मुंबई, दि.१० : प्रतिनिधी मुंबई 'मेट्रो- ३'च्या टप्पा २अ मधील कामे प्रगतीपथावर आहेत. या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर सध्या नामफलक लावण्याचे काम सुरू असून, लवकरच सर्व स्थानकांची नावे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ठळकपणे लावली जातील याची हमी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने दिली आहे. यापूर्वी आरे ते बीकेसी दरम्यानचा मेट्रो-३ चा टप्पा सुरू झाला असून, त्या मार्गावरील सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजीत नामफलके आहेत.
एमएमआरसी स्पष्ट करते की, मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे आणि तिचा सन्मान राखणे ही आमची जबाबदारी आहे. ‘मराठीचा वापर जाणूनबुजून टाळला जात आहे’ हा आरोप पूर्णतः निराधार आहे. एमएमआरसी हे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय व सार्वजनिक संवादांतील मराठीच्या वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करते.
टप्पा २ अ अंतर्गत येणाऱ्या सर्व स्थानकांवरील कामे वेगाने सुरू असून, अंतिम स्वरूपात या सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतील नामफलक लावले जाणार आहेत. त्यामुळे सर्व प्रवाशांना माहिती सहज समजावी व कोणाचीही गैरसोय होऊ नये, याची आम्ही काळजी घेतो. एमएमआरसी मुंबईकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून, प्रत्येक टप्प्यावर दर्जात्मक आणि सर्वसमावेशक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे स्पष्टीकरणही एमएमआरसीएलने दिले आहे.