मुंबई: ( MHADA budget presented ) ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण’ (म्हाडा)च्या वर्ष 2025-2026च्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण 19 हजार, 497 घरांच्या उभारणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 9,202.76 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
‘म्हाडा’च्या या धोरणामुळे राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.‘म्हाडा’चा सन 2024-25चा सुधारित व सन 2025-2026चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला.
प्राधिकरणाच्या सन 2025-2026च्या 15,956.92 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन 2024-25च्या 10,901.07 कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’ची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. नागपूर मंडळांतर्गत चंद्रपूर विशेष नियोजन प्राधिकरण योजनेसाठी 371.20 कोटी रुपये, ‘टेक्सटाईल पार्क एम्प्रेस मिल योजने’साठी 350 कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.