भारतीय बँकांनी ठेव प्रमाण पत्रातून कमावले १.१७ लाख कोटी
आता पर्यंतचे विक्रमी उत्पन्न
01-Apr-2025
Total Views | 10
मुंबई : भारतीय बँकांनी यावर्षी भांडवल निर्मितीत मोठा उच्चांक गाठला आहे. बँकांसाठी भांडवलनिर्मितीसाठीचे महत्वाचे साधन असलेल्या ठेव प्रमाणपत्रांच्या माध्यमातून भारतीय बँकांनी तब्बल १.१७ लाख कोटी रुपये उभारले आहेत. ७ मार्च ते २१ मार्च या एका पंधरवड्याच्या काळात बँकांनी ही एवढी रक्कम उभारली आहे. २०२१ नंतर अशा प्रकारे उभारली गेलेली ही दुसरी मोठी रक्कम आहे. यातून बँकांना कर्ज देण्यासाठीची रोखीची तरलता राखण्यास मदत झाली आहे.
साधारत: कुठल्याही आर्थिक वर्षाच्या शेवटी कर्जाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते, यामुळे बँकांना यासारख्या भांडवल निर्मितीच्या उपाय योजनांकडे लक्ष केंद्रित करावं लागतं. या साधनाच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बँकेने २८,१४० कोटी उभारले आहेत. एचडीएफसी बँकेने १८,१४० कोटी इतकी मोठी रक्कम उभारली आहे. इंडसइंड बँकेतील घोटाळ्यानंतर बँकेची पत घसरली होती. परंतु त्यानंतर बँकेने या ठेव प्रमाणपत्रांचा आधार घेत भांडवल निर्मितीकडे लक्ष दिले त्यातून बँकेने आतापर्यंत १५,८५० कोटी इतकी रक्कम उभारली आहे.
बँकांच्या भांडवल निर्मितीवर वित्तीय क्षेत्रातील मुल्यांकन करणाऱ्या इक्राचे उपाध्यक्ष अनिल गुप्ता यांनी सांगितले की, आता वित्तीय वर्ष संपत आहे तसेच भारतीय बँकांतील अनेक बँकांना त्यांच्या रोख तरलतेसाठी निधीची आवश्यकता असल्याने भारतीय बँकांना त्यांच्या या ठेव प्रमाणपत्रांना मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे आता बँकांना वर्षभर निधीची चणचण भासणार नाही. असे निरिक्षण गुप्ता यांनी नोंदवले.
ठेव प्रमाणपत्र म्हणजे काय ?
बँकांकडून निधी उभारण्यासाठी वापरण्यात येणारे ठेव प्रमाणपत्र एक वित्तीय साधन आहे. ही बँकेकडून जाहीर केलेली एक गुंतवणुक योजनाच आहे. ज्यात गुंतवणुकदार विशिष्ट काळासाठी पैसे गुंतवुन परतावा मिळवू शकतात. यांवर मिळणारा व्याजदर हा बचत खात्यांपेक्षा निश्चितच जास्त असतो. बँकांना त्याच्या खेळत्या भांडवलनिर्मितीसाठीचे हे महत्वाचे साधन आहे.