ठाणे: ( Farmers become fuel providers in the future Union Minister Nitin Gadkari ) आपल्या देशात प्रदूषणाची मोठी समस्या आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने जैविक इंधन तयार करण्याचा प्रकल्प पानिपत येथे सुरू केला आहे. जैविक इंधनाचे ४०० प्रकल्प सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यातील ६० प्रकल्प सध्या सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर ऊर्जा दाता, हवाई इंधन दाताच नव्हे, तर बिटुमेन दाताही होणार आहे. त्यामुळे येणार्या काळात आपण ऊर्जा आयात करणारे नाही, तर निर्यात करणारा देश होणार असल्याचा विश्वास रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
ठाण्यातील ‘लॅब इंडिया’च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ‘विदु’ या ‘ई-बायसिकल’चे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. वागळे इस्टेट येथील टीएमए हॉल येथे सोमवार, दि. ३१ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमाला ‘पद्मविभूषण’ एम. एम. शर्मा, ‘लॅब इंडिया’चे श्रीकांत बापट उपस्थित होते.
मंत्री गडकरी म्हणाले की, “२०१४ साली मी वाहतूक खात्याचा मंत्री झालो. त्यावेळी या ऑटो-मोबाईल्स उद्योगाचा व्यवसाय १४ लाख कोटी होता, तीन महिन्यांपूर्वी मी या क्षेत्राचा आढावा घेतला. त्यानुसार आता ऑटोमोबाईल क्षेत्रात आपण जपानला मागे टाकले आहे. जगात आता तिसर्या क्रमांकावर आहे. अमेरिका ७९ लाख कोटी, चीन ४७ लाख कोटी, तर भारताची २२ लाख कोटीची उलाढाल आहे. २०३० साली जगात इलेक्ट्रिक कार, बसेस, स्कूटर बनवणारा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.