मुंबई : युवा साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते देविदास सौदागर यांच्या बहुचर्चीत कादंबरीचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देविदास सौदागर यांच्या 'उसवण' कादंबरीला २०२४ सालचा युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एका शिंप्याची गोष्ट सांगणारी ही कादंबरी अल्पवधितच लोकप्रिय ठरली.
"वेदनेला पुरस्कार मिळाला, म्हणून वेदना कमी होत नाही त्यावर केवळ फुंकर बसते" असे म्हणत एका शिंप्याची वेदना जीवंत करणाऱ्या देविदास सौदागर यांची 'उसवण' ही कादंबरी आता युवकांच्या हाती सोपवली गेली आहे. मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीसाठी (M.A.) ' साहित्य प्रकारचा अभ्यास : कादंबरी' या अनिवार्य विषयपत्रिकेत देविदास सौदागर यांच्या 'उसवण' या कादंबरीची बहुमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सतीश कामत यांनी दिली.
'त्यांच्या'मुळे इथवर पोहोचलो : देविदास सौदागर
मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कादंबरीचा समावेश झाल्यावर आनंद व्यक्त करताना देविदास सौदागर म्हणाले की "मला नियमितपणे कुठल्याही महाविद्यालयात किंवा विद्यापीठात शिक्षण घेता आले नाही. परंतु मुंबई विद्यापीठाचे हे पत्र मिळाल्यावर एक वेगळाच आनंद झाला. अशा आनंदाच्या वेळी मला फुले - शाहू - आंबेडकरांची आठवण येते. एका अशिक्षित घरातील मुलाला शिक्षण मिळाल्याने तो स्वत:ची प्रतिभा कागदावर मांडू शकला."