प्रभादेवी देवी पूल आजपासून वाहतुकीस बंद

वाहतूक व्यवस्थेत होणार महत्वाचे बदल ; वाहतूक पोलिसांनी मागवल्या सूचना

    10-Apr-2025
Total Views | 10

elphinstone road


मुंबई,दि.९ : प्रतिनिधी 
अटल सेतूची जोडणी थेट वरळीपर्यंत मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल मार्ग दोन वर्षांसाठी बंद केला जाणार आहे. त्यानुसार वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहे.

'शिवडी-वरळी उन्नत मार्ग'अंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडण्यासाठी एल्फिन्स्टन पुलाचा वापर होतो. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) हा पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल (डबलडेकर पूल) बांधणार आहे. हा पूल बंद करण्यासाठी, पुलाच्या पाडकामासाठी परवानगी देण्याकरीता वाहतूक पोलिसांनी नागरिकांकडून सूचना-हरकती मागविल्या आहेत.

वाहतूक कशी वळवावी, कोणते पर्याय वाहतुकीसाठी असतील, अशा अनेक सूचना नागरिकांना करता येणार आहेत. नागरिकांना १३ एप्रिलपर्यंत addlep.trffic@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर सूचना हरकती पाठवता येणार आहेत. सूचना-हरकती जाणून घेऊन त्यानंतर हा पूल बंद करण्यासाठी परवानगी देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. याबाबत वाहतूक पोलिसांनी समाज माध्यमांतून देखील हरकती आणि सूचना देण्याचे आवाहन केले आहे.

प्रभादेवीतील वाहतूक मार्गात बदल


पुलावरून दादर पश्चिमेकडे जाणारी वाहने मडके बुवा चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने टिळक ब्रिजमार्गे जातील. तर प्रभादेवी व वरळीकडे जाणारी वाहने मडके बुवा चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने भारत माता जंक्शनवरून उजवे वळण मार्गक्रमण करतील. पुलाची पूर्व वाहिनी बंद केल्याने प्रभादेवी पुलामार्गे परेल परिसराकडे जाणारी वाहने संत रोहिदास चौक येथून सरळ वडाचा नाका जंक्शन येथून लोअर परेल पूलमार्गे भारत माता जंक्शन येथून जातील. तर सायन, माटुंगाकडे जाणारी वाहने सेनापती बापट मार्गावरून डावे वळण घेऊन व्ही. एस. मटकर मार्ग व बाबूराव परुळेकर मार्ग टिळक पुलामार्गे खोदादाद सर्कल येथून जातील, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

नो-पार्किंग मार्ग

ना. म. जोशी मार्ग : आर्थर रोड नाका ते धनमिल नाका आणि एसिक भवन ते वडाचा नाक्यापर्यंत दोन्ही वाहिनी

सेनापती बापट मार्ग :
संत रोहिदास चौक ते रखांगी जंक्शनपर्यंत दोन्ही वाहिनी

महादेव पालव मार्ग :
कॉ. कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) ते शिंगटे मास्तर चौकापर्यंत दोन्ही वाहिनी
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121