मुंबई: ( self-redevelopment Pravin Darekar ) गुढीपाडवा म्हणजे केवळ नववर्ष नव्हे, तर नवीन संकल्प करण्याचा दिवस. या दिवशी अनेकजण संकल्प करतात. भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनीही “स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विशेषतः मराठी माणूस जो चाळीत राहतो, त्याला मोठे घर मिळावे,” हा माझा गुढीपाडव्यानिमित्ताने संकल्प असल्याचे प्रतिपादन केले आहे.
माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, “महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाचे भले व्हावे व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, हा आमचा सार्वत्रिक संकल्प निश्चित आहे. पण, मुंबईत ‘गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास’ ही एक चळवळ, अभियान म्हणून मी हातात घेतले आहे. ज्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, सरकारचा राजाश्रय आहे. या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला विशेषतः मराठी माणूस जो मोडकळीस आलेल्या चाळीत राहतो, त्याला स्वयंपुनर्विकासातून मोठे घर मिळावे व या अभियानाने मोठी गती घ्यावी, हा माझा संकल्प आहे.
तसेच लाडक्या बहिणींना १ हजार, ५०० रुपये प्रतिमहा सरकार देते आहे. त्या १ हजार, ५०० चे १५ हजार कसे होतील? हाही संकल्प आहे. मुंबै बँकेने धोरण आणले आहे, त्या धोरणाअंतर्गत १० हजार, २५ हजार, एक लाख अशा प्रकारे विनातारण लाडक्या बहिणींना अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून त्यांचे १ हजार, ५०० चे १५ हजार कसे होतील व त्या उद्योजक कशा होतील? हा नवा संकल्प करत आहे,” असे दरेकर म्हणाले. शेतकरी कर्जमाफीवर बोलताना दरेकर म्हणाले की, “शेतकर्यांना कर्जमाफी देण्याची आमची इच्छा आहे. विरोधी पक्षाला केवळ टीका करण्याचेच काम आहे.
एका बाजूला अर्थसंकल्पावर बोलताना देशावर, राज्यावर कर्ज झाले आहे असे बोलतात आणि दुसर्या बाजूला शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही मागणी करतात. हा दुटप्पीपणा आहे. जसजशी राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होईल, तसे जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधील राहू.”
संजय राऊत यांच्यावरही साधला निशाणा
संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, “संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. आपल्या घरात जाण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज लागत नाही. पंतप्रधान मोदी स्वतः संघाच्या विचारसरणीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. पंतप्रधान म्हणून ते संघाच्या कार्यालयात गेले असतील, तर त्याचा आनंद सर्वांना आहे. फक्त संजय राऊत यांच्याच पोटात दुखते आहे,” असा टोलाही दरेकरांनी लगावला. तसेच “राऊत यांनी मेळावे होईपर्यंत तोंडाला चिकटपट्टी लावली पाहिजे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे काय बोलणार? हे सभा झाल्यावरच समोर येणार आहे. परंतु, संजय राऊत यांना धीरच नाही. राज ठाकरे संध्याकाळी भूमिका जाहीर करणार आहेत, त्यानंतर राऊत बोलले, तर त्याला अर्थ आहे. फक्त चर्चेत राहायचे हा राऊत यांचा केविलवाणा प्रयत्न आहे,” अशी टीकाही दरेकरांनी केली.