मुंबई : गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरणगावच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेत मराठी भाषेचा जागर नागरिकांना अनुभवायला मिळाला. गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या शोभायत्रेमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी देखील आपला सहभाग नोंदवला. या शोभायात्रेत मोठ्या प्रमणात युवकांनी आपला सहभाग नोंदवला. विविध चित्ररथांच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन या शोभायात्रेत नागरिकांना अनुभवायला मिळाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा यावेळी विशेष लक्ष्यवेधी ठरला.
गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्यावतीने आयोजित गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये अभिजात मराठीचा जागर अनुभवायाला मिळाला. या शोभायात्रेचे वैशिष्ठ्य म्हणजे वेगवेगळ्या चित्ररथांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर आपली सोसल वाहिनी या युट्युब चॅनलद्वारे 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या चित्ररथात महाराष्ट्र घडवणाऱ्या साहित्यिक, विचारवंत, महापुरूष, यांच्या तसबीरी दर्शनी भागात ठेवण्यात आल्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखाव्याने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले.
त्याचसोबत लाठीकाठी, दांडपट्टा, अशा पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी शोभायात्रेला हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाला पुष्पहार घालून, गुढीपाडव्या निमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
अठरापगड जातीचे लोक शोभायात्रेमध्ये एकत्र!
गुढीपाडव्यानिमित्त आयोजित गिरणगावच्या या शोभायात्रेचे वेगळेपण सांगताना गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणाले की " हिंदूनववर्षाची सुरूवात पाडव्यापासून होते. भाऊ माने यांच्या संकल्पनेतून ही शोभायात्रा जन्माला आली. नंतर या शोभायात्रेचे स्वरूप वाढत गेले. इथला हिंदू आता जागा झाला असून, पारंपारिक वेषामध्ये तो आपल्या या उत्सवामध्ये सहभागी होतो आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्था या शोभायात्रेमध्ये हिरीरीने आपला सहभाग नोंदवत असतात. या शोभायात्रेची तयारी महिने दोन महिन्यांपूर्वीपासून सुरू होते. या तयारीचं फळ म्हणजे लोक अत्यंत उत्साहाने या कार्यात सहभागी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे अठरापगड जातीच्या लोकांनी हाताशी धरून स्वराज्याचं उभारलं, त्याच प्रकारे अठारापगड जातीचे लोक एकत्र येऊन आपला हा हिंदूनववर्षाचा सण साजरा करतात.