‘सायकल मॅन’ राजेंद्र चोथे

    01-Apr-2025   
Total Views | 7

article on cycle man rajendra chothe
 
 
पर्यावरणवादी ‘सायकल मॅन’ म्हणून पिंपरी-चिंचवडच्या राजेंद्र चोथे यांची ओळख. अशा या कर्मयोगाचा सिद्धांत प्रत्यक्षात जगणार्‍या राजेंद्र चोथे यांच्याविषयी...
 
८०चे दशक होते. राजेंद्र चोथे हे शिक्षणासाठी पुण्यात आले. तिथे राहणे आणि अभ्यास करणे, हे सगळे संघर्षात्मकच होते. राजेंद्र यांना वाटले की, आपल्या देवांग कोष्टी समाजाचे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असते तर? हा विचार विद्यार्थी काळात मनात आला आणि पुढे देवांग कोष्टी समाज, पुण्याचे विश्वस्त असताना त्यांनी समाजाच्या, सहकार्‍यांच्या मदतीने पिंपरी निलख येथे, देवांग कोष्टी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती केली. राजेंद्र यांच्यामते, आयुष्यात ‘कर्मयोग सिद्धांत’ महत्त्वाचा. ध्येय निश्चित करून कर्म केले की, ध्येयाची फलश्रुती होतेच होते. हा विचारच त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यामुळेच की काय, टाटा मोटर्समध्ये वयाच्या १६व्या वर्षी प्रशिक्षणार्थी म्हणून कामाला रुजू झालेले राजेंद्र नोकरीतून निवृत्त होताना, टाटा मोटर्सचे वरिष्ठ मॅनेजर या पदावर होते. एक उत्कृष्ठ फॅ शन डिझायनर, एक उत्तम गायक, एक निस्वार्थी पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ता, अशा अनेक आयामात राजेंद्र यांनी स्वतःचा ठसा उमटवला. या सगळ्या कार्यक्षेत्रात रममाण होतानाच, राजेंद्र यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘सायकल मॅन’ म्हणून त्यांनी मिळवलेली ओळख!
 
राजेंद्र हे संघ स्वयंसेवक. अखंड भारताची सांस्कृतिक एकता अनुभवावी, म्हणून सायकलीवरूनच ते नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार या देशांमध्ये गेले. सध्या दक्षिण कोरियाला सायकलीवरून जाण्याचे त्यांचे नियोजन आहे. गेल्याच महिन्यात ते कुंभमेळ्यालाही सायकल वरूनच गेले. १४४ वर्षांनी आलेला महाकुंभ. त्यामुळे तिथे त्यांनी स्वतः तयार केलेल्या अत्यंत आकर्षक अशा, १४४ कापडी पिशव्या वितरीत केल्या. प्लास्टिक हे पर्यावरणाला अत्यंत हानीकारक आहे. कागदी किंवा कापडी पिशव्या वापरल्या, तर पर्यावरण संवर्धनामध्ये मोलाची भर पडेल या विचारांनी, ते स्वतः सुंदर कापडी पिशव्या शिवतात. शाळा, महाविद्यालय आणि संस्था मंडळ यांना निशुल्क वितरीत करतात. त्यांनी शिवलेल्या पर्स, पिशव्या इतक्या आकर्षक असतात की, काही लोक स्वतःहून त्या विकतही घेतात. पुढच्या काळात एक लाख कापडी पिशवी, पर्स तयार करण्याचे त्यांचे नियोजन आहे. राजेंद्र सायकलवरून नुसता प्रवासच करत नाहीत; प्रवासादरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी त्या गावच्या पारावर किंवा जिथे गावकरी एकत्र बसलेले असतात, तिथे जाऊन अभंग गायनही करतात. लोक आपसूकच त्यांच्याकडे आले की, मग ते पर्यावरण संवर्धनाबाबत माहितीही देतात. तर राजेंद्र यांच्या जीवनाचा मागोवा घेऊया.
 
कोष्टी समाजाचे मारुती आणि सीताबाई चोथे हे दाम्पत्य मूळचे सांगली येथील विटा गावचे. त्यांच्या पाच अपत्यांपैकी एक राजेंद्र. मारुती हे एका मिलमध्ये काम करत होते. वेतन इतके अपुरे मिळे की, त्यातून कुटुंबाला दोन वेळची भाकरीही मिळणे कठीण व्हायचे. आठवड्यातून एक-दोनदा तरी, केवळ पाणी पिऊनच पोट भरावे लागे. अशा परिस्थितीमध्येही चोथे दाम्पत्य, आपल्या मुलांवर संस्कार करण्यास कुठेही कमी पडले नाही. राजेंद्र तर मूळचेच हुशार, शाळेत कायमच पहिला क्रमांक ठरलेला. एकेवर्षी दुसरा क्रमांक आला, म्हणून ते रडत-रडत आईकडे आले होते. दुसरा क्रमांक आला म्हणून रडतो, हे ऐकून आईने काय करावे? तर त्यांनी राजेंद्र यांना चांगलेच सुनावले. “पहिला नंबर यावा वाटतो, तर अभ्यास कर. रडून काही होत नाही, कष्ट कर.” त्यामुळे कष्टानेच यश मिळते, हे वाक्य तेव्हापासून राजेंद्र यांच्या हृदयावर कोरले गेले.
 
याचकाळात वडील कामानिमित्त इचलकरंजीला गेले, तर सीताबाई मुलांना घेऊन सातार्‍यातील पालीला राहू लागल्या. सातार्‍यातही पैशाची चणचण होतीच. दुसरीकडे राजेंद्र शाळेत हुशार असल्याने, शाळेने जणू त्यांना दत्तकच घेतले होते. घरच्या आर्थिक स्थितीमुळे राजेंद्र आईसोबत शेत मजुरी करायलाही जात. कष्टाचे अनुभव माणसाला संघर्ष करायला शिकवतात हेच खरे. त्यामुळेच आईबाबांचे कष्ट आणि घरची परिस्थिती पाहून राजेंद्र यांनी ठरवले की, ही परिस्थिती बदलण्यासाठी खूप शिकायचे. तसे लहानपणापासूनच त्यांना इंजिनिअर व्हायचे होते. पण, आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर ते पुण्यात, टाटा मोटर्समध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करू लागले. तिथे शिकता शिकताच त्यांनी, ‘डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केले. पुढे इंजिनिअरिंग क्षेत्रातले ‘एएमआय’ हे शिक्षण पूर्ण तर केलेच, त्याशिवाय ‘एमबीए फायनान्स’चे शिक्षणही पूर्ण केले. या सगळ्यामुळे राजेंद्र यांना टाटा मोटर्समध्येही बढती मिळाली. हे सगळे करत असताना, राजेंद्र यांच्या मनात सायकल प्रेम अबाधित होते. त्यामुळेच निवृत्तीनंतर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या संकल्पनेच्या साक्षात्कारासाठी, सायकलीवरून जग फिरायचे असे त्यांनी ठरवले. निवृत्तीनंतर त्यांनी स्वप्न सत्यात उतरण्यासाठी कामही सुरू केले.
 
या सगळ्या काळात त्यांची पत्नी उज्ज्वला यांनी नावाप्रमाणेच राजेंद्र यांचे आयुष्य सहकार्याने उज्ज्वल केले. राजेंद्र म्हणतात, “यापुढेही पर्यावरणासाठी सायकल प्रवास, पर्यावरणासाठी ‘नो प्लास्टिक’ मोहिमेसाठी मी काम करणार आहे.” या पर्यावरणप्रेमी ‘सायकल मॅन’चे कार्य प्रेरणादायीच आहे. राजेंद्र यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121