राज्यात धावणार ई-बाईक टॅक्सी! राज्य सरकारचा मोठा निर्णय; काय आहेत वैशिष्ट्ये?
01-Apr-2025
Total Views | 27
मुंबई : राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला मंजूरी दिली असून आता राज्यात ई-बाईक टॅक्सी धावणार आहेत. मंगळवार, १ एप्रिल रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिवहन विभागाच्या वतीने ई-बाईक टॅक्सीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
याबाबत माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १५ किमी अंतराची मर्यादा ठेवण्यात आली असून ५० बाईक एकत्रपणे घेणाऱ्या संस्थेला अशा वाहतुकीची परवानगी दिली जाईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही नियमावली बनवली आहे. दोन प्रवाशांमधील विभाजन तसेच पावसाळ्यात प्रवासी भिजू नये, त्यांना सुखसोयी उपलब्ध व्हाव्या यासाठी पूर्ण कव्हर असणाऱ्याच ई-बाईकला आम्ही परवानगी देणार आहोत. राज्य सरकारने ई बाईकला प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण ठरवले आहे. प्रदुषणमुक्त महाराष्ट्राचा आमचा संकल्प असून ही सुरुवात आहे. लवकरच ई बाईक टॅक्सी प्रवाश्यांचा सेवेत रूजू होईल."
प्रवासी भाड्यासंदर्भातली नियमावली सरकार ठरवणार असून ई-बाईक टॅक्सीमध्ये ३० ते ४० रुपयांत प्रवास कसा होईल यासाठी आम्ही नियोजन करत असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
'त्या' चालकांना अनुदान
"रिक्षा महामंडळाच्या सदस्य असलेल्या चालकांना १० हजारांचे अनुदान देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासंदर्भात चर्चा झाली असून रिक्षा महामंडळाचा बैठकीत हे ठरवले जाईल. रिक्षावाल्याच्या मुलाने किंवा मुलीने ई-बाईक टॅक्सी घेतली तर त्याला १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल आणि उर्वरीत रक्कम त्यांना कर्ज रुपाने काढावी लागेल," असेही त्यांनी सांगितले.
फक्त मुंबईत १० हजार रोजगारनिर्मिती
"ई-बाईक टॅक्सीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात १० हजारांहून जास्त रोजगार निर्माण होईल. तर महाराष्ट्रात किमान २० हजार रोजगार निर्माण होणार आहेत, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.