राजकारणात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?
- मी गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय होते आणि माझे आईवडील - विवेक पंडित आणि विद्युलता पंडित हे गेल्या 40 वर्षांपासून आदिवासी, गोरगरीब, वंचित समाजासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत लहानपणापासूनच मी या कामामध्ये होते आणि त्यामुळेच सामाजिक कार्याची आवड होती. समाजकार्य करताना लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर त्याला राजकीय क्षेत्राचीही जोड हवी. त्यासाठीच जेव्हा संधी मिळाली, त्यावेळी राजकीय पक्षात मी प्रवेश केला आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.
गेल्या 30 वर्षांपासून वसई-विरार भागातील राजकीय दहशत संपवताना एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्या अडचणी आल्या?
- खरे तर, महिला म्हणून अशा काही अडचणी आल्या नाहीत. उलट महिला म्हणून मला जास्त लोकांचा पाठिंबा मिळाला. लोकांचा सहभाग लाभला आणि एक ठाकूरशाही किंवा जी काही गुंडगिरी होती, बोलण्या-चालण्याची पद्धत होती, ती संपुष्टात आली. समोरच्या व्यक्तीशी बोलणे, त्याला सन्मान देणे या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. या बाबतीत मला या गोष्टींचा फायदाच झाला. कारण, आपण समोरच्याशी कसे बोलतो, समोरच्या व्यक्तीला कसा सन्मान देतो, हे महत्त्वाचे आहे. महिला म्हणून मी जास्त लोकांशी जोडले गेले आणि यावेळी मतदानालासुद्धा महिला खूप मोठ्या प्रमाणात उतरल्या. त्यामुळे महिला म्हणून महिलांशी ‘कनेक्ट’ होताना मला खूप सोपे गेले.
मागील काही दिवसांत राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना बघता, महिला सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही या प्रश्नाकडे कसे बघता?
- गेल्या काही वर्षांमध्ये समाजात ही विकृती खूपच वाढलेली दिसते. कोणतेही सरकार सत्तेत असले, तरी फक्त सरकारला दोष देऊन उपयोग नाही. आपल्याकडे कायदे आहेत, ते अमलात आणणारी यंत्रणासुद्धा आहे. काही थोड्याफार प्रमाणामध्ये चांगलेही काम होते आणि कुठे कुठे चुकाही होतात. पण, माझ्या माहितीप्रमाणे, प्रत्येक ठिकाणी अशाप्रकारचे गुन्हे नोंदवले जात आहेत. आरोपींनाही अटक केली जाते. पण, समाजातील विकृती कमी करणे गरजेचे आहे. समाज म्हणून आपण कसे पाहतो, हे बघणेसुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे समाजाला जागृत करण्यासाठी आणि समाजातली विकृती कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, यादृष्टीने विचार करणे आणि काम करणे गरजेचे आहे, असे मला वाटते.
महिलासुरक्षा प्रश्नी सामाजिक जनजागृतीबरोबरच कायद्याचा वचकही आवश्यकच. म्हणूनच राज्यात ‘शक्ती’ कायदा लागू करावा, अशी आग्रही मागणी सर्व स्तरातून होताना दिसते. तेव्हा,त्याविषयी काय सांगाल?
- नक्कीच, मला असे वाटते, जे कायदे चांगले आहेत, मग ते कोणाच्याही काळात आलेले असतील, पण जर ते चांगले आहेत, तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी निश्चितच आम्ही महायुतीच्या शासनाकडेसुद्धा पाठपुरावा करू आणि ‘शक्ती’ कायद्यातील चांगली कलमे आणि चांगल्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू.
लोकप्रतिनिधी आणि गृहिणी हे जबाबदारीचे दुहेरी समीकरण कसे साधता?
- खरं तर हा खूप कठीण प्रश्न आहे. पण, लोकप्रतिनिधी असतानाच मी गृहिणी आहे, आईसुद्धा आहे. या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांचा, मुलांचा आणि माझ्या नवर्याचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. माझी आई आणि सासू या दोघीजणी माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामुळे मला जास्त अडचणी येत नाहीत. पण, सगळे आयुष्यच बदललेले आहे, त्यामुळे कधीकधी थोडीशी मुलांची आठवण जास्त येते, एवढेच.
राजकीय जीवनात वावरताना, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तव्याचे निर्वहन करताना, स्वत:साठी वेळ देणे कितपत शक्य होते?
सध्यातरी मला अजिबात स्वत:साठी असा वेगळा वेळ देता येत नाही. कारण, लोकसेवा हेच आता आयुष्याचे ध्येय आहे. त्यामुळे लोकांची कामे होतात, लोक समाधानी होतात, यामध्येच मला आनंद मिळतो आणि तोच आनंद माझ्या दृष्टीने सगळ्यांत महत्त्वाचा आहे.
पुढील आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होईल. तेव्हा, महिलांसाठी या अर्थसंकल्पातून आपल्या काय अपेक्षा आहेत?
- महिलांसाठी महायुती सरकारने खूप चांगल्या योजना आधीच आणल्या आहेतच. निवडणुकीच्या काळात ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार, अशा अफवादेखील विरोधकांकडून उठविल्या जात होत्या. पण, मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्येसुद्धा महिलांसाठी जास्तीत जास्त चांगल्या योजना असतील. मी आज आमच्या सत्रामध्ये महिलांच्या सक्षमीकरणावर एक चर्चा ठेवलेली आहे. त्यामध्ये एक मुद्दा मांडणार आहे की, आपण नेहमी महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चा करतो, त्यांच्या अधिकारांबाबत चर्चा करतो, पण सगळ्यांत महत्त्वाचा विषय महिलांच्या मासिक पाळीबद्दलचा आहे. आपल्या राज्यामध्ये जवळपास 23 लाख हे ‘अंत्योदय’ कार्डधारक आहेत. त्याच्या दुप्पट केले, तर 50 लाखांच्या आसपास महिला या गरिबी रेषेखाली आहेत. ‘अंत्योदय’ कार्डधारकांमध्ये येणार्या महिला ज्या आपल्या आयुष्यात दोनवेळच्या अन्नासाठीही संघर्ष करतात, ज्यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नाही, अशा महिला सॅनिटरी नॅपकिन खरेदी करू शकतात का, हा मोठा प्रश्न आहे. मग त्यांच्या आरोग्याचे काय? त्यांच्या मासिक पाळीच्या वेळेच्या स्वच्छतेचे काय? हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे आणि तोच प्रश्न मी शासनापुढेही मांडणार आहे. त्यांच्यासाठी काहीतरी योजना लागू करावी, अशी विनंती करणार आहे.
आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त राज्यातील महिला आणि मुलींना काय शुभेच्छा द्याल?
- महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्वच महिलांना माझ्याकडून ‘जागतिक महिला दिना’च्या खूप खूप शुभेच्छा. आपण सगळ्यांनी सक्षम होऊन ‘आत्मनिर्भर’ होणे गरजेचे आहे. फक्त शरीराची सुरक्षाच नाही, तर आपली मानसिक सुरक्षा आणि मानसिक स्वास्थ्यही जपणे तितकेच महत्त्वाचे आहे, तर महिला दिनाचे औचित्य साधत, मी तमाम महिलावर्गाला शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही जपण्यासाठी, सक्षम होण्यासाठी मनस्वी शुभेच्छा देते.