उबाठा गट काँग्रेसी विचारांचे गुलाम! खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल
01-Apr-2025
Total Views | 18
1
नवी दिल्ली : तुम्ही काँग्रेसच्या नादी लागून बाळासाहेबांचे विचार विसरलात. सोनिया गांधी आणि राहूल गांधींनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी आदेश दिले असतील आणि हे लोक काँग्रेसी विचारांचे गुलाम झाले आहेत, असा हल्लाबोल खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठा गटावर केला. त्यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.
खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, "अरविंद सावंत खुर्चीसाठी लाचारी करत आहेत. वक्फ कायदा रद्द करावा अशी बाळासाहेबांची भूमिका होती. पण या कायद्यात आम्ही ज्या सुधारणा करतोय त्यालाही आपण विरोध करत आहात. वारसा हा विचारांचा चालवावा लागतो. आपण विचार विसरलात आणि अज्ञानाचा वारसा चालवत आहात. मुठभर लोकांच्या मतांसाठी एवढी लाचारी स्विकारली का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, "हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व, समान नागरी कायदा, कलम ३७० रद्द करा या बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिका होत्या हे आपण विसरलात का? बाळासाहेबांची खरी शिवसेना कुणाच्या नेतृत्वात पुढे जाऊ शकते याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला दिले आहे. त्यामुळे तुम्हाला घरघर लागली आहे. उबाठा गटातील लोकप्रतिनिधी रोज तुम्हाला सोडून जात आहेत. आतातरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडू द्या. बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकारही तुम्हाला नाही. तुम्ही काँग्रेसच्या नादी लागून तुम्ही बाळासाहेबांचे विचार विसरलात. सोनिया गांधी आणि राहूल गांधींनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी आदेश दिले असतील आणि हे लोक काँग्रेसी विचारांचे गुलाम झाले आहेत," अशी टीका त्यांनी केली.
"श्रीकांत शिंदे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला आमचा पाठींबा असल्याचे जाहीर केले असून उबाठाची भूमिका समोर आणली आहे. वक्फच्या प्रॉपर्टीचा गरीबाला फायदा व्हायला हवा. परंतू, स्वत:ला मुस्लिमांचे नेते म्हणवून घेणारे काही मुठभर लोक ती प्रॉपर्टी लुबाडत आहेत. वक्फ सुधारणा विधेयकाचा उपयोग गरीब, अल्पसंख्यांक समाजातील जनतेला होणार आहे. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस आणि मुस्लीम संघटनांच्या नेत्यांनी वक्फची प्रॉपर्टी हडप केली आहे. त्यांच्या ताब्यातील ही सर्व संस्थाने आता खालसा होतील आणि गरीब मुस्लीम परिवाराला त्याचा फायदा होईल या भीतीने लोकांमध्ये गैरसमजूतीचे वातावरण तयार करण्यात येत आहे," असा आरोपही नरेश म्हस्के यांनी केला.
कामराच्या मागे देशविरोधी शक्ती असू शकतात
"दिशा सालियान प्रकरणाची दिशा फिरवण्यासाठी उबाठा गटाने पैसे देऊन कुणाल कामरासारख्या व्यक्तीला पुढे आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि देशातील उद्योगपतींच्या विरोधात बोलल्यामुळे कुणाल कामराची चौकशी व्हायला हवी. यामागे फार मोठा डाव असून कदाचित परदेशी फंडिंग होत असावे. कामराच्या मागे देशविरोधी शक्ती असू शकतात. शासन या सगळ्याची चौकशी करत आहे," असेही खासदार नरेश म्हस्के म्हणाले.