( samarth ramdas ) मागील लेखात आपण पाहिले की, मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक १७९ मध्ये, समर्थांनी ‘थोरला देव’ असा सृष्टीनिर्मात्याचा उल्लेख केला आहे. परंतु, तो देव गुप्त आहे, असे म्हटले आहे. कारण, त्याला जाणण्यासाठी जी सूक्ष्मतिसूक्ष्म अनुभूती घेणारी प्रतिभा, तसेच देहबुद्धी व अहंकाराचा त्याग करून मिळालेली अतींद्रिय ज्ञानदृष्टी लागते, ती आपल्या ठिकाणी नसल्याने आपल्यासाठी थोरला देव हा गुप्त आहे, असे वाटते. तथापि, हे सर्व गुणविशेष ज्याच्या ठिकाणी एकत्र आढळतात, अशा साक्षात्कारी सत्पुरुषाचे शिष्यत्व पत्करल्याशिवाय, आपण ती अतींद्रिय अनुभूती घेऊ शकत नाही. त्यासाठी स्वामींनी प्रथम पूर्वीच्या श्लोकांतून, गुरूपदाला लायक नसलेल्या असत्पुरुषाची अर्थात भोंदू गुरूची लक्षणे सांगितली, ती आपण सविस्तर पाहिली. आता स्वामी, गुरूपदाला लायक असलेल्या सत्पुरुषाची काही लक्षणे पुढील श्लोकात सांगत आहेत.
जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी।
कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी।
प्रभु दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे।
तयाचेन योगें समाधान बाणें॥१८३॥
ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी, वर सांगितलेले गुणविशेष स्वाभाविकरित्या प्रकट होतात. त्याच्या ठिकाणी ईश्वरी साक्षात्कार झालेला असल्याने, ते गुण त्याच्या अंतःकरणात मुळात असल्याचा प्रत्यय येतो. अशा साक्षात्कारी महात्म्याच्या नुसते सान्निध्यात आले, तरी समाधानाचा अनुभव येतो. कारण त्या निरिच्छ पुरुषाला, कुणाकडून काहीही मिळवायचे नसते. त्यामुळे त्याच्या व्यक्तित्वाभोवतालची आनंदाची वलये अथवा समाधानाचे तरंग, आजूबाजूचे वातावरण सात्विक करून टाकतात. स्वामी म्हणतात, “तयाचेन योगे समाधान बाणे.” त्याच्या सहवासात येणारा समाधानाचा अनुभव, हे त्याचे पहिले लक्षण होय. ज्ञानी पुरुष अखंड समाधानी तृप्त असल्याने, त्याला काही मिळवायचे नसते, तरी त्या महात्म्याला तुमच्या-आमच्यासारख्या अज्ञानी जीवांच्या उद्धाराची चिंता असते. त्यासाठी त्याला एकांतातून लोकोपचारात यावे लागते. तो पुरुष ज्ञानी, विवेकी, वैराग्यसंपन्न असतो.
पण त्याच्या अंगीचे हे गुणविशेष ओळखण्यासाठी, आपल्या अंगी ते गुण थोडेतरी बाणले पाहिजेत. त्या गुणांच्या अंशमानाने आपले अंतःकरण सुधारल्याशिवाय, साक्षात्कारी पुरुषाचे गुणविशेष आपल्याला समजणार नाहीत. ही झाली सत्पुरुषाची अंतरिक लक्षणे. आता स्वामी त्या साक्षात्कारी पुरुषाची, काही बाह्यलक्षणे येथे सांगत आहेत. हा महात्मा अत्यंत क्षमाशील आणि करुणासंपन्न असतो. तो योगी असतो. योगविद्या जाणतो. तो बहुश्रुत असल्याने, त्याला अनेक विषयांचे ज्ञान असते. लोकांशी वागताना तो सर्व बाबतीत दक्ष असतो, सावध असतो. बावळटपणाला, भोळेपणाला तेथे स्थान नसते. त्याच्या ठिकाणी चातुर्य असते. ते त्याच्या वागण्या-बोलण्यातून ते प्रकट होते. तो सर्वांशी प्रेमळपणे व वडीलकीच्या नात्याने वागतो. त्यामुळे त्याचे बोलणे आशीर्वादासारखे असते, अशा पुरुषांच्या, संतांच्या संगतीत येणार्या प्रत्येकालाच समाधानाचा अनुभव येतो.
ज्या श्लोकगटाचा अभ्यास आपण करीत आहोत, त्याला समर्थवाङ्मय अभ्यासकांनी वेगवेगळी नावे दिली आहेत. ल. रा. पांगारकर या श्लोकांना ‘सगुणानिर्गुणातीत शुद्धब्रह्म’ असे म्हणतात. शंकरराव देवांच्या मते, हे सर्व श्लोक ‘ज्ञानपर’ आहेत. आचार्य विनोबा भावे यांनी त्यांना ‘गुरूकृपालब्धी’ म्हटले आहे. एकंदरीत, हे श्लोक अध्यात्मज्ञान, अद्वैतज्ञान सांगणारे आहेत. अद्वैत तत्त्वज्ञानाच्या पाश्वर्र्भूमीवर हा भाग अभ्यासायचा असल्याने, परमात्मत्व आणि विश्वातील प्रचंड घडामोडींवर लक्ष ठेवणारी सत्ता यासंबंधीच्या शिष्यांच्या मनातील शंका, सद्गुरू अथवा संत यांच्या बोलण्यातून उलगडू लागतात. वास्तविक परमात्मतत्व हा बोलण्या-ऐकण्याचा विषय नसून, तो अनुभूतीचा विषय आहे. तरीसुद्धा गुरूच्या अर्थात संतांच्या वाणीतून तो उलगडत जातो. म्हणून स्वामी म्हणतात, “अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे।” (श्लोक 184) असे असले तरी, परब्रह्म हा विषय शब्दांच्या पलीकडील अनुभूतीचा असल्याने, आपण सर्वार्थाने रामरूपात मिसळून जावे, आपल्या खोट्या ‘मी’चे अहंकाराचे देहबुद्धीचे अस्तित्वच शिल्लक राहू नये. रामरूपात मिसळून गेल्यावर साधकाला कसलेही भय, चिंता, काळजी राहात नाही. स्वामीच्या शब्दांत सांगायचे तर,
लपावे अती आदरे रामरूपी।
भयातीत निश्चित ये सस्वरूपी॥ (श्लोक १८५)
‘रामरूपात लपणे’ याचाच अर्थ रामरूपाशी एकरूप होऊन जाणे, आपले अस्तित्व त्यात समाविष्ट करून टाकणे. आपली देहबुद्धी, आपल्या ठिकाणचा अहंकार काही केल्या जात नाही, हा सर्वसाधारण अनुभव आहे. या चिवट अहंकाराचा, मीपणाचा, देह म्हणजेच मी या कल्पनेचा, त्याग करायची युक्ती म्हणजेच रामाच्या गुणविशेषात एकरूप होऊन जाणे, अत्यंत आदरपूर्वक रामरूपाच्या मागे लपणे, आपल्या खोट्या ‘मी’चे अस्तित्व नाहीसे करणे होय. अहंभावाचे बीज असलेल्या ‘मी’चे अस्तित्व नाहीसे झाल्यावर, निर्भय स्थिती उत्पन्न होते. तथापि, या रामरूपाला म्हणजे आपल्या सस्वरूपाला शोधायचे कसे? हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.
सदा सर्वदा राम सन्नीध आहे।
मना सज्जना सत्य शोधून पाहें।
अखंडीत भेटी रघुराज योगु।
मना सांडी रे मीपणाचा वियोगु॥१८६॥
मागे श्लोक क्रमांक 36 मध्ये स्वामींनी, याच स्वरूपाचे विधान करताना म्हटले आहे की,
सदा सर्वदा देव सन्नीध आहे।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे। (३६)
त्या भागात स्वामी सगुणाचे वर्णन करीत होते. परंतु, प्रस्तुत श्लोकात (१८६) निर्गुण परमात्मतत्त्व विवेचन असल्याने, त्यातील अर्थ त्यासंदर्भात शोधला पाहिजे. आपले स्वस्वरूप नेहमीच अगदी आपल्या जवळ आहे, आपल्याच ठिकाणी आहे. आपल्या अंतःकरणात ध्यानाने, चिंतनाने खोलवर शिरून स्वस्वरुपाचा शोध घेताना, त्यातच विलीन व्हावे लागते. अंतःकरणातील स्वस्वरुपाची भेट म्हणजेच, रघुराजाची परमात्मस्वरुपाची भेट नेहमीच आपल्या ठिकाणी आहे, कारण मी त्यापासून वेगळा नाही. पण देहबुद्धी व अहंकार त्याच्या ठिकाणी आड येतात. स्वामी म्हणतात, “हे मना, तो ‘मीपणा’ तू सोडून दे” (सांडी) कारण, हा मीपणाचा परमात्मस्वरूपाच्या वियोगाला कारणीभूत आहे. अद्वैत तत्त्वज्ञानात परमात्मतत्वाच्या वियोगाला कारणीभूत ठरणार्या मीपणाचा त्याग केल्यावर, द्वैतच उरत नाही आणि परमात्मस्वरूपाची, रघुराजाची अखंड भेट साधता येते. तेच मानवी जीवनाचे ध्येय आहे.
- सुरेश जाखडी
7738778322