बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विक्रमी मालमत्ता कर संकलित
२०२४-२५ आर्थिक वर्षात ६ हजार १९८ कोटी रुपयांचे संकलन
01-Apr-2025
Total Views | 8
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतके विक्रमी मालमत्ता कर संकलित करण्यात आले आहे. यात अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात १७८ कोटी ३९ लाख रुपयेसुद्धा संकलित करण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत यंदा विक्रमी कामगिरी केली आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ६ हजार २०० कोटी रुपये मालमत्ता कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले होते. करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे तसेच मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने महापालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी दिनांक २६ मे २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२५ या निर्धारित कालावधीदरम्यान ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलित केले. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ९९.९७ टक्के इतके आहे.
यासोबतच अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात अधिकचे १७८ कोटी ५० हजार रुपयेही संकलित करण्यात आले आहेत. प्रशासकीय विभागनिहाय कामगिरी बघता दि. २६ मे २०२४ ते दिनांक ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात जी दक्षिण विभागाने ६२४ कोटी ५० लाख रुपये, के पूर्व विभागाने ५६८ कोटी ५६ लाख रुपये, एच पूर्व विभाग ५२६ कोटी ६४ लाख रुपये आणि के पश्चिम ५०५ कोटी रुपये या विभागांनी सर्वाधिक मालमत्ता कर संकलन नोंदवले आहे.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच सह आयुक्त विश्वास शंकरवार आणि करनिर्धारक व संकलक गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीखाली मालमत्ता कर संकलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. नागरिकांनी वेळेवर मालमत्ता करभरणा करावा, यासाठी जनजागृती करणे, निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा, यासाठी साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र ठेवणे, करभरणा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देणे, मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करणे तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा करणे इत्यादींचा यात समावेश होता.