पोलादपूर: ( Inauguration development works in Poladpur taluka by MLA Pravin Darekar ) पोलादपूर तालुक्यातील विविध विकास कामांचे उदघाटन आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये खडकवाडी ते चिखली ते खोतवाडी रस्ता, कामथे ते चांदले ते धनगरवाडी सिमेंट कॅाक्रिट रस्त्याच्या कामासह कुलस्वीग बेवर्ज प्रा. लि. सावित्री पॅकेज अँड ड्रिंकीग वॅाटर प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आ. दरेकर यांनी पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका दूर करण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास उपस्थितांसमोर व्यक्त केला.
याप्रसंगी मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी झेडपी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, माजी तालुकाध्यक्ष प्रसन्ना पालांडे, तालुकाध्यक्ष तुकाराम केसरकर, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, शिवसेना तालुकाध्यक्ष निलेश आहीरे, क्षत्रिय मराठा सोसायटीचे अध्यक्ष राजेश येरुणकर यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले कि, माझ्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण मानतो. दादा शिंदे यांच्या गावचा रस्ता झाला पाहिजे ही भावना व्यक्त झाल्यानंतर तो आपण मार्गी लावला. रस्त्याचा किंवा गावचा विकास करताना किती लोकं आहेत अशा प्रकारची डोकी न मोजता ज्या राजकारणात संवेदना लागतील त्या घेऊन काम करणारे आम्ही सारे कार्यकर्ते आहोत. म्हणून आज आपले हे स्वप्न पूर्ण होताना दिसतेय.
भरत गोगावले आज राज्याचे मंत्री आहेत. मीही भाजपाचा, विधिमंडळाचा नेता म्हणून काम करतोय. आम्ही महायुतीत आहोत. व्यापक असा विचार करून सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे. माझा पोलादपूर तालुका सगळ्यात विकसित आहे त्या तालुक्याचे गाव आणि गाव रस्त्याने जोडले पाहिजे, पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, चांगल्या शाळा, आरोग्य व्यवस्था पाहिजे यासाठी येणाऱ्या काळात निश्चितच नियोजनबद्ध काम होईल. आज सरकार आपले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याकडे शब्द टाकला तर ना येणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी जे-जे काम लागेल ते आपण सरकारच्या माध्यमातून करून घेऊ, हा विश्वासही दरेकरांनी यावेळी उपस्थितांना दिला.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले कि, भरत गोगावले फलोत्पादन मंत्री आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर फलोत्पादन, वेगवेगळ्या प्रकारची लागवड करता येईल. कोकणच्या जनतेला आपल्या खात्याच्या मार्फत ताकद देऊ शकतो. फलोत्पादन मंत्री म्हणून चांगले नियोजन करा, सहकार्य लागले तर या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसोबत बैठक घेऊ व आपल्याकडे अशा प्रकारची लागवड करून शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जाऊ शकतील का? हा प्रयत्न येणाऱ्या काळात करण्याची गरज असल्याचे दरेकरांनी गोगावले यांना म्हटले. त्याचबरोबर जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला आर्थिक सुबत्ता येत नाही तोवर विकास होत नाही. हाताला काम देऊन उद्योजक कसे घडवायचे याचा विचार करणेही गरजेचे असल्याचे दरेकरांनी म्हटले.