काँग्रेसला ‘क्षमा’ नाहीच!

    05-Mar-2025   
Total Views | 22

shama mohamed remarks on captain rohit sharma
 
आधी काहीबाही कुणा काँग्रेसीने बरळायचे आणि नंतर पक्षाने ‘त्या वक्तव्याशी आमचा काहीएक संबंध नाही,’ असे म्हणत ‘हात’ झटकायचे, हा आता नित्याचाच प्रकार. परवाही काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी अशीच अभद्र टिप्पणी केली आणि तीही राजकारण, समाजकारणाच्या पलीकडे. या बाईंनी चक्क भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला ‘लठ्ठ’ असे हिणवत, ‘त्याच्यासारखा सामान्य कुवतीचा कर्णधार भारताला लाभलेला नाही,’ अशी वायफळ टिप्पणी ट्विटरवर केली. हल्ली समाजमाध्यमांवर कुणीही कुणाविषयीही वाट्टेल ते बोलण्याची जणू फॅशनच! ट्रोलिंगसारखे प्रकारही त्यातूनच घडत असतात. पण, आपण एका पक्षाचे प्रवक्ते आहोत, याचेही भान या शमाबाईंना राहिले नाही. बरं, त्यांच्या पोस्टवर टीकेचा भडीमार झाल्यानंतरही त्यांनी आपली आडमुठी भूमिका कायम ठेवली. पण, यामुळे काँग्रेसची होणारी बदनामी लक्षात घेता, अखेरीस शमा यांनाही पोस्ट ट्विटरवरून हटवावी लागली. असे असले तरी एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्त्याने अशाप्रकारे राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारावर त्याच्या शरीरयष्टीवरून असे तोंडसुख घेणे, हे अज्ञानीपणाचे आणि आगाऊपणाचेच लक्षण!
 
रोहित शर्माची क्रिकेटविश्वातील कामगिरी, त्याचा देशविदेशातील चाहतावर्ग याची कदाचित या शमाबाईंना सुतराम कल्पना नसावी. जेवढी गर्दी कधी राहुल गांधींच्या सभेलाही जमली नसेल, त्याहूनही दुप्पट जनसागर गेल्यावर्षी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर, रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघावर शुभेच्छा वर्षावासाठी मरीन ड्राईव्हवर लोटला होता. पण, खरंच पेशाने दंतवैद्यक, पत्रकार वगैरे राहून राजकारणात उतरलेल्या शमाबाईंना रोहितच्या फिटनेसवर शंका होती की, पाकिस्तानी क्रिकेट संघाची पिछेहाट त्यांना झोंबली? ते काहीही असो, यानिमित्ताने भारताच्या राष्ट्रीय चेहर्‍यांना, राष्ट्रीय प्रतीकांना आणि एकूणच राष्ट्रीय अस्मितेला नख लावण्याची काँग्रेसची जुनीच खोड अधोरेखित व्हावी. एवढीच खेळाडू आणि त्यांच्या फिटनेसची चिंता काँग्रेसला सतावत होती, तर संपुआच्या काळात खेळाडूंसाठी, क्रीडा धोरणासाठी काँग्रेसने भरीव असे काय केले? उलट काँग्रेसने केवळ पक्षीय स्वार्थासाठी खेळाडूंचा आजवर वापरच करून घेतला. आता झालेली देशाच्या कर्णधारावरील चिखलफेक ही काँग्रेसच्या क्रीडाविरोधी धोरणाचेच द्योतक म्हणावे लागेल.
 
संख्यावाढीचे मतशास्त्र
 
 
 
आपल्या धर्माची लोकसंख्या वाढविण्यासाठी मुले जन्माला घाला, या अधूनमधून केल्या जाणार्‍या आवाहनानंतर, आता चक्क आपल्या राज्याची लोकसंख्या वाढविण्यासाठी लग्न झाल्या झाल्या लगेचच मुले जन्माला घाला, असे अजब आवाहन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केले. एका विवाहप्रसंगी उपस्थित असलेल्या स्टॅलिन यांनी नवविवाहितांना असा हा ‘वाढीचा’ कानमंत्र दिला. यामागे मुलामुलींचे वाढते वय आणि प्रसूतीसंबंधी येणारी आव्हाने, असा आरोग्यदृष्ट्या चिंतेचा दृष्टिकोन स्टॅलिन यांचा मुळीच नव्हता, तर राज्यातील लोकसंख्या वाढती राहिली की, भविष्यात होऊ घातलेल्या परिसीमन प्रक्रियेत मतदारसंघांची संख्या घटणार नाही, हा त्यामागचा त्यांचा निखळ राजकीय उद्देश, जो स्टॅलिन यांनी बोलूनही दाखवला. ते म्हणाले की, “खरं तर कुटुंब नियोजन धोरणांमुळे आजवर तामिळनाडूचे नुकसानच झाले आहे. जर जनगणनेच्या आधारे परिसीमन लागू केले गेले, तर तामिळनाडूतून आठ खासदार कमी होऊ शकतात. यामुळे तामिळनाडू आपले संसदेत प्रतिनिधित्व गमावून बसेल.”
 
गेल्या काही दिवसांपासून नवीन शैक्षणिक धोरण आणि हिंदी भाषा राज्यावर लादण्याच्या कथित आरोपांवरून स्टॅलिन यांनी केंद्र सरकारविरोधात अपप्रचाराचा धुरळा उडवला आहे. त्यामुळे हा विषय केवळ राज्य सरकारपुरता मर्यादित नसून, सामान्यांनाही केंद्र सरकारविरोधात उसकवण्याचे स्टॅलिन यांचे पद्धतशीर प्रयत्न सुरुच आहेत. म्हणूनच आता त्यांची अपेक्षा आहे की, तामिळनाडूच्या जनतेने परिसीमन प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच मुलांना जन्माला घालावे. यापेक्षा पराकोटीचा राजकीय स्वार्थ आणि संधीसाधूपणा तो काय असू शकतो? आपल्या, आपल्या घराण्याच्या उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी मोठ्या संख्येने यांना मतदार हवे, सुरक्षित मतपेढ्या हव्या, म्हणून लोकांनी मुलं जन्माला घालावी, इतका हा संकुचित आणि आत्मकेंद्री विचार. परंतु, त्याला कोंदण दिले जाते ते तामिळ अस्मितेचे आणि हिंदीविरोधी लढ्याचे. अमित शाहंसह अनेक नेत्यांनी परिसीमनानंतर तामिळनाडूमधील लोकसभेच्या जागा कमी होणार नसल्याची ग्वाही दिल्यानंतरही, स्टॅलिन यांचे तामिळी तव्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे उद्योग सुरूच आहेत, त्यात त्यांनी गाठलेला हा नीच्चांक!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
अग्रलेख
जरुर वाचा
कबरीच्या वादात सुप्रिया सुळेंची उडी; म्हणाल्या, बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय...

कबरीच्या वादात सुप्रिया सुळेंची उडी; म्हणाल्या, "बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय..."

राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून तणाव चांगलाच वाढल्याचं दिसतंय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही सोमवारी कबर हटवण्यावरून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडल्याचं पाहायला मिळतंय. "जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांना घेऊ द्या. बऱ्याच गोष्टी या आस्थेचे विषय असतात. प्रत्येकाच्या आस्थेचा विषय असून यात कोणीही ढवळाढवळ करू नये", असे सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. Supriya Sule on Aurangzeb Kabar..