वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार? सुनावणीत काय घडलं?
10-Apr-2025
Total Views | 25
मुंबई : बीड जिल्हा सत्र न्यायालयात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीनंतर उज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "आरोपी वाल्मिक कराडची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यात यावी असा अर्ज आम्ही दिला आहे. वाल्मिककडून या अर्जावर अद्याप खुलासा दाखल करण्यात आलेला नाही. या अर्जावर पुढे रीतसर सुनावणी होईल."
ते पुढे म्हणाले की, "न्यायालयामध्ये आज आम्ही जी कागदपत्र सादर केली त्यातील प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडीओ आरोपींनीच काढला असल्याचे सीआयडीच्या तपासात दिसून आले होते. हा व्हिडीओ सीलबंद परिस्थितीत फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला होता. तो संपूर्ण व्हिडीओ आम्ही न्यायालयात सादर केला. परंतू, या व्हिडीओला बाहेर कुठल्याही प्रकारे प्रसिद्धी मिळू नये. या व्हिडीओला प्रसिद्धी मिळाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मकोका कायद्याच्या तरतूदी अंतर्गत हा व्हिडीओ बाहेर येऊ नये, अशी विनंती आम्ही न्यायालयाला केली. यावर न्यायालयाने सर्व आरोपींचे म्हणणे मागितले आहे. २४ तारखेला त्यांचे म्हणणे दिले जाईल आणि यावर सुनावणी होईल," अशीही माहिती उज्वल निकम यांनी दिली.
मला निर्दोष मुक्त करा : वाल्मिक कराड
"माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नसल्याने मला या खटल्यातून निर्दोष मुक्त करावे, असा अर्ज वाल्मिक कराडने न्यायालयात केला आहे. न्यायालयाने या अर्जावर सीआयडीचे म्हणणे मागितले असून येत्या २४ तारखेला सीआयडी आपले म्हणणे सादर करेल. त्यानंतर यावर सुनावणी होईल. त्यानंतर वाल्मिक कराडतर्फे आणि सरकारतर्फे यावर युक्तिवाद करण्यात येईल," अशी माहितीही उज्वल निकम यांनी दिली.