मुंबई : "सुधीर फडके (बाबूजी) हे केवळ एक उत्कृष्ट गायक नव्हते, तर ते स्वरगंधर्व होते. गाणं आणि गाण्यातील शब्द आपण महाराष्ट्राला बाबूजींनी शिकवले" असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित स्वर गंधर्व स्व. सुधीर फडके दृक श्राव्य संकुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होते. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अॅड आशिष शेलार म्हणाले की " पु.ल. देशपांडे कला अकादमी इथल्या या अद्यावत दृक-श्राव्य संकुलाच्या सुविधा सर्वांसाठी उपलब्ध असतील. या अद्यावत दृक-श्राव्य संकुलाचा विचार करताना आपसूकच सुधीर फडके यांचे नाव या संकुलाला द्यावे असा विचार आम्ही केले."
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे दि. ९ एप्रिल रोजी स्वरगंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या अद्यावत संकुलाचे उद्घाटन ज्येष्ठ गायक तथा संगीतकार श्रीधर फडके यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रवींद्र नाट्यमंदिाराच्या लघु नाट्यसंकुलात स्व. सुधीर फडके यांच्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रख्यात गायक अजित परब, सोनाली कर्णिक, केतकी भावे - जोशी, अभिषेक नलावडे यांच्या गायिकाने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांनी केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना सांस्कृतिक कार्यविभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले की " सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या कल्पक नेतृत्वामुळे या अद्यावत दृक - श्राव्य संकुलाचे काम पूर्ण झाले. आतापर्यंत रविंद्र नाट्यमंदिर हे केवळ नाटाकासाठी ओळखले जात होते, परंतु यामध्ये आता दृश्यकला आणि दृक - श्राव्य कलेची सुद्धा भर पडली आहे." या प्रसंगी ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर, ज्येष्ठ लेखक- दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, प्रख्यात गायक उपेंद्र भट, ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे, ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी, ज्येष्ठ गायिका राणीताई वर्मा, किशोरीताई आमोणकर यांचे सुपुत्र विभास आमोणकर उपस्थित होते.
भाषिक विविधतेमुळे वितुष्ट निर्माण होता कामा नये!
या प्रसंगी राज्यात सुरु असलेल्या भाषिक वादावर भाष्य करताना अॅड आशिष शेलार म्हणाले की " समर्थांनी म्हटले आहे की 'सकळांचे मन एक'. जर सगळ्यांचे मन एक असेल, तर दुसऱ्यावर भाषेसाठी जबरदस्ती करणे योग्य नाही. आपल्याकडे भाषिक विविधता आहे. परंतु भाषिक विविधतेमुळे वितुष्ट निर्माण होता कामा नये. सर्व समाज एकत्रितपणे पुढे गेला पाहिजे."