कालचा गोंधळ बरा होता!

    10-Apr-2025   
Total Views | 22

Aditya Thackeray
 
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता,’ अशी सध्या उबाठा गटाची स्थिती. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर बुडत्या पक्षाला आधार देण्याची संधी उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरेंकडे (युवा नेतृत्व म्हणून) होती. पण, त्यांना ना कार्यकर्ते सांभाळता आले, ना पक्ष. तरीदेखील 2029 साली आदित्य मुख्यमंत्री होतील, असे भाकित माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवले. बहुधा सनसनाटी विधान करून माध्यमांचे ध्यान स्वतःकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. पण, तो फुसका बार निघाला. त्यांच्या विधानाची ना माध्यमांत चर्चा झाली, ना पक्षात. कारण, युवासेनाप्रमुख, आमदार, मंत्री अशी एकामागोमाग एक महत्त्वाची पदे उपभोगल्यानंतरही ज्यांना पक्षावर मांड ठोकता आली नाही, ते आदित्य ठाकरे इतका मोठा पराक्रम करू शकतील, याची खात्री कुणालाच नाही.
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता,’ अशी सध्या उबाठा गटाची स्थिती. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर बुडत्या पक्षाला आधार देण्याची संधी उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरेंकडे (युवा नेतृत्व म्हणून) होती. पण, त्यांना ना कार्यकर्ते सांभाळता आले, ना पक्ष. तरीदेखील 2029 साली आदित्य मुख्यमंत्री होतील, असे भाकित माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवले. बहुधा सनसनाटी विधान करून माध्यमांचे ध्यान स्वतःकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. पण, तो फुसका बार निघाला. त्यांच्या विधानाची ना माध्यमांत चर्चा झाली, ना पक्षात. कारण, युवासेनाप्रमुख, आमदार, मंत्री अशी एकामागोमाग एक महत्त्वाची पदे उपभोगल्यानंतरही ज्यांना पक्षावर मांड ठोकता आली नाही, ते आदित्य ठाकरे इतका मोठा पराक्रम करू शकतील, याची खात्री कुणालाच नाही. मुळात अखंड शिवसेनेत उद्धव ठाकरेंनंतर आदित्य यांच्या शब्दाला मान होता. बाळासाहेबांचा नातू म्हणून त्यांना राज्यभरातील शिवसैनिकांचे प्रेमही मिळायचे. अशावेळी शिलेदारांनी साथ सोडल्यानंतर, युवराज म्हणून पक्षाला आधार देण्याची संधी त्यांच्याकडे होती. शिवसेनेतील फुटीनंतर प्रत्येक विधानसभेत जाऊन शिवसैनिकांना चेतवणे, त्यांना धीर देण्याचे काम आदित्य यांनी करणे अपेक्षित होते. पण, दोन-चार मोठे मतदारसंघ फिरून त्यांची ‘वात विझलेली तोफ’ थंडावली. हा झाला पक्षांतर्गत राजकारणाचा विषय. पण, महाविकास आघाडीच्या काळात कॅबिनेट मंत्री म्हणून यांनी केलेले एकतरी काम समाजहिताचे असावे, पण नाही! आधीच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यापलीकडे यांच्या पेनातील शाईचा वापर कधी लोककल्याणासाठी झाला नाही. मुंबईतील वाहतुककोंडी सोडवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या ‘मेट्रो-3’ प्रकल्पात यांनी खो घातला. तो कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय त्यांच्या मुख्यमंत्री वडिलांनी घेतला. पण, कांजुरला कारशेड नेणे संयुक्तिक नसल्याने, पुन्हा हा प्रकल्प आरे वसाहतीत सुरू करण्यात आला. या विलंबामुळे तब्बल दहा हजार कोटींचा फटका बसला. केवळ पुत्रहट्टापोटी सर्वसामान्यांचा करातून जमा झालेल्या पैशांचा चुराडा करण्यात आला. अशा कर्तृत्वशून्य माणसाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याची स्वप्ने चंद्रकांत खैरे पाहत असतील, तर महाराष्ट्रातील जनता नाठाळाच्या माथी काठी हाणल्याशिवाय राहणार नाहीत!
राजकीय कावीळ
कावीळ झालेल्याला सर्व पिवळे दिसते, असे म्हणतात. उबाठा गटाच्या नेत्यांमध्येही हल्ली तशीच लक्षणे दिसू लागली आहेत. केंद्र वा राज्य सरकारने जनहिताच्या दृष्टीने कोणतीही चांगली गोष्ट करायची म्हटली, की यांचे अदानी आणि अंबानीपुराण सुरू होते. ‘वक्फ’चेच घ्या ना! ‘वक्फ बोर्डा’च्या जमिनी ‘लाडक्या’ उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी म्हणे केंद्र सरकारने या कायद्यात सुधारणा केली. उद्धव ठाकरेंना हा साक्षात्कार कुठून झाला, हे देव जाणो. पण, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना वेळीच आरसा दाखवला. ‘वक्फ बोर्डा’वर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे, या कायद्यात सुधारणा आवश्यक होती, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच, ‘वक्फ दुरुस्ती विधेयका’ला संपूर्णतः समर्थन दिले.
 
एकेकाळी वंचित बहुजन आघाडी आणि ‘एमआयएम’ने महाराष्ट्रात आघाडी करून निवडणुका लढवल्या होत्या. असे असताना, वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी ‘वक्फ’च्या समर्थनार्थ भूमिका घेणे कौतुकास्पदच. निष्णात कायदेपंडित असल्यामुळे त्यांना या कायद्यातील दुरुस्तीचे महत्त्व कळले. त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करताना, लातूर आणि तामिळनाडूमधील उदाहरणे दिली. लातूरमधील दोन गावे ‘वक्फ’ने गिळली, तर इस्लामच्या जन्माआधीच्या त्रिसलापल्लीतील मंदिरांवर दावा सांगण्याची हिंमत त्यांनी केली. दीर्घकाळापासून हिंदुत्ववादी पक्षांविरोधात संघर्ष करणार्‍या प्रकाश आंबेडकरांना जे दिसले, ते उद्धव ठाकरेंना दिसू नये, याचेच आश्चर्य! मुख्यमंत्रिपदावर असताना हिंदू मंदिरांना टाळे लावणार्‍या, पण लांगूलचालनापोटी मशिदींना मोकळीक देणार्‍यांकडून अपेक्षा तरी काय करणार? पुरोगाम्यांचा ओढा पवार आणि काँग्रेसकडे, हिंदुत्ववादी पाच वर्षांपासून नाराज, अशावेळी ‘हिरव्या’ मतांचाच आधार उरल्यामुळे बहुदा उद्धव ठाकरेंनी ‘वक्फ विधेयका’विरोधात मतदान करण्याचे फर्मान काढले. पण, त्यांच्या या एका निर्णयामुळे पक्षाचे किती नुकसान झाले, याचे मोजमाप ते करूच शकणार नाहीत. पिता-पुत्र आणि बगलबच्चे वगळता इतर सगळे जेव्हा दुरावतील, तेव्हाच उद्धव ठाकरेंचे डोळे उघडतील. मग, बाळासाहेब आंबेडकरांनी आरसा दाखवोत की, खुद्द असदुद्दीन ओवेसींनी, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!
 

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121