आयुर्वेद ही एक प्राचीन भारतीय चिकित्सा प्रणाली आहे, जी शरीर, मन आणि आत्मा यांच्या समतोलावर लक्ष केंद्रित करते. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा संबंध पृथ्वीवरील पंचमहाभूतांशी असतो, ज्यात पाणी (आप) हे एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानले जाते. आयुर्वेदानुसार पाणी केवळ एक शारीरिक आवश्यक पदार्थ नसून, त्याच्या विविध गुणधर्मांचा शरीरावर आणि मनावर थेट परिणाम होतो. सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरु असल्यामुळे हायड्रेट राहण्यासाठी पाणी अधिक प्रमाणातही प्यायले जाते. त्यानिमित्ताने आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाण्याचे गुणधर्म उलगडणारा हा लेख...
पाणी हा आपल्या जीवनातील एक आमूलाग्र घटक. याच्याशिवाय जीवनाचा विचारही करवत नाही. जल हे जीवन आहे, असे नेहमीच म्हणतो; पण त्याचा वापर कसा करावा, हे मात्र माहीत नसते. म्हणजे पाणी प्यावे हे माहीत आहे, पण कसे प्यावे हे आपल्या ध्यानी-मनीसुद्धा नसते. बरेचदा पाणी पिण्याचे काही नियम आहेत असे सांगितले, तर लोकांना आश्चर्य वाटते. ज्याप्रमाणे जीवनाला काही नियम आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे पाणी पितानाही काही नियम आवश्यक आहेत. आपल्या जीवनशैलीचा इतका सूक्ष्म विचार आयुर्वेदाशिवाय कोणी केला असेल, असे वाटत नाही.
आयुर्वेदानुसार पाणी हे ‘आप’ या महाभूताचे प्रतीक आहे, ज्याचा शरीरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी प्रभाव असतो. पाणी हे शरीरातील प्रत्येक पेशीला जीवन देणारे, शुद्ध करणारे आणि शारीरिक आणि मानसिक कार्ये सुरळीतपणे चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
पाण्याचे काही प्रमुख गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत :
शीतलता : पाणी शरीराला थंड करते आणि उष्णतेचा समतोल राखते.
तरलता : पाणी शरीरात प्रसन्नता आणि लवचिकता आणते, शरीराच्या कार्यामध्ये हलकेपणा आणते.
शुद्धता : पाणी शुद्ध करणारे आहे, त्यामुळे शरीराच्या अवशिष्ट पदार्थांचा निचरा होण्यास मदत होते.
आपल्या शरीरात तीन प्रमुख दोष असतात. वात, पित्त आणि कफ. पाणी प्रत्येक दोषावर थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकते.
वात दोष : वात दोष शरीराच्या सूक्ष्म आणि हलक्या भागांचे प्रतिनिधित्व करतो. पाणी जर त्यात जास्त प्रमाणात घेतले, तर वात दोष शांत होतो आणि शरीरातील कोरडेपण कमी होते.
पित्त दोष : पित्त दोष म्हणजे उष्णता आणि ऊर्जा. पाणी पित्ताच्या वाढलेल्या प्रमाणासह संतुलन राखण्यास मदत करते, उष्णता आणि शरीरातील दाह कमी होणे सुनिश्चित करते.
कफ दोष : कफ दोष म्हणजे स्थिरता आणि जाडपणा. पाणी शरीरातील कफ दोषाचे संतुलन राखण्यास मदत करते, शरीराला हलके आणि ताजे ठेवते.
याशिवाय, आयुर्वेदामध्ये प्रत्येक रोगाच्या उपचारात पाण्याचा विविध प्रकारे वापर केला जातो. साधारणपणे उकळलेले आणि गोड (क्षार नसलेले) पाणी शरीरासाठी उत्तम मानले जाते. उकळलेले पाणी आपल्याला शरीरातील अवशिष्ट पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजन देते. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक पाण्याच्या महत्त्वाकडे कमी लक्ष देतात. या काळात, जास्त जंक फूड, प्रदूषण आणि तणावामुळे शरीराच्या शुद्धतेची आवश्यकता अधिक आहे. पाणीच त्या शुद्धतेचा मुख्य घटक आहे. आयुर्वेदानुसार, पाणी वेळोवेळी, योग्य मात्रेत आणि शुद्ध स्वरूपात पिणे, हे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पाणी थंड प्यावे की गरम, हा नेहमीचा चर्चेचा मुद्दा असतो. इथे थंड म्हणजे सामान्य तापमानाचे पाणी किंवा माठातले पाणी अपेक्षित आहे. फ्रीजमधील थंड पाणी तर विचारातच घेऊ नये. ते कायमच टाळावे.
थंड पाणी कोणी प्यावे? :
चक्कर येणे, गरगरणे, अत्यधिक थकवा, पित्ताचे विकार, उलटी होणे, रक्ताची उलटी अथवा नाकातून रक्त येणे अशा लक्षणांत स्वभावतः थंड पाणी (नदी किंवा विहिरीतून काढलेले) किंवा माठातले गार पाणी प्यावे.
थंड पाणी कोणी पिऊ नये? :
छातीच्या बाजूस दुखणे, सर्दी, वातरोग, घसा पकडणे अथवा सुजणे, पोटफुगी, पोट जड वाटणे, ताप असताना, अधिक तेलकट तुपकट पदार्थ खाल्ल्यावर सहसा थंड पाणी पिऊ नये.
गरम पाण्याचे औषधी गुण : गरम पाणी हे भूक वाढवणारे, अन्नाचे पाचन करणारे असते. मूत्र प्रवृत्ती व त्यासंबंधी रोग कमी करणारे, घशाच्या रोगांमध्ये उपयोगी, तसेच सतत उचकी, पोटफुगी, वातरोग, कफरोग, ताप, खोकला, दमा, जुनाट सर्दी, अपचन, छातीच्या फासळ्या दुखणे यांमध्ये उत्तम आहे.
ज्यांना मलबद्धता (कॉन्स्टिपेशन) आहे, त्यांनी नेहमी गरम पाणी प्यावे.
वजन कमी करण्यासाठी गरम पाणी प्यावे. पाणी उकळून ते पाव किंवा अर्धा भाग आटवणे याला आयुर्वेदात ‘उष्णोदक’ म्हणतात. ते स्थूलता कमी करण्यासाठी मदत करते.
अजीर्ण झाल्यास (खाल्लेले पचत नसल्यास) कोमट पाणी प्यावे.
उष्ण जल हे सदैव पथ्यकर आहे (काही आजारांमध्ये वगळून)
तापवून गार केलेल्या पाण्याचे उपयोग (फ्रीजमधील नाही) : सतत मद्यपान केल्याने उत्पन्न होणारे रोग, पित्ताचे रोग, दाह, अतिसार, नाकातून, मल-मूत्रातून, मुखातून रक्त येणे, चक्कर येणे, सतत तहान लागणे, उलट्या होणे, गरगरणे इ. व्याधींमध्ये याचा उपयोग होतो.
पाण्यासंबंधी सामान्य नियम :
- अवेळी पडलेल्या व पहिल्या पावसाचे पाणी कधीही सेवन करू नये.
- वर्षा ऋतूमध्ये नदी, तलाव इत्यादींचे जल पिणे वर्ज्य आहे. कारण, अनेक दुषित पदार्थ पाण्यात जमिनीवरून मिसळतात. तसेच पाणी गढूळ झालेले असते.
- शरद ऋतूत म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून नदी आदींचे पाणी पिण्यास योग्य असते.
- पाण्याचा अप्रिय गंध दूर करण्यासाठी तसेच उन्हाळ्यात त्रास कमी करण्यासाठी पाण्यात मोगर्याची फुले, वाळा ही द्रव्ये टाकतात, जेणेकरून पाणी शरीरातील दाह कमी करण्यासाठी मदत करते.
भोजन आणि पाणी :
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे
वारि बलप्रदम्।
भोजने चामृतं वारि
भोजनान्ते विषप्रदम्॥
अजीर्ण म्हणजे अन्न नीट पचले नसेल, तर (गरम) पाणी हे औषधाप्रमाणे काम करते. म्हणजे अन्नसेवन त्यावेळी न करता, तहान लागली की अल्प प्रमाणात गरम पाणी प्यावे. अन्न पचले असताना पाणी प्याले की, ते तृप्ती व बल प्रदान करते. भोजनसमयी आपण अल्प प्रमाणात पाणी घेतले, तर ते अमृताप्रमाणे कार्य करते. जेवताना कोमट पाण्याचा घोट जिभेवरील जुनी चव काढतो व जिभेस नवीन रस ज्ञानासाठी तयार करतो. त्यामुळे घास नवीन असल्याचा आभास होतो व पाचनही सुलभ होते. भोजनाच्या अंती एकदम पाणी प्यायल्याने अन्न नीट पचत नाही. परिणामी, आम तयार होतो व तो विषप्रदच असतो. अशा वेळी जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.आयुर्वेदात काही रोगांमध्ये पाणी थोडे कमी पिण्यास सांगितले आहे किंवा गरम पाणी प्यावे, असेही सांगितले आहे, जसे की भूक व चव नसणे, सतत सर्दी असणे, अधिक प्रमाणात लाळ गळणे, अंगाला सूज असणे, कृषता, दौर्बल्य, अपचन, उदररोग, कुष्ठ, ताप, डोळ्यांचे विकार, जखम झाली असल्यास, मधुमेह इ. आजारांत कोमट पाणीच प्यावे व कमी प्यावे.वाग्भट आचार्यांनी तर निरोगी माणसानेही ग्रीष्म व शरद ऋतू सोडून अधिक प्रमाणात पाणी पिऊ नये, असे सांगितले आहे. नाही तर, वरील रोग उद्भवू शकतात. यामुळेच सकाळी उठून उपाशी पोटी अर्धा एक लीटर पाणी पिणे आयुर्वेदाला मान्य नाही. तसेच बाहेरून आल्यावर हृदय गती स्थिर होईपर्यंत व शरीराचे तापमान सामान्य होईपर्यंत पाणी पिऊ नये. उभ्याने पाणी पिऊ नये. पाणी एकदम पिऊ नये. वरून घशात पाणी ओतू नये. शांतपणे एक एक घोट घेत पाणी प्यावे.
अत्यम्बुपानात न विपच्यते अन्न निराम्बुपानाच्च स एव दोषः।
तस्मात नरो बहनीविवर्धनाय मुहूर्मुर्वारी पिबेदभुरि॥
अतिशय पाणी पिण्याने अन्नाचे पचन नीट होत नाही. पाणी मुळीच न पिण्याने दोष निर्माण होतो. म्हणून थोडे थोडे पाणी वारंवार प्यावे (तहान लागली तरच).पाणी आहे म्हणून कसेही पिण्याची गोष्ट नाही. योग्य प्रकारे सेवन केले, तर ते जीवन आहे. अयोग्य प्रकारे घेतले, तर व्याधिकारक ही होऊ शकते, याचे भान ठेवावे.पाणी केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठीच नाही, तर मानसिक आणि भावनिक संतुलनासाठीदेखील महत्त्वपूर्ण आहे.आपल्याला आयुर्वेदाच्या या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून पाण्याचे महत्त्व समजून, आपले जीवन अधिक ताजेतवाने आणि समृद्ध बनवता येईल. पाणी हे जीवनाचा प्राण आहे आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्याचा योग्य आणि सुसंगत उपयोग आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी ठरू शकतो.
वैद्य शार्दुल चव्हाण
साहाय्यक प्राध्यापक, रसशास्त्र भैषज्यकल्पना विभाग, आयुर्वेद महाविद्यालय, शीव
वैद्य हेमंत पराडकर
सहयोगी प्राध्यापक, कायचिकित्सा विभाग, आयुर्वेद महाविद्यालय, शीव