मुंबई: ( narendra modi on Rashtriya Swayamsevak Sangh ) “राष्ट्रीय चेतनेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी 100 वर्षांपूर्वी पेरलेले विचाराचे बीज आज एका मोठ्या वटवृक्षाच्या रूपात जगासमोर आहे. तत्त्व आणि आदर्श या वटवृक्षाला उंची देतात. लाखो स्वयंसेवक त्याच्या फांद्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सामान्य वटवृक्ष नसून भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षयवट आहे. आज तो भारतीय संस्कृतीला, आपल्या राष्ट्राच्या चेतनेला सतत ऊर्जा देत आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी नागपूर दौर्यावर होते. यावेळी त्यांनी रेशीमबाग येथे स्मृती मंदिरास तसेच दीक्षाभूमीलाही भेट दिली. त्यानंतर ‘माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर’चा शिलान्यास पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ‘माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्ट’चे महासचिव डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत पंतप्रधान मोदी म्हणाले, “माधव नेत्रालयाच्या रूपाने केलेला एक संकल्प नव्याने विस्तारत आहे. ‘माधव नेत्रालय’ ही एक अशी संस्था आहे, जी गेल्या अनेक दशकांपासून श्रीगुरुजींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून लाखो लोकांची सेवा करत आहे. त्यामुळे अनेकांचे जीवन पुन्हा प्रकाशमय झाले आहे,” असे म्हणत पंतप्रधानांनी ‘माधव नेत्रालया’शी संबंधित लोकांच्या सेवाभावाचे कौतुकही केले.
पुढे ते म्हणाले, “निराशेत बुडालेल्या समाजाला स्वामी विवेकानंदांनी खडबडून जागे केले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी कधी आपली राष्ट्रीय जाणीव नष्ट होऊ दिली नाही. गुलामीच्या शेवटच्या दशकात डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजींसारख्या महान व्यक्तींनी त्यास नवीन ऊर्जा देण्याचे कार्य केले. त्याचबरोबर दृष्टी ही आपल्या जीवनात आपल्याला दिशा देते. दृष्टी व्यक्तीला तसेच समाजालाही अफाट शक्ती देते. संघदेखील असाच एक संस्कारयज्ञ आहे, जो आंतरिक आणि बाह्य दृष्टिकोनासाठी काम करत आहे.”
सेवा है यज्ञकुन्ड, समिधा सम हम जलें।
संघ स्वयंसेवकांकडून होणार्या सेवाकार्याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, “महापूर असो किंवा भूकंप, कुठलीही आपत्ती आली की संघाचे स्वयंसेवक मदतकार्यासाठी लगेच घटनास्थळी पोहोचतात. कोणीही स्वतःची अडचण पाहात नाही. फक्त सेवेच्या भावनेने ते मदतकार्यात सहभागी होत असतात. ‘सेवा है यज्ञकुन्ड, समिधा सम हम जलें, ध्येय महासागर में सरितरूप हम मिलें।’ हे गीत संघस्वयंसेवकांच्या जणू रक्तातच भिनले आहे.
सेवा हेच स्वयंसेवकांच्या जीवनाचे ध्येय
आपल्या सामर्थ्यानुसार समाजात योगदान देणे महत्त्वाचे आहे. सेवा ही करुणेच्या भावनेने नव्हे, तर प्रेमाने करावी. संघाचे स्वयंसेवक स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी, समाजासाठी काम करतात. आज प्रत्येकाला समाजासाठी तन, मन, धनपूर्वक काम करावे लागेल. दीड लाखांहून अधिक स्वयंसेवक समाजासाठी काम करत असून सेवा हेच स्वयंसेवकांच्या जीवनाचे ध्येय आहे. समाजावर प्रेम करणे आणि इतर समाजांतील प्रत्येकाला दृष्टी देणे हे संघाचे कार्य आहे. स्वयंसेवक संघाच्या शाखेत एक तास स्वतःच्या विकासासाठी देतो आणि उरलेले 23 तास समाजाच्या कल्याणासाठी वापरतो.
- डॉ. मोहनजी भागवत, सरसंघचालक
अंधांना दृष्टी देणे दैवी कार्य
दृष्टी ही इश्वरीय देणे असून अंधांना दृष्टी देणे, हे सर्वांत मोठे दैवी कार्य आहे. हे काम गेल्या 30 वर्षांपासून संघाचे स्वयंसेवक करत आहेत. देशात नेत्रदानाचे प्रमाण वाढले आहे. लोक केवळ संकल्प करत नसून, त्याप्रमाणे कृतीसुद्धा करताना दिसत आहेत. ‘माधव नेत्रालय’ हे केवळ विदर्भ आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण मध्य भारताकरिता डोळ्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी एक महत्त्वाची संस्था म्हणून उदयास येईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री