बीडच्या तुरुंगात गँगवॅार पेटलं! परळीतील दोन गटात हाणामारी, नेमकं काय घडलं?
01-Apr-2025
Total Views | 28
बीड : (Gangwar in Beed Jail) गेल्या काही महिन्यांपासून बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेचा विषय ठरलेला वाल्मिक कराड. कुठल्यान कुठल्या कारणामुळे हे नाव सतत समोर येत राहिले. सध्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र चर्चा त्याच्या दहशतीची नसून त्याला झालेल्या मारहाणीची आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर आलीय. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन कारागृहामध्ये कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा दावा केला. मात्र नक्की कोणी कोणाला मारहाण केली, यावरुनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महादेव गिते आणि अक्षय आठवले यांच्याकडून मारहाण झाल्याचे बोलले जात होते. दरम्यान त्याचवेळी शशिकांत गिते या नावानं असलेल्या फेसबूक अकांउटवरुन एक पोस्ट करण्यात आली जी व्हायरल झाली होती. ज्यामध्ये लिहिलं होतं, ‘अंदर मारना या मरना सबकुछ माफ है’, हा शशिकांत गित्ते म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून बबन गित्ते आहे. तुरुंगातील मारहाणीत ज्या महादेव गित्तेचं नाव समोर येत होतं तो बबन गित्तेचाच खास आहे. अशात बबन गित्ते आणि वाल्मिक कराडमधील शत्रुत्व सर्वज्ञात आहे. त्यामुळे बीडमधील हे गँगवॅार आता तुरुंगामध्येही सुरू झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण बीडच्या जेलमध्ये नेमकं काय घडलं ? याविषयी सविस्तर माहिती घेऊया
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील फोफावलेल्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. याला बीड जिल्ह्यातील तुरुंगही अपवाद ठरलेला नाही. याचे कारण सोमवारी ३१ मार्चला सकाळी बीड जिल्हा कारागृहात बबन गिते समर्थक आणि परळीतील सोनावणे-फड टोळी यांच्यात मोठा वाद झाला. यावेळी संतोष देशमुख हत्याप्रकरणी मकोका लागलेले आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांनाही मारहाण करण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमधून समोर येऊ लागल्या. बीड जिल्हा कारागृह प्रशासनाने यााबाबत प्रेसनोट जारी करुन हा दावा फेटाळून लावला आहे. मात्र अशातच आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन कराड आणि घुलेला मारहाण झाल्याचा दावा केला आहे.
यासंदर्भात बोलताना आमदार धस म्हणाले, "वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाली आहे. मला या प्रकरणाची माहिती आहे. महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी त्यांना मारहाण केली. महादेव गितेला अटक होण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यानं वाल्मीक कराडने आपल्याला खोट्या प्रकरणात गोवल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातून ही घटना घडली असेल. या प्रकरणी त्यांच्यात केवळ झटापट झाली. फक्त मारहाण झाली. त्यांना कोणत्याही वस्तूने मारहाण करण्यात आली नाही. वाल्मीक कराड विरुद्ध बबन गिते या परळीतील टोळीयुद्धातून ही घटना घडली आहे. वाल्मीक कराड अगोदर म्हणायचे की, बबन गितेला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही. तर बबन गिते यांनी वाल्मीक कराडला संपवल्याशिवाय मी दाढी करणार नाही असा पण केला होता. बापू आंधळे हत्या प्रकरणात नावे चुकीच्या पद्धतीने गोवली गेल्यामुळे ही मारहाण झाली असावी. वाल्मीकला केवळ २ कानशिलात लगावण्यात आल्यात. त्यामुळे त्याला रुग्णालयात वगैरे दाखल करण्याची काहीही गरज नाही."
बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना वेगवेगळ्या बराकीत ठेवले जाते. पण सकाळी अर्ध्या तासाकरिता तुरुंगातील बंदी उठवली जाते. या काळात सर्व कैद्यांना तुरुंगात मोकळे सोडले जाते. याच वेळेत परळीतील दोन गट आमनेसामने आले. सध्या फरार असलेल्या बबन गिते यांचा समर्थक महादेव गिते आणि सोनावणे-फड गँगच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. बराचवेळ तुरुंगात हा वाद सुरु असल्याची माहिती आहे. यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांनाही मारहाण झाल्याची चर्चा आहे. मात्र कारागृह प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. बीड जिल्हा कारागृहातील पोलिसांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. महादेव गीते आणि सोनावणे-फड टोळीत फोन लावण्यावरुन वादावादी झाली. याचे पर्यवसन हाणामारीत झाले. यामध्ये वाल्मिक कराड याचा काहीही संबंध नाही. कोणीही जखमी नाही कोणालाही इजा नाही, अशी माहिती कारागृह पोलिस महासंचालक जालिंदर सुपेकर यांनी दिली.
दरम्यान बीड कारागृह प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये झालेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. दि.३१ मार्च रोजी कैदी सुदिप रावसाहेब सोनवणे आणि राजेश अशोक वाघमोडे हे दोघे आपआपल्या सर्कल समोर सकाळी ०९.१५ ते ०९.३० च्या दरम्यान त्यांना लागु असलेल्या सुविधेनुसार नातेवाईकांना कॅाल करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये शाब्दीक चकमक होऊन त्यांच्यामध्ये झटापट झाली. कारागृह कर्मचारी झटापट सोडवत असताना इतर बंदी कारागृहाच्या सर्कल मध्ये धावत आले आणि गोंधळ करु लागले, शिवीगाळ करु लागले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून बंद्यांना वेगवेगळे केले व बंद्यांना आपआपल्या यार्डमधील बरॅकमध्ये बंदीस्त करण्यात आले. सदर घटनेमधील बंद्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरीता शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे तक्रार दाखल करीत आहोत. व सध्यस्थितीत कारागृहात शांतता आहे.प्रसारमाध्यमांवर आरोपी वाल्मिक कराड व त्याचे सहकारी आरोपी सुदर्शन घले यांना कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली अशी माहिती प्रसारमाध्यमावर सुरु आहे परंतू प्रत्यक्षात वाल्मिक कराड व सुदर्शन घुले या दोघांना कोणत्याही प्रकारची मारहाण कारागृहात झालेली नाही.
दरम्यान, या घटनेनंतर वाद आणखी वाढू नये यासाठी कारागृह प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. महादेव गिते टोळीनंतर आता अक्षय आठवले टोळीला हलवण्यात आले आहे. यातील आरोपी अक्षय आठवले, मनिष क्षीरसागर आणि ओंकार सवाई यांना हलवण्यात आले आहे. महादेव गितेचा वाद असताना आम्हाला नाहक हलवले जात आहे, असा ओंकार सवाई याने आरोप केला आहे. कालच्या वादानंतर महादेव गितेला हर्सुल कारागृहात तर आठवले टोळीची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी बीड जिल्हा कारागृहात तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगितले जात आहे. हा बीडचा तुरुंग आता गँगवॅारचा हॉटस्पॉट बनण्याची चिन्हं दिसत आहेत.