अथर्वशीर्ष म्हटले की साहजिकच नजरेसमोर गणरायाच्या रुपाचे वर्णन उभे राहाते. मात्र, जगावर मातृरुपाने माया पांघरणार्या जगदंबिकेच्या रुपसामर्थ्याचे वर्णन करणारे अथर्वशीर्ष प्रसिद्ध आहे. त्यालाच ‘श्री देवी उपनिषद’ असेही ओळखले जाते. यामध्ये देवीच्या गुणवैभवाचा आणि पराक्रमाचे वर्णन केले असून, कशा पद्धतीने हे संपूर्ण विश्वच्या उत्पत्तीशी जगदंबिकेची लीला आहे, याचे यथार्थ वर्णन वाचायला मिळते. अशा या जगदंबिकेच्या स्वरुपवर्णनाचा हा भावानुवाद...
गन्माता श्री ललिता त्रिपुरसुंदरी अर्थात सगुण ब्रह्म असलेल्या जगदंबेच्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारे ‘श्री देवी उपनिषद’ हे स्तोत्र, ‘देवी अथर्वशीर्ष’ म्हणूनही ओळखले जाते. ‘देवी अथर्वशीर्ष’ हे स्तोत्र प्राचीन संस्कृत ग्रंथांपैकी एक असून, याचे रचनाकार नेमके कोण आहेत हे स्पष्टपणे ज्ञात नाही. परंतु, हे अथर्ववेदाच्या परंपरेशी संबंधित असल्यामुळे, याला ‘अथर्वशीर्ष’ असे म्हणतात.
‘श्री गणेश अथर्वशीर्ष’ हे सर्वज्ञात आहे आणि त्याचे नित्य पठणही केले जाते. मात्र, ‘देवी अथर्वशीर्ष’ हे तितकेसे ज्ञात नाही. शक्तीउपासकांमध्ये हे स्तोत्र लोकप्रिय असले तरी, याचा सार्वत्रिक प्रचार झालेला नाही. या लेखाच्या माध्यमातून या अनुपम आणि अत्यंत प्रभावी स्तोत्राचा प्रचार प्रसार होईल, अशी नम्र आशा आहे.
सर्वे वै देवा देवीम् उपतस्थुः।
कासि त्वं महादेवीति॥
भक्तकल्याणार्थ एकदा देवीमातेने आपले रूप प्रकट केले, तेव्हा सर्व देवदेवता देवीजवळ जाऊन प्रार्थना करू लागले. हे महादेवी! आपण कोण आहात? ॥1॥
साब्रवीद अहं ब्रह्मस्वरूपिणी।
मत्तः प्रकृतिपुरुषात्मकम् जगत् शून्यञ्चाशून्यम् च॥
जगदंबा म्हणाली, मी ब्रह्मस्वरूप आहे. माझ्याकडूनच प्रकृतिपुरुषात्मक (कार्य-कारणरूप) जगताची उत्पत्ति होते ॥2॥
अहम् आनन्दानानन्दौ अहम् विज्ञानाविज्ञाने।
अहम् ब्रह्म अब्रह्मणि वेदितव्ये।
अहं पञ्चभूतान्यपञ्चभूतानि। अहमखिलं जगत्॥
मी साक्षात् आनंद आहे, मीच सच्चिदानंद आहे, आनंदरूप हे माझेच प्रकटीकरण आहे. मी विज्ञान व अविज्ञानरूपा आहे. या जगतात जाणण्याजोगे असे ब्रह्म व अब्रह्म ही दोन्ही माझीच रुपे आहेत. मीच पंचीकृत व अपंचीकृत महाभूते, या रूपात विद्यमान आहे. समस्त दृश्यमान जगत् हे माझेच प्रकटीकरण आहे ॥3॥
वेदो अहम् अवेदो अहम्। विद्या अहम् अविद्या अहम्।
अज अहम् अनजहम्। अधश्चोर्ध्वं च तिर्यक्चहम्॥
वेद आणि अवेद दोन्हीही रूपांनी मीच विद्यमान आहे. विद्या आणि अविद्या हे माझेच स्वरूप आहे. अजा (उत्पन्न झालेली प्रकृति) आणि अन् अजा या दोन्ही रूपांत (त्याहून भिन्न जे ते) मीच आहे. खाली, वर, आजूबाजूला अशी सर्वत्र मीच व्यापलेली आहे ॥4॥
अहं रुद्रेभिर्वसुभिश्चरामि अहमादित्यैरुत विश्वदेवैः।
अहं मित्रावरुणावुभौ बिभर्म्यहमिन्द्राग्नी अहमश्विनावुभौ ॥5॥
मीच एकादश रुद्रा (दश इन्द्रिये आणि मन) आणि अष्टवसूंच्या (अग्नि, वायू, अंतरिक्ष, आदित्य, द्युलोक, चन्द्रमा व नक्षत्रे) रूपाने सर्वत्र संचार करते. मीच आदित्य व विश्वदेव यांच्या रूपाने भ्रमण करते. मित्र आणि वरुण, इंद्र आणि अग्नि, तसेच दोन्ही अश्विनीकुमार यांचे भरणपोषण मीच करते. ज्यांना आपण 33 कोटी देव असे संबोधतो, ती 33 तत्त्वे म्हणजे एकादश रुद्र अधिक अष्ट वसू अधिक द्वादश आदित्य अधिक विश्वादेव हेपण माझेच स्वरूप आहेत. अर्थात, या सर्व तत्त्वांना कार्यप्रवण करणारी चेतना मीच आहे.
अहं सोमं त्वष्टारं पूषणं भगं दधाम्यहम्। अहम् विष्णुमुरुक्रमं ब्रह्माणमुत प्रजापतिं दधामि ॥6॥
मीच सोम, त्वष्टा, पूषा व भगाला धारण करते. या चारही वैदिक देवता आहेत. सोम हा उल्लेख, सोमरस या दैवी पेयासाठी आणि चंद्रासाठी केला जाणारा उल्लेख आहे. त्वष्टा हा सृष्टीची रचना करणारा देव मानला जातो. पुषा हा मार्गदर्शक देव आहे आणि भग हा समृद्धी आणि ऐश्वर्याचा देव मानला जातो. अर्थात, वैदिक देवी-देवतासुद्धा, जगदंबेचीच रुपे आहेत. तसेच विष्णू, ब्रह्मदेव आणि प्रजापति यांचा आधार मीच आहे. ब्रह्मदेव हा सृजनाचे कार्य करतो, विष्णू पालन-पोषणाचे कार्य करतो आणि प्रजापती हा जगतातील समस्त जीवांचा स्वामी आणि प्रेरक आहे. अर्थात, श्री देवी या देवांच्या माध्यमातून जगताला कार्यरत ठेवते.
अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते।
अहं राष्ट्री सङ्गमनी वसूनामहं चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम्।
अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे।
य एवं वेद स दैवींसम्पदमाप्नोति ॥7॥
देवांना हवी पोहोचविणार्या व सोमरस काढणार्या यजमानांसाठी, हवियुक्त धन मीच धारण करते. मी संपूर्ण विश्वाची ईश्वरी, उपासकांना धन देणारी, ज्ञानवती व यज्ञीय लोकांत (यजन करण्यास योग्य अशा देवतांमध्ये) मी मुख्य आहे. संपूर्ण जगत् ज्यांत वसलेले आहे, अशा पितारूपी आकाशाचे अधिष्ठान असलेला परमेश्वर, माझ्यातूनच उत्पन्न झाला आहे. बुद्धीतील ज्या वृत्तीमुळे आत्मरूप धारण केले जाते, ते स्थान म्हणजे मीच आहे. देवी इथे स्वतःच्या सर्वव्यापकतेची जाणीव करून देत आहे. विश्वातील प्रत्येक प्रमुख घटक तिच्याच चरणी लीन असून, तीच त्यांची अधिष्ठात्री आहे.
ते देवा अब्रुवन् - नमो देव्यै महादेव्यै शिवायैः सततं नमः।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥8॥
या श्लोकात देवांनी देवीच्या चरणी अत्यंत श्रद्धेने नमन केले आणि म्हणाले, हे देवी, महादेवी, कल्याणमूर्ती शिवे तुला आम्ही सतत नमस्कार करतो. प्रकृतिस्वरूप आणि शुभमय असलेल्या तुला आम्ही शरण आहोत. आम्ही तुझे परमभक्त आहोत. जगातील सर्व देव देवीच्या सामर्थ्याला वंदन करतात, कारण तीच या सृष्टीची मूळ शक्ती आहे, तीच प्रकृती, तीच कल्याण, तीच महादेवी आहे. भक्त तिला नित्य स्मरतात आणि पूर्ण समर्पणाने, तिच्या चरणी नतमस्तक होतात.
तामग्निवर्णां तपसा ज्वलन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टाम्।
दुर्गां देवीं शरणमहं प्रपद्यामहेऽसुरान्नाशयित्रै ते नमः ॥9॥
अग्निप्रमाणे वर्ण असलेली, झगमगणारी, दिप्तीमान, कर्मफळ हेतुसाठी उपासिली जाणारी दुर्गादेवी, तुला आम्ही शरण आहोत. आमच्यासाठी आसुरांचा नाश करणारी दुर्गादेवी, तुला आम्ही अनन्यभावे शरण आलो आहोत. दुर्गा ही दिव्य तेजाने युक्त, तपस्विनी, न्याय देणारी, दुष्ट शक्तींना नष्ट करणारी आणि भक्तांना संकटांतून तारणारी आदिशक्ती आहे. तिच्या चरणी शरण जाणे, म्हणजेच मोक्षाचे द्वार आहे.
देवीं वाचमजनयन्त देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति।
सा नो मन्द्रेषमूर्जं दुहाना धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु ॥10॥
प्राणरूपी देवांनी ज्या प्रकाशमान वैखरी वाणीची उत्पत्ती केली, ती कामधेनुतुल्य आनंद देणारी, अन्न व बळ प्रदान करणारी वाग्रूपिणी भगवतीदेवी, उत्तम स्तुतीने संतुष्ट होऊन आमच्या निकट यावी. वाणी ही विश्वव्यापी शक्ती आहे, तिचे मूळ दैवी आहे. ती सर्वांमध्ये कार्य करते. तीच जर मधुर, सात्विक आणि ऊर्जादायक असेल, तर आपले जीवनही कल्याणप्रद होते. म्हणून वाणीचा उपयोग योग्यरित्या देवीच्या कृपेने व्हावा, हीच प्रार्थना. ज्याप्रमाणे, कामधेनु या गायीकडे मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, त्याचप्रामाणे या वाणीरूपी देवीची आमच्यावर सातत्याने कृपा असावी, जेणेकरून आम्हाला वाचासिद्धी प्राप्त होऊन आमच्या सर्व व्यक्त केलेल्या इच्छा पूर्ण होतील.
कालरात्रीं ब्रह्मस्तुतां वैष्णवीं स्कन्दमातरम्।
सरस्वतीमदितिं दक्षदुहितरं नमामः पावनां शिवाम् ॥11॥
कालरात्रि रूपी देवीला, ब्रह्मदेवाच्या स्तुत्य देवीला, विष्णूच्या शक्तीला, स्कंदाची माता पार्वतीला, विद्यादायिनी सरस्वतीला, अदिती रूपी देवमातेला आणि दक्षप्रजापतीची कन्या असलेल्या सतीला अशा सर्व पवित्र आणि कल्याणकारी देवीला आम्ही नमस्कार करतो. ‘दुर्गा सप्तशती’मध्ये देवीच्या ज्या महाकाली, महालक्ष्मी आणि महसरस्वती या तीन रूपांचा उल्लेख केला आहे आणि या देवींच्या साहाय्यास आलेल्या ईश्वरांच्या शक्तितत्त्वांच्या स्वरूपांचा या नामात उल्लेख केला असून, देवीच्या या सर्वच अवतारांच्या चरणी सर्व देव नमस्कार करत आहेत, असा या स्तोत्राचा भावार्थ आहे
महालक्ष्म्यै च विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि।
तन्नो देवी प्रचोदयात् ॥12॥
आम्ही श्री महालक्ष्मीला जाणतो आणि त्या सर्वशक्तीरूपिणीचे ध्यान करतो. हे देवी! आम्हाला ज्ञानप्राप्तीसाठी आणि ध्यानमार्गाने तुझ्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठी, उद्युक्त कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना आम्ही करत आहोत.
अदितिह्यजनिष्ट दक्ष या दुहिता तव।
तां देवा अन्वजायन्त भद्रा अमृतबन्धवः ॥13॥
या श्लोकात देवीच्या वेदोक्त आदित्य सुक्ताचे सार आहे. अदिती ही आदिशक्ती आहे, जिला देवीच्या रूपात ओळखले जाते. ती सृष्टीची जननी आहे. तिच्यापासूनच सर्व देवतांचा जन्म झाला. समस्त देव हे अमर, कल्याणकारी आणि सृष्टिसंवर्धक शक्ती रूपाने कार्यरत असून, ते सृष्टीचे संचालन करत आहेत.(क्रमशः)
सुजीत भोगले