नभासारिखे रूप या राघवाचे

    10-Apr-2025
Total Views | 14
 
lord shree ram
 
मनोबोधाच्या पहिल्या श्लोकात गणेश व शारदा यांना नमन करून, स्वामींनी ‘राघवाचा पंथ’ सांगायला सुरुवात केली. स्वामी म्हणतात, ‘गमू पंथ आनंत या राघवाचा.’ राघवाचा पंथ, राघवाचे वर्णन हे परमात्म स्वरूपाचे वर्णन आहे. परमात्म स्वरूप जाणण्याचा तो पंथ आहे. परमात्मस्वरूप आकाशाप्रमाणे व्यापक आहे, असे स्वामींनी यापूर्वीच वर्णन केले आहे. वस्तूचे व्यापकत्व त्याच्या स्थूल सूक्ष्मतेवर अवलंबून असते. स्थूल वस्तूची व्यापकता त्याच्या आकारावरून ठरते. सूक्ष्म वस्तू स्थूल वस्तूपेक्षा अधिक व्यापक असते. परमेश्वर तत्त्व सूक्ष्मतिसूक्ष्म असल्याने, त्याचे व्यापकत्व विश्वालाही कवेत घेणारे असते.
 
परमेश्वर तत्त्व अणूरेणूत भरून राहाते, त्याच्याशिवाय रिकामी जागाच उरत नाही. त्या व्यापकत्वात सर्व दृश्य, अदृश्य ब्रह्ममय होऊन जाते, हे आपण यापूर्वीच्या श्लोकातून पाहिले. श्लोक क्रमांक 195 पासून स्वामींनी आकाशाप्रमाणे व्यापकत्व असलेल्या राघवाचे, ब्रह्मस्वरूपाचे वर्णन केले आहे. ते पुढे चालू ठेवत स्वामी पुढील श्लोक सांगतात,
 
नभासारिखें रूप या राघवाचेें।
मनीं चिंतिता मूळ तूटे भवाचें।
तया पाहतां देहबुधी उरेना।
सदा सर्वदा आर्त पोटीं पुरेना॥197॥
 
सगुण उपासनेत रामाच्या रूपाला तेजस्वी, अथांग आकाशाची दिलेली उपमा भक्ताचे मन प्रसन्न करणारी आहे. तसेच या ठिकाणी राघवाचे रूप अर्थात परमात्मस्वरूप आकाशासारखे सर्वत्र व्यापून आहे, असे स्वामी म्हणतात. आपल्या मनाला दृश्य वस्तू पाहण्याची सवय असल्याने, व्यापकत्वासाठी स्वामी आपल्या रोजच्या पाहण्यातल्या आकाशाची उपमा देतात. परंतु, आकाश तत्त्व पंचमहाभूतांपैकी एक असल्याने, शाश्वत परमात्म स्वरूपासाठी आकाश तत्त्वाचा दृष्टान्त साजेसा होत नाही, याची समर्थांना जाणीव आहे. पण स्थूलातून सूक्ष्माकडे जाता यावे, यासाठी स्वामी आकाशाचे व्यापकत्व प्रथम आपल्याला सांगतात. आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते सहज समजेल, म्हणून समर्थ ‘नभासारिखें रूप या राघवाचे’ असे म्हणतात. त्यानंतर मनाने त्याचे सतत चिंतन केल्यावर काय होऊ शकते, ते स्वामी सांगत आहेत. मन भोवतालच्या दृश्य वस्तू ज्ञानेंद्रियांनी पाहाते.
 
त्यांपैकी एखाद्या वस्तूचे मनाने सतत चिंतन केले, तर मन त्या वस्तूशी, त्याच्या रूप-गुणांशी तादात्म्य पावते असा आपला अनुभव असतो. त्याप्रमाणे मनाने जर शाश्वत राघवरूपाने परमात्म स्वरूपाचे सतत चिंतन केले, तर काही वेळाने मन त्या शाश्वत रूपाशी तद्रूप होऊन जाईल व त्याची अनुभूती मन घेऊ शकेल. या अनुभूतीने शाश्वताच्या तद्रूपतेने मन अधिकाधिक व्यापक आणि सूक्ष्म होत जाईल. या अनुभूतीनंतर मन सूक्ष्मातिसूक्ष्म झाल्याने, त्याचा देहाशी असलेला संबंध सुटू लागेल. अर्थातच, मन व्यापक विचार करू लागेल.
 
त्यामुळे आपल्याला दिसणारी वस्तू खरी आहे, ही मनाची धारणा झाल्याने मन सीमित असते, त्या भावनेचे, स्थितीचे निराकरण होत जाईल. मन दृश्य वस्तू सत्य का मानते, या कल्पनेचे मूळ कारणच नष्ट होईल. याचा अर्थ मनाची सूक्ष्मता वाढल्याने, देहबुद्धी कमी होऊ लागेल. यापूर्वी मनाला वाटत होते की, देह म्हणजेच मी आहे. देहबुद्धीची कल्पना मनात दृढ असल्याने, त्यावेळी मन सूक्ष्म विचार करू शकत नव्हते. देहाचे सुखदुःख म्हणजेच माझे सुखदुःख अशी भावना झाल्याने, देहाबरोबर मनही वासनातृप्तीत आनंद शोधत होते. परंतु, परमात्म स्वरूपाचे चिंतन घडू लागल्यावर, मन सूक्ष्म आणि व्यापक झाल्याने देहबुद्धी उरत नाही. देहबुद्धी नाहीशी झाल्यावर आत्मबुद्धी उगम पावल्याने, इंद्रियभोगाच्या वासना मनात शिल्लक राहात नाहीत. मनाला जाणीव होऊ लागते की, देहबुद्धीतून उत्पन होणार्‍या इंद्रियजन्य सुखांना मर्यादा असतात. ते सुख निर्भेळ नसून फसवे असते.
 
जीवाला इंद्रियसुखाच्या लालसेने, त्यापाठोपाठ येणारी दुःखेही सहन करावी लागतात. कालांतराने, सुखाच्या शोधात असलेला जीव इंद्रियसुखांना कंटाळतो. तथापि, राघवाचे रूप अर्थात परमात्म स्वरुप शाश्वत, सूक्ष्म आणि व्यापक असल्याने, त्याच्या चिंतनातून मिळणारा आनंद व्यापक स्वरूपाचा असतो. तो सार्‍या दुःखांना पार करून, मनाला समाधान आणि प्रसन्नता मिळवून देतो. मनाला त्याचा कंटाळा येत नाही. परमात्म स्वरूपात तादात्म्य पावणारे मन आपले भान विसरते. व्यापक स्वरूपाचा आनंद मिळत आहे, याची जाणीवही मनाला राहात नाही. म्हणून स्वामी म्हणतात की, ‘सदा सर्वदा आर्त पोटीं पुरेना.’
समर्थ वरील श्लोकांत ’नभासारिखें रूप या राघवाचे’ असे म्हणाले; कारण सामान्य माणसाला रोजच्या व्यवहारात नभाचे व्यापकत्व माहीत असते. स्वामींनी रामरुपाचे, परमात्मरूपाचे वर्णन करताना नभाचा दृष्टान्त दिला खरा, पण तो पुरेसा नाही किंवा योग्य नाही, असे स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.

नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे।
रघुनायेका ऊपमा ते न साहे।
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावें।
तया व्यापकु व्यर्थ कैसें म्हणावे॥198॥
 
आतापर्यंतच्या श्लोकांतून समर्थ राघवाच्या, परमात्मरूपाच्या व्यापकत्वासाठी नभाची, आकाशाची उपमा देत आले आहेत. परंतु, त्यात उपमेय व उपमान यांची योग्यता सारखी नाही. उपमेत उपमेय व उपमान यांचा दर्जा समान असला पाहिजे, हे लक्षात आल्याने स्वामी या श्लोकात स्पष्ट करीत आहेत की, रघुनायकासाठी आकाशाची उपमा साजेशी नाही. परमात्म स्वरूपाच्या अतिसूक्ष्म आणि शाश्वततेचा विचार करता, आकाश आणि परमात्म तत्त्व यांची तुलना करता येणार नाही. आकाशाच्या ठिकाणी मर्यादित अर्थाने व्यापकत्व आहे, हे बरोबर आहे. परंतु, त्या व्यापकत्वात असा भाव उत्पन्न होतो की, ते कशाला तरी व्यापते. या दुजेपणाच्या भावामुळेच, परमात्मतत्त्वासाठी आकाशाची उपमा योग्य होत नाही. परमात्म स्वरूप स्वयंभू असल्याने, त्याचे व्यापकत्व हा त्याच्या ठिकाणचा बाहेरून आलेला गुण नसून ते स्वभावतःच आहे. ते सर्वत्र व्यापून उरले असल्याने, त्याने अमुक स्थल, मर्यादेला व्यापले असल्याचा दुजाभाव तेथे उत्पन्न होत नाही.
 
या आणि आणखी कारणांनी परमात्मस्वरूपाला आकाशाची उपमा शोभून दिसत नाही; ती अयोग्य आहे. परमात्मस्वरूप हे सहजपणे उपजत, स्वयंभू असल्याने त्याच्या ठिकाणी द्वैत संभवत नाही. जे स्वभावतःच आहे, त्याला व्यापक म्हणता येत नाही. व्यापकत्वात दुसर्‍या कुणालातरी व्यापले, असा अर्थ होतो. वस्तुतः जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, वातावरणी अणूरेणूत असणारे परमा त्मस्वरूप एकमेव असल्याने, त्याला व्यापक ठरवून वेगळे करणे चुकीचे ठरेल. म्हणून स्वामी म्हणतात की, ‘तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे.’ अशा रितीने परमात्म स्वरूप आकाशासारखे व्यापक आहे, या विधानातील तार्किक विसंगती स्वामींनी स्पष्ट केली आहे. विश्वव्यापाराचा विचार करता, आकाश आणि इतर पंचमहाभूते ही अलीकडची ठरतात. परमात्म स्वरूप अर्थात परब्रह्म अति पुरातन आहे, असे तौलनिकदृष्ट्या म्हणता येते. तोच स्वामींच्या पुढच्या श्लोकाचा विषय आहे. त्यात स्वामींनी ते रूप अति जीर्ण, विस्तीर्ण आहे, असे म्हटले आहे. त्याचे विवेचन पुढील लेखात पाहता येईल. (क्रमशः)
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121