राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली प्रवासाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपण आपल्या देशाच्या इतिहासावर नजर टाकली, तर शेकडो वर्षांच्या गुलामगिरी आणि आक्रमणांदरम्यान भारताची सामाजिक रचना नष्ट करण्याचे क्रूर प्रयत्न झाले. पण, भारताची जाणीव कधीच संपली नाही, त्याची ज्योत तेवतच राहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे जगासमोर उभा आहे. हा केवळ एक सामान्य वृक्ष नसून, भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षयवट आहे,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केलेले विधान अतिशय महत्त्वाचे असेच असून, त्यामागील आशय समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यपद्धतीचा तसेच, त्याच्या विस्ताराचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. वटवृक्ष हा केवळ त्याच्या प्रचंड विस्तारासाठी ओळखला जात नाही, तर त्याच्या खोलवर गेलेल्या मुळांमुळे तो कित्येक वर्षे टिकून राहतो. संघही अशाच प्रकारे भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, अनेक दशकांपासून कार्यरत आहे. १९२५ साली आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. त्यानंतर आजपर्यंत कालावधीत संघाने आपली मुळे समाजाच्या प्रत्येक थरात घट्ट अशी रूजवली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ एक संघटना नाही, तर तिने अनेक शाखांद्वारे सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, सेवा प्रकल्प आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्ये संघाचा मोलाचा असा वाटा आहे. विविध समविचारी संघटनांचे एकत्रीकरण करून, संघाने एक व्यापक परिवार तयार केला आहे.
संघाची विचारधारा राष्ट्रीयत्वावर आधारित असून, समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम तो सातत्याने करत आहे. सामाजिक सलोखा, हिंदू संस्कृतीचे संवर्धन, युवकांचे नेतृत्वविकास आणि सेवाभावी वृत्ती यावर संघाने प्रामुख्याने भर दिला आहे. अनेक राष्ट्रीय संकटांमध्ये संघाने मोलाचे योगदान दिले आहे. चीन आणि पाकिस्तान युद्धकाळातील मदतकार्य असो वा आणीबाणीच्या काळातील संघर्ष यांचा यात विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. पंतप्रधान मोदी यांनी संघाला महान वटवृक्ष, असे संबोधले आहे. कारण, संघ हा काही केवळ एका विशिष्ट उद्देशाने तयार झालेली संघटना नाही, तर संघाने स्वतःला समाजहितासाठी वाहून घेतले आहे. हा वटवृक्ष केवळ परिवारातील सदस्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी आश्रय देणारा तसेच, मार्गदर्शन करणारा असाच आहे. तसेच, तो काळानुसार बदलत आणि विकसित होत गेला आहे. संघाची ताकद त्याच्या विचारांमध्ये, शिस्तबद्ध कार्यपद्धतीत आणि समाजातील व्यापक स्वीकारात आहे. मोदी यांचे विधान हे केवळ संघाच्या भूतकाळातील योगदानाशी संबंधित नसून, त्याच्या भविष्यातील भूमिकेचीही जाणीव करून देणारे आहे. भविष्यातही हा वटवृक्ष अधिक विस्तारेल आणि समाजासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासच त्यांनी व्यक्त केला आहे, असे म्हटले तर ते अजिबात चुकीचे ठरणार नाही.
आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तसेच, भारतीय राष्ट्रीयत्वाच्या विचारसरणीचे द्रष्टे नेते होते. त्यांच्या या विचारधारेचा आणि दूरदृष्टीचा परिणाम आजही संघाच्या कार्यपद्धतीत आणि उद्दिष्टांमध्ये दिसून येतो. डॉ. हेडगेवार यांचे मुख्य उद्दिष्ट भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी कार्य करणे हे होते. ब्रिटिशांच्या काळात ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय होते. मात्र, त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थान हवे हे त्यांनी समजून घेत द्रष्टेपणाने असा समाज घडवण्याचा संकल्प केला, जो राष्ट्रप्रेमाने प्रेरित असेल आणि संघटित असेल. १९२५ साली नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करताना डॉ. हेडगेवार यांनी,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशावर आधारित एक संघटनात्मक व्यवस्था निर्माण केली. त्यांचा विश्वास होता की, शिस्तबद्ध आणि चारित्र्यसंपन्न युवक हेच देशाच्या भवितव्याचे शिल्पकार असतील. त्यामुळे, त्यांनी संघाच्या माध्यमातून स्वयंसेवक घडवण्यावर भर दिला.
संघाच्या कार्यपद्धतीत शिस्तीला आणि सेवाभावी वृत्तीला मोठे महत्त्व आहे. डॉ. हेडगेवार यांना वाटत होते की, समाजातील प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे. म्हणूनच, त्यांनी स्वयंसेवकांना केवळ विचारसरणीचे धडे देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक पुनरुत्थान यासाठी त्यांनी, संघ कार्यकर्त्यांना प्रेरित केले. आद्यसरसंघचालक हे केवळ एक राष्ट्रवादी विचारवंत नव्हते, तर व्यावहारिक दृष्टिकोन असलेले प्रभावी नेतृत्वही होते. त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम म्हणजे, आज संघ संपूर्ण भारतभर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. त्यांच्या विचारांवर आधारलेले शेकडो संघटनात्मक उपक्रम, समाजहिताची कामे प्रभावीपणे राबवली जात आहेत. डॉ. हेडगेवार यांचे हे व्हिजन केवळ एका संघटनेपुरते मर्यादित नव्हते, तर भारताला आत्मनिर्भर, सशक्त आणि संस्कृतीप्रेमी बनवण्याचा तो एक व्यापक राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा विचार होता. त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी ही संघाच्या वाढीसाठी आणि देशाच्या सामाजिक पुनरुत्थानासाठी, एक महत्त्वाची प्रेरणा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे केवळ एक स्वयंसेवी संघटन नसून, समाजाच्या विविध स्तरांवर कार्य करणारे एक व्यापक आंदोलन आहे. स्थापनेपासूनच संघाने आपल्या कार्याचा विस्तार समाजाच्या विविध क्षेत्रांत केला असून शिक्षण, सेवा, ग्रामीण विकास, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रीय सुरक्षा यामध्ये आपले योगदान दिले आहे. संघ विचारांवर आधारलेल्या अनेक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी, समाजात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. संघ आणि त्याच्या विविध सहयोगी संस्थांनी समाजसेवेत मोठे योगदान दिले आहे. संघाच्या अनेक प्रकल्पांनी ग्रामीण भागात मोठा प्रभाव टाकला आहे. संघाने त्याचवेळी पर्यावरण आणि पशू संरक्षणासाठीही अनेक उपक्रम राबवले आहेत. सुरुवातीपासूनच संघाने राष्ट्रीय सुरक्षेला महत्त्व दिले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य केवळ शाखांपुरते मर्यादित नसून, समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर ते विस्तारलेले आहे. शिक्षण, सेवा, राष्ट्रवाद, ग्रामीण विकास आणि संस्कृतीचे संरक्षण यामध्ये संघाने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, आपले वेगळेपणही राखलेले आहे. भविष्यातही संघाचे हे कार्य अधिक व्यापकपणे होईल, असे निश्चितपणे म्हणता येईल. त्यामुळे संपूर्ण भारतीय समाजात सकारात्मक परिवर्तन घडेल. स्थापनेपासून ते आजपर्यंत, संघाने भारतीय संस्कृती, राष्ट्रीयता, आणि एकता बाळगण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतली आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी विविध साधनांनी सामाजिक साक्षरतेपासून ते कार्यशाळा आणि शिबिरे आयोजित करून, देशाच्या विकासासाठी तपश्चर्या केली आहे. संघाचे कार्य राष्ट्रीय एकतेवर जोर देणारे आहे. संघाचा भाजपवर असलेला प्रभाव महत्त्वाचा असून, मोदी सरकारने संघसंस्थेच्या विचारधारेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आजच्या राजकारणात संघाची भूमिका अधिक महत्वाची ठरते. संघाच्या कार्यकुशलतेमुळे देशाच्या विकासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आहे. संघाची ही तपश्चर्या समाज आणि राजकारणावर मोठा प्रभाव टाकणारी आहे, हे नक्कीच.