‘एमएमआरडीए’च्या दोन प्रकल्पांना प्रतिष्ठित पुरस्कार

‘सूर्या पाणीपुरवठा योजना’ आणि ‘मेट्रो’ प्रकल्पांचा समावेश

    01-Apr-2025
Total Views | 9
 
Two MMRDA projects win prestigious awards
 
मुंबई: ( Two MMRDA projects win prestigious awards ) ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए)च्या दोन प्रकल्पांना नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘बिल्ड इंडिया इन्फ्रा अ‍ॅवॉर्ड्स २०२५ ’मध्ये दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १५९व्या प्राधिकरण बैठकीत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत प्रदान केले.
 
‘सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजने’ला जलसंपदा क्षेत्रातील ‘इम्पॅक्ट अ‍ॅवॉर्ड’, तर ‘मेट्रो मार्ग २ ए आणि ७’ या प्रकल्पांना शहर परिवहन क्षेत्रातील ‘इम्पॅक्ट अ‍ॅवॉर्ड‘ने सन्मानित करण्यात आले. मुंबईच्या शहराची वीण घट्ट करणार्‍या आणि लाखो नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या प्रकल्पांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या योगदानासाठी हे पुरस्कार देण्यात आले.
 
‘बिल्ड इंडिया फाऊंडेशन’च्यावतीने आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहकार्याने या पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नागरी उड्डाणमंत्री किंजारापू राममोहन नायडू उपस्थित होते. हे पुरस्कार भारताचे ‘जी-२०’ शेरपा आणि नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उद्योग क्षेत्रातील मान्यवर, धोरणनिर्माते आणि पायाभूत सुविधातज्ज्ञांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या सन्मानांमधून, सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारची असलेली कटिबद्धता दिसून येते. ‘सूर्य पाणीपुरवठा योजना’ आणि ‘मेट्रो मार्ग २ए व ७’ हे केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नाहीत, तर लाखो नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहेत. या प्रकल्पांमधून संतुलित प्रादेशिक विकास, पर्यावरण संवर्धन आणि भविष्यसज्ज नियोजनातील आमचा दृढनिर्धार दिसून येतो. ‘एमएमआरडी’एने संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे काम केले आहे.”
 
महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, “संपूर्ण ‘एमएमआरडीए’ टीमसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. या पुरस्कारांनी केवळ पायाभूत सुविधांचे नव्हे, तर या उपक्रमांमुळे घडलेल्या सकारात्मक बदलांचेही कौतुक झाले आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावणार्‍या आणि पर्यावरणीय वारसा जपणार्‍या स्मार्ट, सर्वसमावेशक आणि शाश्वत पायाभूत सुविधा उभारण्याची आमची वचनबद्धता कायम राहील.”
 
या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या दूरदृष्टीपूर्ण पायाभूत सुविधा विकासातील आघाडीच्या स्थानावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. सुरक्षित पेयजलासारख्या मूलभूत गरजांपासून ते जागतिक दर्जाची सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत, या यशप्राप्तीमुळे आमचा सर्वसमावेशक, शाश्वत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित प्रगतीवर असलेला भर अधोरेखित झाला आहे. या परिवर्तन घडवणार्‍या प्रकल्पांमध्ये योगदान देणार्‍या ‘एमएमआरडीए’ आणि सर्व संबंधित घटकांचे मी अभिनंदन करतो.
 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121