रिलायन्स जिओकडून ४ हजारांहून अधिक पेटंट्स दाखल

भारत सरकारकडून बौध्दीक संपदा पुरस्काराने सन्मानित

    01-Apr-2025
Total Views | 5
jio
 
मुंबई : टेक्नोलॉजी कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (जेपीएल) ला दोन प्रतिष्ठित बौद्धिक संपदा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार देऊन कंपनीला गौरवले आहे. तसेच वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO) ने तंत्रज्ञान आणि नवकल्पनांमध्ये उत्कृष्टतेसाठी जिओला पुरस्कार प्रदान केला आहे. या गौरवसोहळ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कंपनीला सन्मानित केले.
 
गेल्या तीन वर्षांत जिओने ४ हजारहून अधिक पेटंट दाखल केले आहेत. हे पेटंट मुख्यतः दूरसंचार, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांमध्ये आहेत. साध्या भाषेत सांगायचं झाल्यास, ही पेटंट ५जी, ६जी आणि एआय तंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित आहेत. याआधी या तंत्रज्ञानावर मुख्यतः परदेशी कंपन्यांचे वर्चस्व होते. मात्र, जिओच्या या मोठ्या प्रमाणातील पेटंट दाखल करण्याच्या यशामुळे आता भारतीय कंपनी जिओ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतेपद मिळवत आहे.
 
जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (जेपीएल) चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री आयुष भटनागर यांनी जेपीएलसाठी पुरस्कार स्वीकारला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, “हे पुरस्कार नवकल्पनांच्या प्रति आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत. आम्ही केवळ तंत्रज्ञानावर काम करत नाही आहोत, तर अशा क्षमता विकसित करत आहोत ज्या ५जी, ६जी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासात मोलाची भूमिका बजावतील आणि जागतिक स्पर्धेत भारताला अग्रस्थानी पोहोचवतील.”
 
भारत सरकार सध्या ६जी व्हिजन साकार करण्यावर भर देत आहे, आणि या स्पर्धेत जिओ आघाडीवर असल्याचे स्पष्ट दिसते. कंपनीने आपल्या निवेदनात सांगितले की, जेपीएलची बौद्धिक संपदा रणनीती भारत सरकारच्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. यामध्ये तांत्रिक नवकल्पना, डिजिटल परिवर्तन आणि स्वदेशी तंत्रज्ञान क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो, ज्यामुळे भारत एक आत्मनिर्भर आणि विकसित अर्थव्यवस्था म्हणून समोर येईल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121