नाशिक: ( 35 new flights from Nashik from tomorrow ) नाशिक येथून बुधवार, दि. २ एप्रिल रोजीपासून तामिळनाडूतील कोइम्बतूरसाठी थेट विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळे नाशिकहून देशातील या प्रमुख औद्योगिक शहरात अवघ्या चार तासांत पोहोचता येणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून दि. ३१ मार्च रोजीपासून देशातील ३५ प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू होणार आहे.
यामध्ये तिरुपती, श्रीनगर, चंदीगढ, गुवाहाटी, कोइम्बतूर, कोलकाता, अयोध्या, दरभंगासह ३५ प्रमुख शहरांचा समावेश आहे. सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून ‘इंडिगो’ या हवाई कंपनीकडून नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, गोवा, इंदोर, बंगळुरु, जयपूर आदी शहरांसाठी विमानसेवा दिली जाते. त्यात दि. ३१ मार्च रोजीपासून ३५ नव्या सेवांचा समावेश होणार आहे.
ओझर विमानतळावरून सध्या ‘इंडिगो’कडून दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु, अहमदाबाद, इंदोर, गोवा याठिकाणी नियमित विमानसेवा दिली जात आहे. दरम्यान, या शहरांना जोडणार्या विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता हॉपिंग फ्लाईटने देशविदेशांतील शहरांना जोडणार्या विमानसेवेचे कंपनीच्यावतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दि. ३० मार्च ते दि. २५ ऑक्टोबर रोजीपर्यंत हे वेळापत्रक लागू असेल. या वेळापत्रकानुसार नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरु या विमानतळांवरून बेळगाव, चंदीगढ, दरभंगा, कोझीकोड, देहरादून, जबलपूर, गया, पंचनगर, विजयवाडा, विशाखापट्टणम, मदुराई आदी शहरांसाठी ’कनेक्टिंग’ विमानसेवेचा लाभ नाशिककरांना घेता येणार आहे.