुसलमानांचेच नुकसान आहे. बांगलादेशी-रोहिंग्यामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात, आरोग्याचा मिळणार्या सुविधांचे विभाजन होते. या सर्व गोष्टी थांबवाव्याच लागतील. बांगलादेशी-रोहिंग्ये देशाचा उद्धार करायच्या विचाराने येत नाहीत. बॉम्ब ब्लास्ट, महिलांवर अत्याचार, एखाद्या व्यक्तीची हत्या अशा ठिकाणी आरोपी म्हणून यांचीच नावे पुढे येतात. अशा लोकांमुळे भारतावर प्रेम करणारा मुसलमान बदनाम होतो. आरडाओरड करणारे विरोधक अशा लोकांकडे निव्वळ व्होटबँक म्हणून बघत असतात. आम्ही भारतीय मुसलमान आहोत आणि भारतीय म्हणूनच राहणार.
‘वक्फ मालमत्तां’ची अकाऊंटिबिलिटी सुरू झाल्यास त्याकडे कसे पाहाल?
‘वक्फ मालमत्तां’चा गैरवापर करणार्या मंडळींना सर्वात प्रथम चाप बसेल. याने त्यांचीच पोलखोल होणार आहे. कारण आजपर्यंत जो हिशोब त्यांनी लपवला, तो त्यांना द्यावा लागेल. यातून पुढे समाजालाही आणि त्यांच्याच समाजातील इतर लोकांनाही कळेल की कुठले कुठले आणि कसे व्यवहार झाले. यात समाजाचे भले होणार की, कुठल्या एका व्यक्तीचे भले होत आहे, यातही पारदर्शकता येईल. चोराच्या उलट्या बोंबा, असे काहीसे चित्र आज तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे, परंतु सरकारने विधेयक आणून अतिशय चांगले कार्य केले आहे.
भारतीय मुसलमान म्हणजे याची नेमकी व्याख्या काय?
भारतीय मुसलमान म्हणजेच तो भारतात जन्माला आला, त्याचे पारपत्र भारतात बनणार आहे, त्याचे शाळेचे दाखलेही भारताचेच असणार आहेत, याचा अर्थ तो भारतीय मुसलमानच असणार. जेव्हा माझ्यासारखे सर्व मुसलमान अभिमानाने म्हणतील की, “होय, मी भारतीय मुसलमान आहे,” तेव्हा सर्व भांडणे संपतील. देशाच्या हिताबद्दल बोलायला प्रत्येकाची सुरुवात होईल. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारतीय मुसलमानच होते. त्यांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या डोळ्यांसमोर ठेवायला हवा. भारतीय मुसलमान खोट्या भूलथापांना कधीच भुलणार नाही.