मुंबई: ( Chief Minister Relief Fund Cell ) अहिल्यानगर येथे राहणारा १६ वर्षीय सतीश मारुती होडगर, इयत्ता दहावीत शिकणारा एक हुशार विद्यार्थी. एका दुर्दैवी अपघातात तो गंभीर जखमी झाला. यात त्याच्या उजव्या हाताला मोठी दुखापत झाली आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय असल्याचे सांगितले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सतीशच्या कुटुंबासाठी ही शस्त्रक्रिया परवडणारी नव्हती. अशातच सतीश यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ही रक्कम एकाच दिवसात रुग्णालयाच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याने त्याच्या पालकांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
सतीशचे वडील मारुती होडगर यांचा काही वर्षांपूर्वी अपघात झाला आणि त्यात त्यांनी उजवा डोळा कायमचा गमावला. दिव्यांग असल्याने त्यांना जड कामाची नोकरी मिळू शकली नाही, म्हणून ते एका लहानशा रसवंतीगृहात रोजंदारीवर काम करतात, जिथे त्यांना फक्त ४०० रुपये रोज मिळतात. सतीशची आईही कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मोलमजुरी आणि घरकाम करते, तिला दिवसाला केवळ ३०० रुपये मजुरी मिळते. सतीशला दोन भावंडे आहेत – मोठी बहीण २० वर्षांची असून लहान भाऊ १२ वर्षांचा आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून दैनंदिन खर्च भागवणंही मोठं आव्हान आहे.
अपघातानंतर, स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संपर्क साधण्यात आला. संकटाच्या गर्तेत सापडलेल्या या कुटुंबाच्या व्यथा ऐकताच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने केवळ एका दिवसात १ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली. एवढंच नाही, तर ही रक्कम थेट रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा करण्यात आली, ज्यामुळे सतीशची शस्त्रक्रिया तातडीने पार पडली.
कुटुंबाच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे भाव
“आमच्या घरात दोन वेळचं जेवण मिळवणंही कठीण आहे. अशा कठीण परिस्थितीत सतीशच्या उपचारासाठी एवढी मोठी मदत मिळणं म्हणजे देवाने पाठवलेला आशिर्वादच आहे. आम्ही मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी ही मदत इतक्या कमी वेळात दिली नसती, तर आमच्या मुलाचा हात कायमचा निकामी झाला असता!” – असे कृतज्ञतेने भाव सतीशच्या पालकांनी व्यक्त केले आहेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने वेळोवेळी गरजू नागरिकांना तातडीने मदतीचा हात दिला आहे. विशेषतः वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ही मदत अत्यंत मोलाची ठरते. सतीशच्या बाबतीतही या कक्षाने अवघ्या २४ तासांत आर्थिक मदत मंजूर करून तातडीने रक्कम वर्ग केली, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे. “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या तत्पर आणि संवेदनशील कार्यपद्धतीमुळे अनेक गरीब रुग्णांना वेळेवर मदत मिळत आहे. हा कक्ष भविष्यातही असेच लोकाभिमुख कार्य करेल.
- रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी