पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे हे सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही! मंत्री बावनकुळेंची टीका
01-Apr-2025
Total Views | 24
मुंबई : पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही तर जनता ठरवते अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या विधानावर त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. ७५ वर्षे वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही. भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी वयाच्या ७९ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई (८३ वर्षे) आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या ८१ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही," अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही. २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीजींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल," असा विश्वासही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.