
रमजानचा पहिला दिवस. त्या मुलीच्या आईने तिला जेवायला बोलावले. तर ती म्हणाली, तिचा ‘रोजा’ आहे. हे ऐकून तिच्या आईबाबांनी खोलवर चौकशी केली. तेव्हा कळले की, त्यांच्या मुलीची एका मुस्लीम मुलासोबत मैत्री झाली आहे. मानसिक आधारासाठी तो मुस्लीम मुलगा जे म्हणेल, ते त्यांची मुलगी ऐकत होती. हे सगळे कळल्यावर मुलीचे मराठमोळे आईबाप संतापले. मुलीने ‘रोजा’ ठेवू नये, तसेच त्या मुलाशी मैत्री तोडावी, असे त्यांनी म्हटले. इतके सांगून त्यांनी मुलीला ‘रोजा’ ठेवू दिला नाही, म्हणून त्या मुलीने १३व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही सत्य घटना आहे, कालपरवाच डोंबिवली परिसरात घडलेली! मध्यमवर्गीय मराठी दाम्पत्य. त्यांची काहीबाही कारणांहून घरात दररोजची भांडणे होत असत. त्यामुळे त्यांची किशोरवयीन मुलगी अस्वस्थ होती. हे सारे माहीत असलेल्या तिच्या ओळखीच्या एका मुस्लीम मुलाने याच काळात तिच्याशी मैत्री केली. मुलगी पूर्णत: त्याच्या कह्यात गेली. आईवडिलांना मुलीच्या आयुष्यात काय उलथापालथ झाली, ते माहिती नव्हते. मुलीला पाहिजे त्या वस्तू दिल्या की झाले, असेच चालले होते. मृत लेकीची विटंबना नको, म्हणून मुलीच्या मृत्यूनंतर मातापित्यांनी प्रकरण इथेच थांबवले.
‘रोजा’ ठेवायलाच हवा, असे त्या बालिकेच्या मनावर कसे ठसवले गेले असेल? मैत्रीच्या नावावर त्या मुलीचे धर्मांतरण करण्याची खेळी सुरू झाली होती का? आईबाबांचे आपसात पटत नव्हते, त्याने निराश झालेल्या त्या बालिकेचा गैरफायदा त्या मुलाने घेतला का? हे सगळे प्रश्न काट्यासारखे मनात सलत आहेत. या पार्श्वभूमीवर वाटते की, सगळ्यांनाच आपली मुलं प्रिय. पण, आजच्या काळात पालकांना कामामुळे मुलांसाठी वेळ देता येत नाही. या अपराधी भावनेने मग पालक पाल्यांचे प्रत्येक हट्ट पुरवणे, त्यांच्या सगळ्या म्हणण्याला हो ला हो करणे यात गुंतले आहेत. पण, वस्तू, खाऊ आणि भौतिक साधने देऊन मुलांच्या अंतरात्म्याचा, आत्मविश्वासाचा, व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो का? ‘रोजा’ ठेवू दिला नाही म्हणून, आत्महत्या करणार्या त्या मुलीची आत्महत्या खरे तर हिमनगाचे टोक. शहरातली अत्याधुनिक संकुल ते सेवावस्तीच्या झोपड्यांमध्येही असे बरेच काही सुरू आहे. नि:स्वार्थीपणे आपल्या मुलामुलींची काळजी घ्यायला आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुणीही बाहेरून येणार नाही. कृपया पालकांनो...
कट्टरपंथी मानसिकता
नियमानुसार परीक्षा केंद्राच्या बाहेरच त्या मुलींना हिजाब काढून जाण्यास सांगितले गेले. तेव्हा परीक्षेला बसू दिले नाही तरी चालेल; पण हिजाब काढणार नाही, अशी भूमिका त्या दहा मुलींनी घेतली. परीक्षा न देता त्या बाहेर पडल्या. समाजमाध्यमांवर ही घटना प्रसिद्ध झाली. अपेक्षेप्रमाणे त्यावर संदेश आले, ‘वा मेरी इस्लाम की शेरनीयो’, ‘अल्ला का नूर तुमपर कायम रहे। इस्लाम की शेहजादीयो’ वगैरे वगैरे. मुलींनी हिजाब परिधान करण्यासाठी परीक्षा देण्यासही नकार दिला, यांचे कौतुक या सगळ्यांना होते. ‘पहले हिजाब, फिर किताब’ अशी त्यांची मानसिकता! त्यांची संस्कृती, त्यांचा धर्म त्या पालन करतात, यामध्ये आपण का बोलावे? असे अनेक जणांचे मत असेल. पण, हिजाबसाठी परीक्षा न देणार्या त्या विद्यार्थिनींबाबत मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
त्या इतकी वर्षे शाळेत गेल्या असतील, शिकल्या असतील. त्यांच्या शिक्षणाबाबत, भवितव्याबाबत त्यांच्या मनात काहीच विचार नसतील? आपले अवघे अस्तित्व केवळ हिजाबवरच अवलंबून आहे, अशी या मुलींची मानसिकता का झाली असेल? त्यांच्या मनात या हिजाबबद्दल आदर, प्रेम आहे की, हिजाब घातला नाही, तर आपले कौमवाले काय म्हणतील? काय करतील याची भीती? संस्कृती जपणे, धर्मपालन करणे आवश्यकच. पण, स्वत:चा विकास करणे, त्याद्वारे कुटुंब आणि समाजाचा विकास करणे, हेसुद्धा प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. याबाबत या मुलींची आणि त्यांचे समर्थन करणार्यांची काय भूमिका आहे? या पार्श्वभूमीवर वाटते की, कट्टर मुस्लीम देश सौदी अरेबिया, पाकिस्तान किंवा इराणमध्येही हिजाबची सक्ती नको म्हणत, तिथल्या महिला रस्त्यावर उतरत आहेत. त्यांचा हा लढा कशासाठी आहे? याबद्दल या हिजाबसाठी परीक्षेला नकार देणार्या मुलींना माहिती आहे का? छे! माहिती असले तरीसुद्धा या मुली त्याबद्दल ‘ब्र’ शब्द उच्चारू शकत असतील का? हा प्रश्न त्या विचारू शकतात का? ही जी स्थिती आहे ना, ती भयंकर आहे. मात्र, त्याबाबत कसलीच खंत, खेद ना या मुलींना ना त्यांच्या पालकांना. उद्या या मुलीही त्यांच्या मुलींना हेच संस्कार देणार! काय परिधान करायचे, याचे स्वातंत्र्य आहे. हिजाबला विरोध नाही. विरोध आहे कट्टरपंथी मानसिकतेला!
९५९४९६९६३८