ठाणे: ( MLA sanjay kelkar on hukka parlour in thane ) “ठाणे शहरात ‘हुक्का पार्लर’ चालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल होत नाहीत,” अशी खंत आ. संजय केळकर यांनी अधिवेशनात व्यक्त केली. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शहरात शोध मोहीम सुरू करून ठोस कारवाई करण्याचे आदेश तत्काळ देण्यात येतील, असे स्पष्ट केले.
ठाणे शहरात तरुण पिढी ‘हुक्का पार्लर’ संस्कृतीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हुक्का पार्लरमुक्त ठाणे शहरासाठी लोकचळवळ उभारली, त्यास यशही मिळाले. पोलिसांनी कारवाया केल्याने ६० टक्के ‘हुक्का पार्लर’ बंद झाले. पण, अद्याप ४० टक्के पार्लर सुरू असल्याची माहिती आ. केळकर यांनी दिली. शहरात ‘हुक्का पार्लर’ सोबतच हर्बलच्या नावाखाली ‘हुक्का पार्लर’ सुरू आहेत.
“परमिट रूमच्या आड हा गोरखधंदा सुरू आहे. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहे. समाजमाध्यमांवर तर छुप्या आकर्षक जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत. या ठिकाणी गेल्यावर ‘हुक्का पार्लर’ असल्याचेच आढळून येते. या हुक्का चालकांना व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांकडून फक्त समज दिली जाते. या व्यवसायावर ठोस कारवाई करण्यात पोलीस कुचराई करीत आहेत,” असे आ. केळकर यांनी सांगितले.
ठाणेकर तरुणांना देशोधडीस लावणारे हे हुक्का पार्लर कायमस्वरूपी बंद न करण्यामागे कोणते राजकारण आहे, अर्थकारण आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करीत शहरात ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ करून हे व्यवसाय बंद का करीत नाहीत? असा सवाल आ. केळकर यांनी उपस्थित केला. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाणे शहरात शोध मोहीम सुरू करून ‘हुक्का पार्लर’ बंद करण्याचे आदेश देण्याचे आश्वासित केले.